This is an article or a work of fine writing. In this fine writing the author describes some of the sweet memories of her childhood days shared with her father, mother, sister and brother.
ओंजळ -ललित… पूर्वप्रसिद्धी-तृप्तीची तीर्थोदके डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे गौरवग्रंथ, एप्रिल २००८
‘दादांविषयी गौरवग्रंथ काढायचा आहे. त्यासाठी तुझा लेख हवा आहे ‘ असा माझा भाऊ डॉ. महावीर याचा एका सकाळी सकाळीच फोन आला. “किती दिवसात तयार होईल?”
त्याने विचारले आणि वाटले, की दादांविषयी लिहायचे म्हणजे नेमके काय लिहायचे?किती लिहायचे? नेमकी कोठून सुरुवात करायची? त्यांच्या विषयीच्या माझ्या भावना, त्यांचा विलक्षण संवेदनशील स्वभाव, सर्वच कुटुंबीयांवर असलेलं त्याचं अबोल प्रेम, त्यांनी आमच्यावर केलेले अव्यक्त संस्कार एका छोटयाश्या लेखातून मी काय व्यक्त करणार? त्यांच्याविषयीच्या सगळ्याच आठवणी, त्यातल्या अगदी बारीकसारीक बारकाव्यासहित माझ्या मनाच्या सांदी कोपऱ्यात दडून बसलेल्या आहेत. प्रत्येक उत्कट आनंदाच्या क्षणी किंवा अतीव दु:खाच्या उदासवाण्या क्षणीसुद्धा त्या कधी उफाळून वर येतात तर कधी हळुवारपणे पाझरत राहतात. सर्वांनाच शब्दात नीटसपणे पकडता आलं तर लेखच काय पण भलामोठा ग्रंथच तयार होईल.
दादांविषयी मला आठवणारी सर्वात जुनी आठवण! त्यावेळी आम्ही बारामतीत राहायचो. मी साधारणपणे साडेतीन-चार वर्षांची असेन. दादा मिटींगसाठी पुण्याला निघाले होते. मी अंगणात शेजारी राहणाऱ्या माझ्या मित्राबरोबर, अभ्युदयबरोबर त्याची लाल रंगाची तिचाकी हवी म्हणून हुज्जत घालत होते.
जाता जाता दादांनी विचारले, “सोनू तुला पुण्याहून येताना काय आणू?” भांडण सोडून थोडावेळ मी थांबले. सुरेखाच्या जुन्या चित्रकलेच्या वहीत मी काही चित्रे काढली होती. पण ती मनासारखी जमली नव्हती. सुरेखा व महावीर हरवते म्हणून त्यांच्याजवळचे खोडरबर देत नसत. मी धावतच दादांकडे गेले आणि म्हणाले, “दादा, मला खूप मोठं निळ्या रंगाचं खोडरबर आणा.” दादा हसले आणि टांग्यात बसून निघून गेले.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ असावी. पाऊस धो-धो कोसळत होता. खिडकीत उभी राहून मी पाऊस पहात होते…आणि दारापुढे टांगा थांबला. टांग्यात पांढऱ्या शर्टवर काळा कोट आणि पांढऱ्या रंगाचा सूट घातलेले दादा पायावर पाय टाकून तिरके बसले होते, आणि …शेजारी होती निळ्या रंगाची नवी कोरी तिचाकी सायकल!
खिडकीतून इतक्या दिवसांपूर्वी मी पाहिलेलं ते सुंदर दृष्य, आजसुद्धा माझ्या डोळ्यासमोर अगदी जस्संच्या तस्सं उभं राहतं. माझ्या आयुष्यातली ती पहिली पावसाळी निळीभोर आठवण. प्रत्येक पावसाळ्यात ती माझ्या मनात मोरपिसाऱ्यासारखी दाटून येते… आणखीनच गडद गडद होत जाते. त्या आठवणीने माझं फक्त बालपणच नाही तर तारुण्य आणि प्रौढत्वसुद्धा समृद्ध केलं. त्यानंतरच्या आयुष्यात अशा कित्येक रंगीबेरंगी आठवणी माझ्या हृदयात साठत गेल्या. या आठवणी म्हणजे केवढा मोठा अनमोल खजिना आहे.
