निशांत – NISHANT


This story is based on Jain philosophy. In Jain dharm Women can attain Moksha. In this Story it is told that Widows also have right to wear colourful clothes and ornaments. People in the society should treat them respectfully.

समकालीन मराठी जैन कथासंग्रह – भाग ५ : अभिषेक
प्रथमावृत्ती- ऑक्टोबर- २००१
संपादन- श्रेणिक अन्नदाते
प्रकाशक- सुमेरू प्रकाशन
कथा- निशांत, लेखिका- सुनेत्रा नकाते

चंदना बायकांच्या गराडयात बसली होती. अंगावरचा मोरपिशी बुट्टेदार शालू, हातातल्या हिरव्या बांगडया, बांगड्यांमध्ये दिमाखाने मिरवणारे बिलवर, बांगड्यांच्या मागेपुढे एकमेकाशी स्पर्धा करणारे गोठ, पाटल्या आणि तोडे, गळ्यातले चारपदरी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, दंडात वाक्या आणि कमरेला कमरपट्टा…

मार्गशिर्षातल्या त्या बोचऱ्या थंडीतही चंदनेला घाम फुटला होता. क्षणभर तिला वाटलं, फेकून द्यावं हे दागिन्यांचं ओझं आणि जावं पश्चिमेकडच्या त्या निळ्या डोंगरावर- मुक्तपणे झेप घ्यावी त्या निळ्या निळ्या आकाशात, पक्षी होऊन!

पण छे! कसं शक्य होतं ते आता! कारण ती आता चंदना देशमाने नव्हती. ती होती आता धामणगावच्या पाटलांची सून, सौभाग्यवती चंदना पाटील!

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमारेषेवर असलेलं धामणगाव हे कृष्णेच्या काठावरील छोटंसं सधन गाव. सुजलाम सुफलाम भूमी, पश्चिमेला असणारा छोटासा डोंगर, डोंगराच्या पायथ्याशी असणारी हिरवीगार झाडी…निसर्गाचा असा वरदहस्त लाभलेल्या या गावातील एक धर्मवत्सल बडी असामी देवगौडा पाटील! पंचवीस-तीस एकर बागायती जमीन, केळी व पेरूच्या बागा, आंबेराई आणि याशिवाय  साखर कारखान्याचे चेअरमन पद! घरात लक्ष्मी पाणी भरीत होती.

या देवगौडा पाटलांची एकुलती एक सून चंदना! सुनेला पहायला गावातल्या बडया बडया मंडळींच्या बायका जमल्या होत्या. शोभेच्या बाहुलीसारखी पाटावर बसलेली चंदना अन भोवतालच्या बायकांच्या तिच्यावर रोखलेल्या नजरा! त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे ते वाकबाण!

“आमचा सुदर्शन कसा अगदी लाखात देखणा. अगदी एक नंबर मुलगी मिळाली असतीहो त्याला.”

“अहो आक्का, लाखांनी हुंडा देणाऱ्या एकीपेक्षा एक देखण्या घरंदाज मुलींची रांगच लागली होती… पण ही आजकालची मुलं, त्यांचं बाई सगळंच वेगळं. कोणाला पसंत करतील नेम नाही.”

“अन लग्न केलं तेही रजिस्टर! मुलीकडच्यांना काय, त्यांच्या फायद्यातच पडलं. ना मानपान, ना जेवणावळी, ना रुखवत.”

“जाऊदे म्हणा, झालं ते ठीकच झालं. सुनबाईचे वडील साधे शाळामास्तर. देऊन देऊन काय देणार? झाकली मुठ सव्वा लाखाची!”

 चंदनेला अगदी कसेसेच झाले. इतका वेळ प्रयत्नपूर्वक शांत राहिलेली ती मनातून चांगलीच भडकली होती. तिला वाटलं, उठावं आणि या तोंडाळ बायकांवर चांगलच तोंडसुख घ्यावं. पण मग लगेचच तिच्या मनात विचार आला, की मग त्यांच्यात  आणि माझ्यात फरक तो काय राहिला?

 पाणी प्यायचं निमित्त करून ती स्वयंपाकघरात आली. आत इंदुआत्या संध्याकाळच्या व्हासाची तयारी करीत होत्या. इंदुआत्या म्हणजे आप्पांची म्हणजे देवगौडा पाटलांची दूरच्या नात्यातली विधवा बहिण. गावातच रहायची. दोन्हीवेळेच्या स्वयंपाकासाठी वाडयावर यायची.

