शापित जलपऱ्या – SHAPIT JALPARYA


In this story we meet two sisters named Padma and Soma. They are daughters of Mother Water. Mother water is fairy queen. Two sisters are living happily and freely in their mother’s home, which is in the water.
Mother water decides to marry her daughters with sons of Mother Earth.  Daughters agree with this decision.
But if you want to know after that what happens then you must read full story.

 एका हिरव्यागार वाटिकेत एक सरोवर होतं. त्यातलं पाणी होतं मुनींच्या हृदयासारखं निर्मल अन शीतल! सरोवराच्या तळाशी एक जलमहाल होता. स्फटिकासारखा चकाकणारा मृदगंधाने भरलेला! त्यात रहायची जलपऱ्यांची राणी. पद्मा आणि सोमा या दोन मुली म्हणजे राणीचा जीव की प्राण होत्या. सौंदर्याच्या जणू मूर्तिमंत प्रतिमाच होत्या.
त्यांचे भुंग्याप्रमाणे काळे नेत्र, मेघ माले प्रमाणे वलयांकित केस, डौलदार आणि गोलाकार पंख किती मोहक दिसायचे. पद्माचे पंख आरक्त होते आणि सोमेचे पंख शुभ्र होते. आपले गोलाकार पंख पसरून जेव्हा त्या रानावनातून उडायच्या तेव्हा वाटायचं की त्यांचं सारं माधुर्य, सौंदर्य त्या पंखात एकवटलेय.

निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळतच त्यांनी शैशवातून तारुण्यात प्रवेश केला. राणीने मग त्यांचं विवाह ठरविला, पृथ्वीपुत्रांशी! पृथ्वीपुत्रांचा महाल म्हणजे डोंगरांनी वेढलेलं एक हिरवगार जंगलच होतं. त्या जंगलात फेसाळते धबधबे होते. हिरवीगर्द झाडी होती. पक्ष्यांची घरटी होती. मधाने ठिबकणारी पोळी होती. मुंग्यांची वारुळे होती. हत्तींचे कळप होते आणि जलाशयात विहरणारे राजहंसपण होते. दिवस धुवांधार पावसाचे होते त्यामुळे पाऊस संपताच विवाह करण्याचे निश्चित झाले.

जलपऱ्यांच्या राणीने विवाहाची तयारी सुरू केली. पाणीदार मोत्यांचे दागिने बनवले. पृथ्वीमातेनेही हिरव्या पानांचा, रंगीबेरंगी फुलांचा मांडव घालायला  सुरुवात केली.  हळूहळू धोधो कोसळणारा पाऊस थंडावला. पण अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी रिमझिमत यायच्या. विवाहाला आता अवघ्या काही दिवसांचाच अवकाश उरला होता. काळ्या ढगांची पांगापांग सुरू झाली होती आणि आकाश निळेभोर होऊ लागले होते. एका सोनेरी सायंकाळी पद्मा आणि सोमा सरोवराच्या काठावर आल्या. भुंगे त्यांचे बालपणापासूनचे मित्र! नेहमीप्रमाणे मग त्यांनी भुंग्यांच्याबरोबर शर्यत लावली. दूरवरच्या क्षितिजापर्यंत उडत उडत जाण्याची.

भुंग्यांना मागे टाकून दोघीजणी उडत उडत क्षितिजाजवळ आल्या. जिथं आभाळ धरेला टेकलं होतं. पांढऱ्याशुभ्र जलधारा सोनेरी उन्हाच्या हातात हात घालून बागडत होत्या. इंद्रधनुष्याची कमानदार शिडी आणि त्या शिडीला टेकलेला सोनेरी कडा असलेला करड्या रंगाचा ढग जणू त्या दोघींचीच वाट पहात होता. आकाशाची सैर करायला! त्या सप्तरंगी शिडीवर चढून दोघीजणी त्या ढगावर बसल्या. मग तो ढग वेगाने वरवर जाऊ लागला. रिमझिमत्या पावसात या दोन सुंदरींना घेऊन तो ढग ऐटीत निघाला.

मोकळ्या नभातला तो मुक्तसंचार त्या दोघींना इतका आवडलाकी त्यांना वाटू लागलं की या ढगांचं उडणं कधी थांबूच नये. पण अखेर तो ढग थांबला. एका महालाच्या दरवाजापाशी येऊन थांबला. त्या महालात निरनिराळ्या ढगांची वेगवेगळी दालने होती. त्या ढगांचे रंग तरी किती सुंदर होते. लाल, किरमिजी, भगवे आणि सोनेरी चंदेरी! पद्मा आणि सोमा ढगावरून खाली उतरल्या. महालाच्या आत गेल्या. तिथे निळ्या  रंगाच्या मखमली मंचावर विजेचं भरतनाट्यम चालू होतं. दाढीवाले ढग तबलावादनात मग्न होते. चमचमणारी वीज लयबद्ध पदन्यास करीत होती. तिचं चापल्य, तिचा मुद्राभिनय अगदी पहात रहावा असाच होता.

