In this story we meet a gardener and his three daughters. The younger daughter’s name is Sadafuli. She is very beautiful however, comes from a poor family. One day while walking down a street, she finds a small creature called Thirst-virus. The Thirst-virus makes her mind disturbed and plants the seed of desire in her mind. The Thirst-virus offers her entry into the body of a rich merchant’s daughter. After few days her desires get bigger. She wishes to live the life of a king’s daughter. The Thirs-Virus fulfills her desire and allows her entry into the body of the king’s daughter. However, Sadafuli’s desires keep rising and she loses her peace of mind. In the end she realizes that true real happiness lies in staying with our family.
नगराबाहेरच्या एका उंच टेकडीवर एक माळी व त्याची बायको राहत असत. त्यांना तीन मुली होत्या. सगळ्यात धाकट्या मुलीचं नाव होतं सदाफुली.ती चंद्रासारखी वाटोळ्या चेहऱ्याची आणि हसरी होती. घरातलं शेंडेफळ असल्याने ती सर्वांची खूप लाडकी होती. नगराच्या राजाच्या बागेची देखभाल करण्याचं काम या माळ्याकडे सोपवलं होतं; कारण तो त्या पंचक्रोशितला सगळ्यात कुशल माळी होता.
कोणत्या झाडाला माती कशी लागते, पाणी किती प्रमाणात द्यावं, झाडांवर पडणाऱ्या किडीचा बंदोबस्त कसा करावा, या साऱ्या गोष्टींचं त्याला उपजत ज्ञान होतं.
त्याच्या बोटात अशी काही जादू होती की त्याने लावलेली रोपटी अगदी जोमाने वाढत.त्याच्या कुशल,लवचिक आणि प्रेमळ बोटांच्या स्पर्शानं वेलीवरच्या कळ्या अवेळीसुद्धा उमलत. सृष्टीच्या बाळांवर एवढ प्रेम करणारा तो माळी स्वत:च्या मुलींवर किती प्रेम करत असेल? पण किती झालं तरी तो एक माळी होता आणि एका माळ्याची कमाई जास्तीत जास्त किती असू शकते? तरीसुद्धा कमीत कमी पैशातही तो आपल्या मुलींना जास्तीत जास्त सुखी ठेवण्याचा प्रयत्न करी.
जेव्हा राजकन्येच्या वाढ दिवसाचं निमंत्रण माळ्याच्या मुलींनाही आलं तेव्हा त्या आनंदाने नाचू लागल्या. राजकन्येला वाढ दिवसाची भेट काय दयायची याचा विचार करकरून त्यांचं डोकं शिणलं. शेवटी सदाफुली म्हणाली, “बागेतल्या सर्व प्रकारच्या फुलांचा एक छानसा गुच्छ बनवून देऊयाका?” ही कल्पना मग सगळ्यांनाच आवडली. राजकन्येला मग इतर श्रीमंत मुलींनी खूप मौल्यवान भेटी दिल्या. कुणी हिऱ्यांची कर्णफुले, कुणी मोत्यांचा कंठा तर कुणी
पाचूची अंगठी! सर्वात शेवटी माळ्याच्या मुलींनी ताज्या फुलांचा गुच्छ राजकन्येला दिला. राजकन्या तेव्हा इतकी मनापासून हसलीकी राजा पहातच राहिला. तिच्या चेहऱ्यावरचा खराखुरा आनंद पाहून राजालाही खूप आनंद झाला. त्याने माळ्याच्या मुलींना रेशमी वस्त्रे, आभुषणे व भरपूर मेवामिठाई देऊन घरी पाठवले.
घरी येताना वाटेत सदाफुलीला एक चकाकणारा किडा दिसला. तिने तो उचलून आपल्या तळहातावर घेतला. तिच्या मोठया बहिणी म्हणाल्या, “फेकून दे तो किडा! तो तृष्णेचा किडा आहे. त्याला घरी नेलं तर बाबा रागावतील.” तेव्हा सदाफुली म्हणाली, “हा चकाकणारा किडा मला खूप आवडलाय. मी याला माझ्या कमरेच्या बटव्यात ठेवेन. मग तो कुणालाही दिसणार नाही.”
राजाने मुलींचा केलेला सन्मान पाहून माळ्याच्या बायकोला अगदी आकाश ठेंगणं झालं, पण माळी मात्र थोडा नाराजच होता. त्याच्या नाराजीच कारण थोड्याच वेळात बायकोच्या लक्षात आलं. कारण कधीही न भांडणाऱ्या मुली वस्त्रांच्या आणि दागिन्यांच्या वाटणीवरून भांडू लागल्या.