स्वयंपाकघरात घुटमळनाऱ्या चंदनेला पाहून ती म्हणाली, “अगं पोरी, त्या बायकांकडे तु लक्ष नको देत जाऊस. त्यांना ही असली सवयच आहे. नवऱ्याच्या जीवावर यांचा हा तोरा. दुसऱ्याची उणीदुणी काढण्याशिवाय करतात काय या दुसरं? काम ना धाम!”

चंदना बाहेर आली. अजूनही बायकांचा कलकलाट चालूच होता. तेवढयात बस्तीतून पंडित आले. नव्या सुनेला त्यांनी आशीर्वादाचा नारळ दिला आणि चंदनेला अगदी सुटल्यासारखं झालं. आज सकाळी घरात शांतिकपूजा होती. त्यानंतर पुढे पद्मावतीची ओटी व नंतर नव्या सुनेची ओटी भरण्यात दिवस गेला. पाटावर बसून चंदनेचं अंग अगदी अवघडून गेलं होतं. आईंची म्हणजेच सासूबाईंची परवानगी घेऊन चंदना हळूच माडीवर सटकली.

माडीवरची तिची ती नीटनेटकी सुबक खोली! आत जाताच तिला अगदी मोकळं मोकळं वाटलं. तिने खिडकी उघडली. गार वार्याच्या झुळकीने अंग शहारले. टेबलावर तिचा अन सुदर्शनचा मोठा फोटो होता. फोटोतला सुदर्शन तिच्याकडे पाहून मिश्कील हसत होता. आणि…मग गेल्या दहाबारा दिवसात घडलेल्या सार्या घटना तिच्या डोळ्यापुढून एखादया चलतचित्राप्रमाणे सरकू लागल्या.

पुण्यात दिगंबर जैन वधूवर मेळावा होता. सहज मैत्रिणींबरोबर चंदना तेथे जाते काय आणि सुदर्शनची गाठ पडते काय! सुदर्शन देवगौडा पाटलांचा एकुलता एक मुलगा. अमेरिकेत सोफ्टवेअर इंजिनियरची नोकरी, आई आप्पांना भेटण्यासाठी गावी आल्यावर मित्राच्या आग्रहावरून पुण्याला वधूवर मेळाव्याला आला. अगदी सहजच!

तिथे त्याने चंदनेला पाहिलं. सवल रंग, काळेभोर लांबसडक केस, टपोरे भावपूर्ण शांत डोळे अन त्या डोळ्यातलं ते विलक्षण तेज! जणू आषाढातल्या कृष्ण्मेघात चमकणारी विद्युल्लताच! ती आली तिने पाहिलं आणि जिंकलंसुद्धा!

सुदर्शनने आई-आप्पांना बोलावून घेतलं. मानसशास्त्र  घेऊन एम.ए. झालेली, विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवलेली चंदना आप्पांना सून म्हणून अगदी मनापासून आवडली. पण… आई मात्र जरा नाराजच होत्या. कारण एकतर चतुर्थ-सैतवाल विवाह, शिवाय घराणेही तोलामोलाचे नाही. आणखी बरीच कारणे होती.

पण आप्पांचा निश्चय अगदी ठाम होता. चंद्नेचे दादा, म्हणजे देशमाने गुरुजी एक पापभिरू सात्विक व्यक्तिमत्व! आईविना पोर चांगल्या घरात पडली म्हणून त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सुदर्शनला लगेच परत जायचं होतं.म्हणून निवडक पाहुण्यांना बोलावून लग्न नोंदणी पद्धतीनेच केलं. एकुलत्या एका मुलाचं लग्न पण कसला थाटमाट नाही की हौसमौज नाही. आईंची नाराजी त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवे. किती किती स्वप्नं रंगवली होती त्यांनी, लाडक्या लेकाच्या लग्न सोहळ्याची, विहीन म्हणून मिरवण्याची! ना हुंडा ना दागदागिने, पण फक्त दादांनी केलेले लाखमोलाचे संस्कार घेऊन चंदना सासरी आली आणि चारपाच दिवसांनीच सुदर्शन अमेरिकेला रवाना झाला.

