नको पावसात अरण्यरुदन आवेगाने कोसळ तू
आषाढी डोळ्यांसम बरसत अवघ्या देही ओघळ तू
लाटांवरती चक्रीवादळ उसळे हृदयातील उचंबळ
भरली घागर डोईवरची हिंदकळे अन भिजते चुंबळ
अवघड वळणाच्या घाटावर आभाळातुन वीज कडाडे
कोमल काळिज हलता क्षणभर भात्यासम मृदु ऊर धडाडे
डोंगरमाथ्यावरती छाया काळोखा आलिंगन देते
वेळू बनचे अवखळ वारे पापण्यांस चुम्बाया येते
गडगडणाऱ्या मेघालाही वेड असावे तन स्पर्शाचे
म्हणुन एकटे तुला गाठुनी रूप घेतसे तो धारांचे
उचल गोपिके जलद पावले वाट पाहते तुझीच गोकुळ
रिती जाहली घागर भरण्या वाटेवर राधेचे राउळ
मात्रावृत्त – १६+१६=३२ मात्रा