दादा मिटींगसाठी पुण्याला गेले म्हणजे आमच्यासाठी पुस्तकांचे गठ्ठेच आणायचे. त्यात खूप खूप गोष्टींची पुस्तके असायची. गांधीजी, नेहरू, टिळक यांची चरित्र असायची. रशियन परीकथा, पर्शियन चित्रकथा, सिंदबादच्या सफरी, पंचतंत्र, बिरबलाच्या गोष्टी…अशी कितीतरी प्रकारची पुस्तके असायची. लहानपणी दादांनी आमच्यावर केलेले हे वाचनसंस्कार आज अगदी पावलोपावली उपयोगी पडतात.
घरात दादांच्या खोलीत त्यांची स्वत:ची तीनचार पुस्तकांची कपाटे भरलेली होती. अगदी न कळत्या वयातसुद्धा बरचसं शब्दबंबाळ आणि तत्त्वजड वाचनही आम्ही करायचो. दादा घरात नसलेकी आम्ही तिघेजण अक्षरश: त्या पुस्तकांवर तुटून पडायचो. कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, ललित निबंध, समीक्षात्मक लिखाण, अगदी जे जे मिळेल ते ते फक्त वाचत सुटायचो. पण घेतलेली पुस्तके अगदी आठवणीने, काढलेल्या जागीच ठेवायला लागायची.पुस्तकांच्या जागा बदललेले दादांच्या लगेच लक्षात येई आणि ते त्यांना बिलकुल चालत नसे.
दादाचं बरचसं लिखाण धार्मिक विषयांवर आहे. त्यामुळे बऱ्याचजणांना वाटतं की, आमच्या घरातलं वातावरण जुनाट व कर्मठ वळणाचं असेल पण कुणालाही कल्पना नसेल इतक्या मुक्तपणे, स्वछंदपणे आम्ही वाढलो. रूढ अर्थाने परंपरेच्या चौकटीत बसणारे धर्मसंस्कार त्यांनी आमच्यावर कधी केले नाहीत. पण त्यांच्या व सौ. आईच्या नित्य आचरणातून वागण्या बोलण्यातून काय चांगले, काय वाईट हे आपोआपच काळात गेले.
धर्म म्हणजे काय? अधर्म म्हणजे काय? हे कळण्यासाठी आम्हाला धर्मशास्त्रावरची बोजड पुस्तके वाचायची कधी गरजच पडली नाही. दादांच्या व आईच्या रूपाने अगदी चालतेबोलते, सहजसोप्या भाषेतले धर्मग्रंथ आमच्या डोळ्यासमोर सतत असताना त्यासाठी वेगळं काही वाचायची गरजच काय होती? त्यातूनच आम्ही आमच्या परीने धर्म शिकत गेलो. घरात सतत माणसांची वर्दळ असे. आजही असतेच. त्यात आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, व्यापारी, शेतकरी, कष्टकरी असे सर्वचजण असतात. विशेष म्हणजे या साऱ्यांशी आईचेही दादांपेक्षा जरा जास्तच जिव्हाळ्याचे व मोकळेपणाचे संबंध आहेत.
दादांनी स्वत:ची कुठलीच मते कोणावरही कधी लादली नाहीत. मी इंजीनियारिंगचे शिक्षण घेतले तो माझा निर्णय होता. लग्नानंतर मी नोकरी न करता क्लासेस घेतले. तो निर्णयही माझा स्वत:चाच होता. त्याकाळात रोजच्या वर्तमानपत्राखेरीज माझे वाचन शून्य होते. पण तरीही त्या घाईगर्दीच्या धकाधकीच्या काळातही माझ्यात खोलवर आत एक कवीमन सुप्त रूपाने जिवंत होतं. ते कशामुळे? माझ्या मनावर दादांनी केलेले वाचनसंस्कार असे सहजासहजी का पुसले जाणार होते?