दोघांचा सहवास अगदी उण्यापुऱ्या चारपाच दिवसांचाच…पण या थोडयाच दिवसात दोघंही मानाने किती जवळ आले होते. जायच्या आदल्या रात्रीच तो तिला म्हणाला होता, “अजून चारपाच महिन्यात तुझा व्हिसा अन पासपोर्ट मिळालाकी, मी तुला घेऊन जाईन.”

“खरंच, मलाही खूप आवडेल तिकडे यायला. तिथले लोक, त्यांची भाषा, संस्कृती अगदी जवळून पहायला मिळेल. पण तिथे कायमचं रहायला मला नाही आवडणार!”

“अगं, मी तरी कोठे कायमचा चाललोय तिकडे? तीन, चार वर्षात आपण परत येऊ. तेथे असताना रविवारी सकाळी चर्चमधून येणारा घंटानाद ऐकलाकी माझ्या मन:चक्षूसमोर माझीच बालमूर्ती तरळते. मी मनाने येथे केव्हा पोहोचतो आणि अभिषेक करणाऱ्या आप्पांच्या बाजूला बसून घंटा केव्हा वाजवू लागतो ते माझं मलाच कळत नाही.” सुदर्शन समरसतेने बोलत होता. त्याचा हात हातात घट्ट धरून चंदना तल्लीनतेने ऐकत होती.

“अगं किती झालं तरी मायभूमीच्या मातीची ओढ आणि स्वधर्माचे संस्कार अगदी रक्तात भिनलेले असतात बघ! माझ्या तिथल्या अभारतीय मित्रांना, आपल्या धर्मातील शाकाहाराबद्दल, अहिंसा तत्वाबद्दल केवढं कौतुक वाटतं. पण इथे आल्यावर मी कधी कधी पाहतो, आपल्या धर्मातलं मूळ तत्वज्ञान आपण हरवत चाललोय. नको त्या गोष्टींना पकडून बसलोय. चंदना, आता आपण हे सगळं बदलवलं पाहिजे.”

“हो! मलाही अगदी असंच वाटतंय!” चंदना अगदी उत्स्फूर्तपणे म्हणाली,  “महात्मा गांधी म्हणाले नव्हतेका,

‘ मला माझ्या घराला सर्व बाजूंनी भीती घालायच्या नाहीत आणि खिडक्या बंद करून घ्यायच्या नाहीत. सर्व देशातील संस्कृतीरूपी वारे शक्य तेवढ्या मुक्तपणे माझ्या घरातून वहात राहिले पाहिजे परंतू त्यापैकी कोणी माझ्या अस्मितेला धक्का पोहोचू द्यायला माझा ठाम विरोध आहे.’

“गुरुजींची कन्या शोभतेस खरी!” सुदर्शन हसत हसत म्हणाला.

सुदर्शन अमेरिकेला गेला अन अन तो भला मोठा चौसोपी वाडा चंदनेला अगदी सुना सुना वाटू लागला. भलंमोठं स्वयंपाकघर! त्यात अगदी पाटावरवंट्यापासून मिक्सर, फ्रीज आणि अगदी ओव्हनपर्यंत सगळी नवीजुनी मंडळी एकत्र नांदत होती. घरात स्वयंपाकासाठी इंदुआत्या यायची. वरच्या कामासाठी दोघीजणी बायका होत्या. घरात शेतावरची गडी माणसं यांची सतत वर्दळ असायची.

माडीवर अगदी सुरुवातीलाच आप्पांची खोलीवजा अभ्यासिका होती. भिंतीवर एका बाजूला महात्मा गांधी व दुसऱ्या बाजूला इंदिरा गांधी यांची मोठी तैलचित्रे होती. बाजूच्या मोठया लाकडी कपाटात विषयवार लावून ठेवलेले ग्रंथ आणि पुस्तके होती. त्यात अगदी नित्य-नैमित्तिक क्रियांची पुस्तके, सामायिकपाठ आणि समयसारापासून १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम आणि ‘आनंदी गोपाळ’ यासारख्या अनेक कादंबऱ्या होत्या.