माळ्याने मग ती सारी वस्त्रे, आभूषणे बासनात गुंडाळून ठेवली. मोठया दोन्ही मुली गप्प बसल्या. पण सदाफुली म्हणाली,
“तुम्ही कधी दिलीत आम्हाला एवढी उंची वस्त्रे आणि दागिने? आता फुकट मिळाली ती सुद्धा घेऊ देत नाही.” तिचे उदगार ऐकून माळी म्हणाला,
“ज्यामुळे घरातलं प्रेम नाहीसं झालं त्या वस्तू काय कामाच्या? यापेक्षा कितीतरी मौल्यवान गोष्टी मी तुम्हाला दिल्या आहेत.”
“मौल्यवान गोष्टी? म्हणजे प्रेम आणि तुमचे ते लाखमोलाचे संस्कार, हेच ना? असल्या गोष्टींना काय पैसे थोडेच पडतात? सदाफुली तावातावाने म्हणाली. त्यावर माळी म्हणाला,
“मला जेवढ शक्य होतं तेवढ मी तुम्हाला दिलं आहे. यापेक्षा श्रीमंती आयुष्य जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते स्वकर्तृत्वाने मिळवावं? “पण सदाफुली आता पूर्ण बदलून गेली होती.आणि हिच्यापुढे बोलणे व्यर्थ आहे हे माळ्याला कळून चुकले.रोजची बागेतली कामे आता तिला आवडेनाशी झाली.
एकदा सकाळी सकाळीच ती वैतागून म्हणाली, “रोजच झाडांना पाणी घालायचे, बाग झाडायची आणि तेच सुती कपडे परत परत धुवून वापरायचे. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा!”
तिचे हे उद्गार तिच्या बटव्यातल्या तृष्णेच्या किड्याने ऐकले आणि तो म्हणाला, “तुला यापेक्षा सुखी जीवन हवं आहे काय? कोणाची मुलगी व्हायचं आहे तुला? ” यावर सदाफुली म्हणाली, “मला नगरातल्या सर्वात श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी व्हायचंय. मला काहीतरी वेगळ जगण हवंय. जसं सतार वाजवणं आणि चांदण्यातून नौकाविहार करणं!”
तृष्णेच्या किड्याने मग सदाफुलीचा आत्मा श्रीमंत व्यापाऱ्याच्या सगळ्यात धाकटया मुलीच्या शरीरात सोडला. या घरात सदाफुलीचे काही दिवस अगदी मजेत गेले.
खाणेपिणे, मौजमजा सर्व काही होते. ती संध्याकाळी सतारीच्या झंकारत हरवून जायची. चांदण्यातला नौकाविहार तिच्या हृदयात आनंदाची कारंजी फुलवायचा. तिच्या बहिणी स्वत:च्याच तालात असायच्या. प्रत्येकीच विश्व वेगळं होतं. प्रत्येकीला मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य होतं… पण एकाच घरात असूनही बहिणी बहिणींचा आई वडिलांचा कधी एकमेकांशी सुसंवाद नसायचा. कुणालाच कुणाशी कसलं कर्तव्य नव्हतं. सदाफुलीला या सगळ्याचा कंटाळा आला.
ती म्हणाली, “छे! हे कसलं जगणं? दु:खात राहूदे पण आनंदातही कोणी सहभागी होत नाही.” तृष्णेचा किडा मग तात्काळ तिच्या कानात कुजबुजला, “तुला राजाची मुलगी व्हायचं आहे काय?” तेव्हा सदाफुली अत्यानंदाने म्हणाली, “हो मला राजाची मुलगीच व्हायचंय!या जगातली सगळ्यात सुखी मुलगी आहे ती!”