निमित्त मिळताच माझ्यात झोपलेली बीजरूप लेखिका तरारून वर आली. तीर्थंकर मासिकाचे संपादक, श्रेणिक अन्नदाते यांनी मला लिहिते केले. तीर्थंकर मासिकातून मी जैनकथा लिहू लागले. मी पहिली जैनकथा लिहिली तेव्हा दादांनी प्रथमच माझं शब्दांद्वारे कौतुक केलं. पण त्याच बरोबर हे ही सांगितलेकी “जैनकथा लिहायची असेल तर प्रथम जैन धर्म-तत्वज्ञान मुळापासून समजावून घ्यायला हवं. त्यातल्या पारिभाषिक शब्दांचे सम्यक अर्थ समजावून घ्यायला हवेत. सुदैवाने जैन धर्माचा अभ्यास करण्याची संधी मला क्षु. ध्यानसागरजी महाराज यांच्या निगडी चातुर्मासात मिळाली. मी तिचा पुरेपूर लाभ घेतला.
त्या काळात पूज्य महाराजांची प्रवचने मी फक्त ऐकली नाहीत तर त्यांचं आकंठ प्राशन केलं. त्या काळात मी विविध व्रते घेतली. उपवास केले. पुजाविधीतले बारकावे जाणून घेतले. आहारदानाचा आनंद मिळवला. जैनत्वाच्या एका वेगळ्याच अंगाचा मी अनुभव घेतला. धर्माचा आणखीन एक वेगळा अर्थ मला हळूहळू उमगत गेला. दादांनी यातही मला कधी विरोध केला नाही.
त्यानंतर “गझल” या काव्य प्रकाराशी माझी ओळख झाली आणि मी गझलेच्या प्रेमातच पडले. उत्कट भावपूर्ण गझलांमधून प्रेमाचे सारे रंग मी व्यक्त केले. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या गझला मी लिहिल्या. अजूनही लिहीतेच आहे. त्या काळात काहीजण मला विचारायचे, ” तुम्ही सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या कन्या ना? मग या गझला वगैरे तुम्ही कशा काय लिहिता? तुमच्या वडिलांना हे कसं काय चालतं?” ऐकून मला मनातल्या मनात खूप हसू येई. मजा वाटे. ती मजा काही वेगळीच होती.
काही तथाकथित धर्मरक्षकांना मी मोकळेपणाने केलेले गझललेखन म्हणजे जणू काही माझ्या पापकर्मांचा उदयच वाटला. पण तरीही मी गझला लिहीतच गेले. थाटामाटात गझलसंग्रह प्रकाशित केला आणि तो खऱ्या अर्थाने जैनत्व जाणणाऱ्या माझ्या आईदादांनाच अर्पण केला. दादांनी माझा गझलसंग्रह अगदी मनापासून वाचला. त्यांना तो खूप आवडला.
ते म्हणाले, “अगदी मनापासून जे वाटतं ते निर्भयपणे लिहित रहा. ताठ मानेनं रहा!” आणि हे ऐकून माझ्या मनातल्या पुसटश्या शंकाकुशंकाही पार धुवून निघाल्या. आज मी माझ्या संसारात पूर्ण समाधानी आहे. माझ्यात जे काही चांगले गुण आहेत ते माझ्या आईदादांकडून मला मिळाले आहेत व जे काही दुर्गुण आहेत ते माझ्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ आहे असं मी मानते… आणि म्हणूनच अहंकार आणि भीती या शब्दांना मी माझ्या शब्दकोशातून हद्दपार केलं आहे. आज गौरवग्रंथासाठी माझ्याकडून ही आठवणींची भरलेली ओंजळ!