त्यानंतर चंदनेची खोली होती. खोलीतली ती पश्चिमेला उघडणारी खिडकी आणि तिथून दिसणारा निळाशार डोंगर! रोजच सायंकाळी त्या डोंगरापलीकडे होणारा  सूर्यास्त तिच्या खोलीच्या खिडकीतून

 सहज दिसे.

 सूर्यबिंब हळूहळू पश्चिम क्षितिजावर सरकू लागलेकी आकाशात पंचरंगांची  जणू उधळणच होई आणि मग लाल, सोनेरी, तांबूस, केशरी रंगांनी तो निळा निळा डोंगर न्हाऊन निघे…तिला मात्र तो रोजच सायंकाळी उंच-विशाल गोमटेश्वरावर होणारा जणू महामस्तकाभिषेकच भासे.

निसर्गाच्या साक्षीने अस्ताला जाणारे ते सूर्यबिंब आपल्या तेजाची, रंगाची त्या बाहुबलीवर मुक्तहस्ताने जणू उधळणच करी; आणि मग ते नयनरम्य दृश्य पाहता पाहता चंदनेच्या मनाचं पाखरू चंद्रगिरीच्या डोंगरावर जाऊन बसे.

लहानपणी श्रवणबेळगोळला गेल्यावर दादांच्या कडेवर बसून मान उंचावून पाहिलेली ती भव्य-दिव्य मूर्ती, तिचे ते विशालपण तिला आठवे. त्यावेळी तिचे डोळे किती आश्चर्याने विस्फारायचे आणि मन उंच उंच उडू लागायचं. श्रवणबेळगोळपासून जवळच असलेलं होम्बुज गाव! तिथली पद्मावती म्हणजे तिच्या आईचे आराध्यदैवत!

त्यादिवशी पद्मावतीचे दर्शन घेऊनच तिचे दादा, आई आणि ती गाडीत बसले. पण…ती रात्र मात्र काळरात्रच ठरली. रात्रीच्या अंधारात प्रवाशांना घेऊन जाणारी ती मिनीबस एका झाडावर आदळली. सुदैवाने चंदना आणि दादा वाचले पण आईचा आत्मा मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेला.

एक निष्पाप हसरं बाल्य अकालीच कोमेजून गेलं… चंदनेचे ते काळेभोर डोळे सतत कोणालातरी शोधत असत. तिची ती अवस्था पाहून दादांना तर अगदी भडभडून येई. पण त्यांनी स्वत:चे  दु:ख गिळले.

त्यांनी ठरवले, आता मीच चंदनेची आई आणि मीच तिचा पिता!

झाडलोट, स्वयंपाकपाणी, चंदनेची वेणीफणी, तिला शाळेत पोहोचवणं आणि मग स्वत:ची शाळा! दादांना दिवस पुरत नसे. तरीही रोज रात्री झोपताना दादा तिला गोष्ट सांगायचे. एकदा रात्री झोपताना दादांनी तिला गोष्ट सांगितली. धरणेन्द्र आणि पद्मावतीची!

“जैन धर्मातील तेविसावे तीर्थंकर भ. पार्श्वनाथ यांनी एकदा मरणासन्न नाग-नागिणीला णमोकार मंत्र ऐकवला. त्यामुळे पुढच्या भवात त्या नाग-नागिणींना धरणेन्द्र देव आणि पद्मावती देवीचे पद प्राप्त झाले. पुढे जेव्हा भ.पार्श्वनाथ घोर तप करू लागले तेव्हा त्यांचा पूर्वभवातला शत्रू कमठासूर  त्यांना त्रास देऊ लागला. त्यांच्या तपश्चर्येत अडथळे आणू लागला. त्यावेळी मग धरणेन्द्र आणि पद्मावती वर धावून आले. त्यांनी पार्श्वनाथांवरचे संकट दूर केले.”