तृष्णेचा किडा तर वाटच पाहत होता. त्याने ताबडतोब सदाफुलीचा आत्मा राजकन्येच्या शरीरात सोडला. सदाफुलीला राजा राणी अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपायचे.सेवेला सतत दासदासी असायचे. तिच्या भोवती सदैव रक्षकांचा पहारा असे.कारण ती एका राजाची एकुलती एक लाडकी मुलगी होती. तिचा जीव लाखमोलाचा होता. तिला एकटे फिरण्याचेही स्वातंत्र्य नव्हते. हळूहळू याबांधीव बंदिस्त जीवनाचाही तिला खूप कंटाळा आला. तिला आठवायचे तिच्या आईवडिलांसोबतचे ते सुखाचे दिवस! पहाटे पाचपासून सुरु होणारा दिवस,रोजच बघायला मिळणारी सूर्योदयाची शोभा! कष्ट केल्यानंतर अमृतासम वाटणारी भाजी भाकरी. काळजी घेऊन वाढवलेल्या झाडाला फूल किंवा फळ आल्यानंतर होणारा अवर्णनीय आनंद!
एके दिवशी सदफुली मग खूप उदास झाली आणि म्हणाली, “मला हे असलं बांधीव जीवन नको आहे. मला माझ्या पूर्वीच्या आईवडिलांची सदाफुलीच व्हायचंय.” त्यासरशी तृष्णेचा किडा किरकिरला, “तू एक असंतुष्ट मुलगी आहेस, कितीही सुखाच जीवन मिळालं तरी तू कुरकुरणारच! खरेतर तुला जगण्याचा अधिकारच नाही.”
नाही! नाही! मला सदाफुली म्हणून जगायचंय. त्यासाठी वाट्टेल ते करेन मी.”
“तुला फक्त एक कराव लागेल.”
“काय करावं लागेल मला?”
“तुला टेकडीखालच्या खडकावर सतत वर्षभर उभं रहावं लागेल. तेही हसऱ्या चेहऱ्याने.”
“हो मी उभी राहीन, हसतमुखाने उभी राहीन.” सदाफुली काकुळतीला येऊन म्हणाली. तेव्हा तृष्णेचा किडा म्हणाला, लक्षात ठेव, जर तुझ्या चेहऱ्यावरच हास्य मावळलं, तर मी तुझ्या शरीरात प्रवेश करेन. अगदी कायमचा!” त्याच्या या उद्गारांनी सदाफुली शहारली आणि म्हणाली, “मी उभी राहीन, सतत वर्षभर उभी राहीन! सतत हसेन!”
त्यावर्षी हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडली. बोचऱ्या वाऱ्याने सदाफुलीची सतेज काया काळवंडली. रूक्ष झाली. तरीही ती हसऱ्या चेहऱ्याने उभीच होती.त्यानंतर उन्हाळा आला. अगदी कडक भाजून काढणारा उन्हाळा. सदाफुलीच्या अंगाची लाही लाही
झाली.तिचे तळपाय उन्हात पोळू लागले. आग मस्तकाला जाऊन भिडली.पण तरीही ती शांतच होती. हसतच होती. घामाच्या धारांनी, उन्हाच्या झळांनी तिचं अरीर रापल, निस्तेज झालं…पण चेहरा मात्र हसरा होता. सदैव फुललेला.
त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यावर्षी पावसाने नेहमीपेक्षा जास्तच उच्छाद माजवला. सोसाट्याच्या वाऱ्याने मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर लहान लहान झाडांची काय कथा? नदीला पूर आला. त्या प्रचंड लोटात सर्व नगर वाहून गेले. अगदी राजाचा राजवाडा सुद्धा. पण टेकडीच्या पायथ्याशी त्या खडकावर मात्र सदाफुली हसत उभी होती. तिच्या शरीरातलं उरलसुरलं त्राणही आता नाहीसं झालं होत.
अखेर एक क्षण असा आलाकी तिच्या शरीरातली सर्व उर्जा संपली.ती खाली कोसळली. तिचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. पण तिच्या चेहऱ्यावरच फुललेलं हास्य मात्र त्याही अवस्थेत कायम होतं.
काही दिवसांनी पूर ओसरला. पण घरे उध्वस्त झाली होती. बागा उजाड झाल्या होत्या. अन्नपाण्याविना मालयाचे कुटुंब टेकडीवर जीव मुठीत धरून बसले होते. जेव्हा पूर ओसरला तेव्हा माळी टेकडी उतरून खाली आला. तेव्हा त्याला तिथे एक हसरं फुल एका हिरव्यागार रोपात्यावर डोलत असलेलं दिसलं.
माळ्यानं त्याचक्षणी ओळखलं की हीच माझी सदाफुली. आजही सदाफुलीच सतेज हसरं फूल सतत डोलत असतं. कठीण परिस्थीतही आनंदानं जगण्याचा संदेश देत असतं.