नृत्यवादनात रंगलेला तो दरबार पाहून पद्मा आणि सोमा नकळत उद्गारल्या,
“अहाहा किती विलोभनीय दृश्य आहे हे!” त्यांच्या कंठातून निघालेला तो अत्यंत मधुर स्वर ऐकताच नकळत विजेच्या पावलांचा ठेका चुकला. ढगांची बोटं तबल्यावरच थबकली. ग्रह गोलांच्या भृकुटी वक्र झाल्या.त्या दोघींचं ते आरसपानी रूप पहून सर्वजणच आश्चर्यविभोर झाले. तेवढ्यात

“कोण तुम्ही? कोठून आलात? या नभांगणात तुमचं स्वागत आहे.” मस्तकाभोवती प्रभावळ असलेले कुणी तेजस्वी तरूण म्हणाले.

“आम्ही जलपरीच्या कन्या आहोत. पृथ्वीतलावरच्या सरोवराच्या तळाशी असलेल्या जल महालात राहतो आम्ही. पण आपण कोण?”

“आम्ही कोण? आम्ही आकाशपुत्र! आदित्य आणि शशधर, अर्थात सूर्य आणि चंद्र! तुमच्या पृथ्वीतलावर आम्हीच तर प्रकाश पाडतो. पण…तुमच्यासारख्या सुंदरी या पृथ्वीतलावर आहेत हे आम्हाला माहीतच नव्हतं.”

यावर आपल्या नाजुक मानेला झटका देत पद्मा म्हणाली, “खरेतर पृथ्वी तलावरच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे. फक्त पाहणाऱ्याच्या दृष्टीत मात्र ते असायला हवं.” यावर मंद स्मित करीत ते आकाशपुत्र उदगारले, “आमच्या दृष्टीत सौंदर्य असेल किंवा नसेल पण आम्ही सौंदर्याचे पूजक आहोत. म्हणूनच वाटतंय तुमच्यासारख्या सौंदर्यतारकांच पृथ्वीतलावर कामच काय? त्यातर आमच्या नभांगणातच शोभून दिसतात. म्हणूनच आमच्याशी विवाह करून या नभांगणाची शोभा वाढवालका तुम्ही?”

त्यांच्या या वाक्याने पऱ्या दचकल्या. मागे सरकून म्हणाल्या, “छे!छे! आम्ही जलपरीच्या कन्या आहोत…आणि आमचा विवाह पृथ्वीपुत्रांशी ठरलाय.” त्यांच्या या उद्गारांवर ते आकाशपुत्र अगदी तुच्छतेने हसले आणि म्हणाले, “तुमच्यासारखी अनमोल रत्ने त्या दरिद्री पृथ्वीपुत्रांच्या  काय कामाची? शिवाय दिवसरात्र कामाचा डोंगर उपसणारी ती अरसिक पृथ्वी लग्नानंतर तुम्हालाही त्याच कामाला जुंपेल. निर्मितीच्या आणि नवसर्जनाच्या!”

“मग काय बिघडलं त्यात? निर्मितीतला आनंद तुम्हाला कसा कळावा? हिरव्यागार वृक्षवेली, कोकिळेचा कुहुकार, मयुरांचे नृत्य, मत्स्यकन्यांचे चापल्य, फुलांमधले माधुर्य जिच्यामुळे निर्माण झालं तिला अरसिक म्हणणारे तुम्ही खरोखरच अरसिक आहात.” आपल्या काळ्याभोर पापण्यांची उघडझाप करीत सोमा म्हणाली.

यावर आकाशपुत्र आदित्य पुन्हा एकदा हसला. गर्वाने मान उडवीत म्हणाला, “तुमचं जग खूपच संकुचित आहे आणि तुमची दृष्टी तर त्याहूनही संकुचित आहे. चला आमच्याबरोबर आणि पहा इथलं वैभव!” असं म्हणून आकाशपुत्रांनी त्यांना तिथले सोनेरी महाल दाखवले. लखलखीत झुंबरं आणि नक्षत्र फुलांनी लगडलेल्या चांदणवेली दाखवल्या.

मग आकाशपुत्रांनी त्यांना अशा ठिकाणी नेलंकी आकाश समुद्राला भिडलं होतं. समुद्राच्या उसळत्या फेसाळत्या लाटांवर सूर्याचे सोनेरी किरण पसरले होते. लाटा उसळत होत्या, फुटत होत्या आणि मौक्तिकांच्या राशी पसरत होत्या. त्या लाटांवर बसून सोनेरी केसांच्या सुंदर बाला सोन्याचे धागे कातीत  होत्या. काहीजणी त्या धाग्यांची सुरेख वस्त्रे बनवीत होत्या. त्यापलीकडे चांदीच्या नौकेत बसून  काही गंधर्वकन्या गाण्याचा रियाज करीत होत्या. पाहता पाहता त्या स्वप्नवत नगरीने पद्मेच्या आणि सोमेच्या मनावर गारूड केले. लयबद्ध श्वास घेत डोळे मिटून घेत त्यांनी विचारले, “कुणी बनवली ही स्वप्ननगरी? कोण आहेत या सुंदर मुली?”