चंदना मन लावून ऐकत होती. तिने विचारले, “म्हणजे आपण जर पद्मावतीची पूजा केली तर ती आपलेसुद्धा रक्षण करतेना? मग तिने आपल्या आईला का बरं नाही वाचवलं? “

चिमुकल्या चंदनेचा हा प्रश्न ऐकून दादांचा स्वर कातर झाला. पण त्यांनी स्वत:ला सावरले. ते म्हणाले, “अगं देवदेवता काय आपले आयुष्य थोडेच वाढवतात? ते फक्त आपले मनोधैर्य वाढवतात. म्हणूनच आपण कठोर संकटांशी सामना करू शकतो. डोंगराएवढं दु:खही सहन करू शकतो. “मग त्या दिवसापासून किचनमधल्या लाकडी देव्हाऱ्यातली फोटोतली पद्मावती आई, बहिण, सखी सर्व काही बनली. शाळेत बाईंनी शाबासकी दिली किंवा कधी कुणी मैत्रीण भांडलीकी

चंदना त्या फोटोपुढे जाऊन आपलं मन मोकळं करायची. ज्यावेळी सुदर्शनशी लग्न ठरलं तेव्हाही  आपल्या मनातला आनंद तिने तिच्यापुढेच व्यक्त केला होता. इथेतर कितीतरी मोठं देवघर होतं. लखलखीतझुंबर,चंद्रप्रभूंची मूर्ती, मस्तकावर नागफणा धारण केलेली पद्मावती,सतत तेवणाऱ्या समईचा मंद प्रकाशआणि चहूकडे दाटलेला धुपाचा दरवळ;मन कसं अगदी प्रसन्न होई.

सकाळी आप्पा स्वत: धूतवस्त्रे नेसून पंचामृत अभिषेक करीत आणि मगच नित्य कामाला बाहेर पडत. इथे आल्यापासून चंदनेचं इंदूआत्याशी अगदी पटकन सूत जुळलं. रोज सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक करता करता तिच्या अन इंदूआत्याच्या गप्पा चालित.

इंदूआत्याला दोन मुली अन एक मुलगा होता. अगदी तरूण वयातच इंदूआत्याचा नवरा काविळीच्या आजाराने अकस्मात गेला. इंदूआत्यावर आभाळ कोसळलं. घरची थोडी शेतीभाती होती. ती कुळांना लावून तिने मुलाला चांगलं शिक्षण दिलं. बऱ्यापैकी स्थळे बघून मुलींची लग्ने केली.
“आता दोन वर्षापूर्वी मुलाचेही लग्न झाले आणि त्याला मुंबईत चांगली नोकरीपण लागलीय.” इंदूआत्या सांगायची.
“मग आत्या तुम्ही का नाही जात मुंबईला?”
“नाही बाई, ते दोघं खूप बोलवतात! पण मला आपलं इथं या गावातच बरं वाटतं. शेतीचं थोडंफार धान्य येतं. स्वयंपाकाचेही थोडेफार पैसे मिळतात. माझं आपलं बरं चाललंय. संध्याकाळी इथून गेल्यावर बस्तीत जाते. आरती झाल्यावर पंडित पुराण सांगतात. म्हाताऱ्या जीवाला आता यापेक्षा आणखी काय हवं असतं बाई?”
“तशी मागल्या उन्हाळ्यात एकदा गेले होते बघ! पण काय सांगू बाई तुला? तिथे मुंबईत गाडयांची ही गर्दी आणि माणसांचे नुसते लोंढे वाहत असतात. शिवाय घरात सदानकदा तो टी.व्ही.चा कर्णा चालू! अगदी चारपाच दिवसातच पळून आले बघ.” असं म्हणून इंदूआत्या अगदी खळखळून हसायची.
तिचं ते खळाळत्या निर्झरासारखं हसणं भोवतालचं वातावरण कसं अगदी प्रसन्न करून टाकी.

पण आईंच्या चेहऱ्यावर साधं स्मितहास्य फुललेलंही कधी चंदनेने पाहिलं नव्हतं. गोरापान केतकी वर्ण, सरळ धारदार नाक, किंचित पिंगट डोळे, अंगावर नेहमी भरगच्च दागिने, डोक्यावरून घेतलेला पदर, ऐटबाज चालणं, असं त्याचं सगळंच रेखीव आणि आखीव होतं. त्या फारशा कधी बोलतच नसत. सोवळं, व्रत वैकल्ये यात त्या सतत गुंगून गेलेल्या असायच्या. नाहीतर मग पंचक्रोशीत कुठेतरी एखादी पंचकल्याणिक पूजा असायचीच.

