सख्खी वहिनी – SAKHKHEE VAHINEE


वर्षा ..माझी एकुलती एक सख्खी वहिनी !
माहेरची डॉ. कुमारी सुरेखा मणेरे, तिच्या सासरघरी म्हणजे माझ्या व माझी एकुलती एक सख्खी बहीण प्रा.सौ.सुरेखा इसराणा हिच्या माहेरघरी डॉ. सौ. वर्षा महावीर अक्कोळे बनून जणू काही आनंदाची वर्षा करतच आली.
सुरुवातीला मितभाषी वाटणारी पण नंतर तिच्या सासूची म्हणजे आमच्या आईची जिवलग मैत्रीण कधी झाली ते कळलंच नाही.
माझी आई आणि माझे दादा यांचा लोकसंग्रह खूपच मोठा.. घरी सर्वच समाजातील धर्मातील लोकांचे येणे जाणे असल्याने माझी आई सर्वांचेच आदरातिथ्य खूप प्रेमाने करत असे.
माहेरी चार भाऊ चार बहिणी या सर्वात धाकटी असणारी, मणेरे यांच्या एकत्र कुटुंबात वाढलेली, आवाडेमामा व आवाडे मामींची भाची सुरेखा , वर्षा होऊन आमच्या घरात अगदी सहजपणे एकरूप झाली.
आमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचे जिव्हाळ्याने आगतस्वागत करण्यात सासूची सून म्हणूनही सरस ठरली.
गोड लाघवी स्वभाव, हसणे बोलणे, जणू काही जपून मौन डोळ्यातूनच बोलणारी, मला सोनूताई अशी प्रेमाची साद घालणारी माझी वहिनी सखी मैत्रीण वर्षा आता या जगात नाही हे सत्य आता स्वीकारावेच लागणार आहे.
रविवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ ला रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान तिने शेवटचा श्वास घेतला.
१९ मे १९८४ साली लग्न करून माझा एकुलता एक सख्खा भाऊ डॉ. महावीर अक्कोळे याचा हात हातात धरून, उंबरठ्यावरचे भरलेले माप ओलांडून जयसिंगपुरातील यशवंत हौसिंग सोसायटीतील सिद्धार्थ बंगल्यात लक्ष्मीच्या पावलांनी आली.
त्यानंतर आजतागायत त्याला सखी सहचरी अर्धांगिनी प्रिय पत्नीबनून त्याला साथ देणारी प्रसंगी त्याची माता पिता बनलेली वर्षा अशी अचानक अर्ध्या वाटेवर खेळ सोडून निघून जाईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते.
गेली सहा वर्षे ती असाध्य चिवट अश्या फुफ्फुसाच्या कॅन्सरशी शूर योध्यासारखी हसतमुखाने झुंजत होती.
भाचेकंपनीची मामी, आई दादांची सून वर्षा, हर्षदा आणि कल्याणीची मम्मी, साध्यासुध्या तमाम पेशंटांची डॉ.मॅडम जणू काही मातोश्रीच बनून घरी दारी वावरणारी वर्षा आता या जगात नाही, आणि तिच्या या जगात नसण्याच्या स्मृतीखातर मला हे सगळे लिहावे लागतेय याचे दुःख तर आहेच…..
पण तिला जेवढे आयुष्य लाभले ते मात्र ती अगदी समरसून भरभरून जगली. डॉक्टर असूनही तिला घरकाम , स्वयंपाक, साड्यांची खरेदी, बाजारहाट यातही माझ्या आईप्रमाणेच मनापासून रस होता.
लग्नकार्य, सणवार यात साडीखरेदी तर तिच्याविना होतच नसे. फक्त स्वतःसाठीच नाहीतर माहेर सासरच्या सगळ्यासाठी मैत्रिणीसाठी ती स्वतःचा वेळ खर्चून अगदी मनापासून साडी खरेदी आणि साड्यांची निवड करत असे.
माझ्या आवडीचा रंग पोत डिझाईन तिला कसे कळत असे कोणजाणे …पण अगदी माझ्या आवडीची मनपसन्त साडी ती भाऊबीजेला मला देत असे.
माझ्या मुलीच्या डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या बेंगलोर आणि पुणे या दोन्हीकडच्या लग्नात आजाराशी झुंजत असतानाही सगळया रीतीभाती व्यवस्थित लक्षात ठेऊन किती प्रेमाने कौतुकाने आली.
अजून खूप काही लिहिता येईल.. पण किती आणि काय काय लिहायचे. कुठेतरी थांबायला हवेच !
शेवटी तिच्यासाठी सहज स्फुरलेल्या या काव्यपंक्ती …. काव्य कुसुमांजली …
गोड लाघवी दवबिंदू जणू मेघसरींसम वर्षा…
येशील कधी तू परतून माझी गळाभेट घ्याया…
डोळ्यांमधल्या तरल भावना कश्या टिपाव्या सांग बरे…
मिटून डोळे निघून गेलीस कुठल्या गावी सांग बरे …
तव स्वप्नीचे सारे सुंदर तुजला तेथे भेटूदे…
हृदयामधली किलबिल गुंजन अधरांवरती उमटूदे…
नवजन्मातील प्रेमसरींनी भिजवुन काया उमल सखे …
कर्मनिर्जरा करून गेलीस भाळ तुझे किती उजळ सखे …
तुझी सोनूताई …..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.