“या सुवर्णकन्या आहेत. जर तुम्ही आमच्याशी लग्न केलं तर त्या तुमची सेवा करतील. तुमच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करतील. त्या गंधर्वकन्या तुमच्यासाठी गाणी गातील. आमचं हे सारं वैभव तुमच्या पायाशी लोळण घेईल. म्हणूनच विचार करण्यात वेळ न दवडता, त्या लाटांवर असलेल्या चमचमत्या रत्नमाला उचला आणि घाला आमच्या गळ्यात!” आकाशपुत्र कमालीच्या विनयाने म्हणाले. शैशव आणि तारूण्य  यांच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या या मुलींवर या लोभसवाण्या शब्दांची आणि स्वप्नमयी वैभवाची मोहिनी नाही पडली तरच नवल!

भारावलेल्या अवस्थेत त्यांनी त्या रत्नमाला उचलल्या. पद्मेने आदित्याच्या आणि सोमेने शशधराच्या गळ्यात वरमाला घातली. ढगांनी टाळ्या वाजवून आणि पाऊस पाडून या विवाहाचं स्वागत केलं. पण त्याचक्षणी एक नवल घडलं. पद्मेचे आरक्त पंख आणि सोमेचे शुभ्र पंख गळून पडले. पंख नसलेल्या त्या पऱ्या मग, आमचे पंख! आमचे पंख! म्हणून आक्रोश करू लागल्या.  “आहे काय त्या पंखात एवढं? गळून पडले तर पडले. आता तुम्हाला त्यांची गरजच काय? तुम्ही राण्या आहात, आकाशपुत्रांच्या राण्या आहात!” आकाशपुत्र म्हणाले.  ” नाही, आम्हाला आमचे पंख हवे आहेत. ते आम्हाला बळ देतात. फक्त उडण्याचच नाही तर स्वप्नं पाहण्याचं! ती खरी करण्याचं!”

“पण तुम्ही आता वेगळी स्वप्नं पाहूच नका. आमची स्वप्नं तीच तुमची स्वप्नं नाहीत काय?”

“नाही, मुळीच नाही! तुमची स्वप्नं आमची कशी होतील? पंखाशिवाय परी म्हणजे, आत्म्या शिवाय शरीर, प्रेमाशिवाय जीवन आणि अहिंसेशिवाय धर्म हे काळात कसं नाही तुम्हाला?”

यावर ते आकाशपुत्र अगदी कठोरतेने म्हणाले, “तुम्ही आता पऱ्या कोठे राहिलात? तुमचे पंख आता तुम्हाला कधीच मिळणार नाहीत कारण नभांगणातील स्त्रियांना स्वत:चे पंख नसतात, स्वत:चं मन नसतं आणि स्वत:चे विचार तर मुळीच नसतात. त्यांनी फक्त या नभांगणाची शोभा वाढवायची असते. असं आम्ही मानतो, समजतो.” आकाशपुत्रांच्या या बोलण्यावर पऱ्या हतबल झाल्या. त्यांना कळून चुकलकी आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसलोय. दु:खाने त्यांनी एकमेकींचे हात घट्ट पकडले आणि त्या म्हणाल्या,

“नाही हे असलं जगणं म्हणजे मरणापेक्षाही भयंकर आहे. त्यापेक्षा आम्ही मरण पत्करू.” असं म्हणून त्यांनी उंच उंच ढगांवरून स्वत:ला खाली झोकून दिलं. गरगरत वेगाने खाली येताना भीतीने त्यांनी डोळे मिटून घेतले आणि मनातल्या मनात आपल्या आईचे स्मरण केले. त्यानंतर काही क्षणातच वाटिकेतल्या निळ्या सरोवरात त्या वेगाने येऊन आदळल्या. पाण्यावरच तरंगत राहिल्या पण जलमहालात मात्र नाही जाऊ शकल्या.

आकाशपुत्रांशी लग्न केल्यामुळे त्यांना आता ना पृथ्वीपुत्रांच्या घरात जागा होती ना जलपरीच्या महालात. पंख गळालेल्या पद्मेच रूपांतर एका लाल-गुलाबी कमळकळीत झालं आणि सोमेचं रूपांतर एका पांढऱ्याशुभ्र कमळकळीत झालं. आपले कातीव, मखमली, पाकळ्यांचे पंख पसरून या कळ्या पाण्यावर तरंगू लागल्या. जलपऱ्यांची राणी आपल्या या लाडक्या मुलींना अजूनही जीवनरस पुरवते. त्यांचं पालनपोषण करते. प्रात:काळच्या सूर्यदर्शनानं पद्मा उमलते. तिला आपण कमलिनी म्हणतो आणि चंद्रदर्शनानं उमलणाऱ्या सोमेला आपण कुमुदिनी म्हणतो.

 

,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.