शुभ अशुभाच्या त्यांच्या कल्पना मोठ्या अजब होत्या. एकदा चंदना चुकून मंगळसूत्र घालायला विसरली तर त्यावरून त्या केवढया संतापल्या.
मळ्यात जानू नावाचा गडी होता. आंब्याच्या दिवसात राखणीसाठी म्हणून बाहेरच झोपला होता. अंगावर वीज पडून तो दगावला. मळ्यातल्या खोपटात त्याची तरुण विधवा, तिचं दहाबारा महिन्याचं तान्हं मूल, जानूची म्हातारी आंधळी आई राहत असत. वाड्यावर काही समारंभ असलाकी बाहेरची झाडलोट, जास्तीची धुणीभांडी करायला शेवंता येई. त्यावेळी तिचे हडकुळे, दुबळे मूल सतत किरट्या आवाजात रडत राही. मग आईंचा अगदी संताप होई. त्या शेवंता आणि तिच्या पोराचा अगदी उद्धार करीत. म्हणत,
“दळभद्री मेली! पांढऱ्या पायाची! लग्न करून दोन वर्षातच जानूला गिळून बसली. आणि हे पोरगं जन्मलं आणि बापाला गिळून बसलं.
एकदा अशीच एका कोवळ्या सकाळी शेवंता आली. तिच्या हातात मोगऱ्याच्या फुलांनी भरलेली टोपली होती. आज बस्तीत कसलंसं विधान होतं. त्यासाठी फुलं लागणार होती. त्या फुलांकडे आणि शेवंताकडे चंदना आळीपाळीने पहातच राहिली. म्हणाली,
“शेवंता किती छान दिसतेस गं तू? अगदी या फुलासारखी सतेज आणि टवटवीत!”

यावर शेवंता हसली पण तिच्या हसण्याला असलेली कारुण्याची किनार चंदनेच्या भावूक मनाला जाणवल्याशिवाय राहिली नाही. ती म्हणाली,
“शेवंता अजून उभं आयुष्य जायचय तुझं. कशी एकट्याने जगणार तू या जगात?” त्यावर शेवंता अगदी सहजपणे म्हणाली,
“अवो वैनीसाब तसा बगाया गेलं तर आमच्यात तुमच्यावानी अवगड कायबी नसतं बगा! पयल्या दादल्याशी नाय पटलं तर सरळ त्याला सोडचिट देऊन म्होतूर लाऊन मोकळं व्हत्यात. त्यापायात बापानं मला सांगावाबी धाडलाय, दोनदा. पण वैनीसाब…हे माजं लेकरू, ह्याला त्यो दुसरा दादला पोटाच्या पोरावानी कंदीतरी बगलका? आन माज्या जानूची म्हातारी.. तिला काय वाऱ्यावर सोडू?”

शेवंताचे बोलणे ऐकून चंदना क्षणभर चकित झाली. सरळ मनाच्या त्या खेडूत स्त्रीचे ते सहजोद्गार! स्त्रीच्या अंतरंगातली निष्ठा, प्रेम आणि वात्सल्यभावच दाखवत नव्हते का? चंदना विचार करू लागली…आणि याउलट आई! दैवाने त्यांच्यावर सौंदर्य, संपत्ती, समृद्धी यांची अगदी खैरात केलेली. पण कुठेतरी उणीव भासायची. स्त्रीच्या अंतरंगातली उपजत ममता ना त्यांच्या डोळ्यात दिसायची ना त्यांच्या बोलण्यातून जाणवायची.
त्यांच्या या असल्या वागण्याचं चंदनेला मोठं नवल वाटे. आप्पांसारख्या प्रेमळ आणि धर्माचं कधीही अवडंबर न माजवणाऱ्या माणसाच्या सहवासात राहूनही या इतक्या कोरड्या कशा राहिल्या? एक स्त्री आपल्यासारख्याच दुसऱ्या एका स्त्रीचा इतका द्वेष कसा काय करू शकते? तेही केवळ ती विधवा आहे म्हणून?

मग आईंची पद्मावती कोण आहे? केवळ सौभाग्याचे संततीचे आणि संपत्तीचे दान देणारी एक मूर्ती? आईंच्या श्रद्धेत आणि मनात पद्मावतीचे स्थान असेच आहेका? पण माझी पद्मावती तर याहून खूप वेगळी आहे. हृदयात दाटलेला निराशेचा अंधार दूर करणारी ती एक प्रकाशज्योत आहे.

भ. महावीरांनी दाखवलेल्या वाटेवरून चालणारी आम्ही जैनधर्मीय मंडळी मग ती श्वेतांबर असो दिगंबर, चतुर्थ असो वा पंचम, स्त्री असो वा पुरुष, एवढे मात्र निश्चित जाणतोकी आपलं वर्तमान आपल्या हाती आहे आणि आपलं भविष्य आपणच घडवायचं आहे. पण…आईंच्या मनात पसरलेला हा अंधश्रद्धेचा अंधार कसा दूर होईल? तेथे प्रेमाचा प्रकाश कसा पसरेल? मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या चंदनेच्या मनात विचारांचं असं वादळ उठे.

दिवस जात होते. पौष महिन्यात चंदना माहेरी जाऊन आली. दादांच्या भेटीने तिच्या अंतरंगातील खळबळ थोडी शांत झाली. पाहता पाहता माघही संपला. हळूहळू थंडी ओसरू लागली. त्यानंतर मग फाल्गुन आला. झाडांच्या कुशीत लपलेल्या त्या छोटयाश्या गावात निसर्ग जणू रंगपंचमी खेळू लागला.

त्यानंतर मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण करीत वसंत आला. मळ्यातल्या आंब्यांच्या झाडांवर शुभ्र-धवल मोहोर फुलला. भरदुपारी आंबेराईतून कोकिळा गाऊ लागल्या. चंदनेच्या मनातील विरहव्यथा आणखीनच गडद करू लागल्या. दिवस जातच होते. वसंतानंतर ग्रीष्माचा कडक बरसू लागला. सूर्य आपल्या अनंत करांनी धरित्रीवर तेजाचा वर्षाव करू लागला आणि मग …एका सायंकाळी आकाशात ढगांचा गडगडाट झाला. तप्त धरणीला शांत करण्यासाठी वळीव आला. वादळवाऱ्यासहित दोन-तीन तास चाललेला गारांचा पाऊस, आकाशात चाललेलं विजेचं नर्तन, निसर्गाचं ते रौद्र रूप चंदना खिडकीतून अनिमिष नेत्रांनी पहात होती. ओल्या मातीचा तो गंध श्वासात भरून घेत होती.
पुण्यात असतानाही हा पहिल्या पावसाचा मृद्गंध तिने अनेकवेळा हुंगला होता. पण इथे या छोटयाश्या गावातील साधी सरळ खेडूत माणसे, त्या मातीशी एकरूप झालेली त्यांची भाबडी मने, त्या मातीचं ते भिजलेपण, तो गंध किती वेगळा! मग तिला आठवत इंदिरा संतांच्या त्या भावोत्कट काव्यपंक्ती –
“रक्तामध्ये ओढ मातीची,
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती,
मातीचे मम अधुरे जीवन!”

इथे तिने या ओळी अगदी मनापासून अनुभवल्या. त्यानंतर मग चातुर्मास आला.
आईंची तर अगदी व्रतवैकल्यांची धांदल उडाली. बस्तीत चातुर्मासासाठी अजितमती माताजींचे आगमन झाले. पुरणावरणाचा स्वयंपाक करण्यात इंदुआत्या दंग झाली आणि…
अचानक श्रावणातल्या पहिल्या सरीच्या आगमनाबरोबरच एका संध्याकाळी सुदर्शनचा फोन आला….महिनाअखेरीस मी येतोय, तुला बरोबर घेऊन जाण्यासाठी! आणि मग चंदनेचा आनंद गगनात मावेनासा झाला. अगदी ओसंडून वाहू लागला.

तिला वाटलं, या अवखळ श्रावण सरींसारखं आपणही अंगणात जाऊन नाचावं, गावं. ती मग धावतच खाली आली. आई देवघरात होत्या. उद्यापासून त्यांचं संपत शुक्रवारचे व्रत होते. त्याची तयारी चालली होती. ती देवघरात गेली आणि सहजपणे आईंना म्हणाली,
“आई, मीही तुमच्याबरोबर व्रत करू का?” आईंनी तिच्याकडे आश्चर्याने पहिले. आणि मग किंचित हसत त्या म्हणाल्या,
“करना मग! त्यासाठी परवानगी कशाला हवी? पण केलंस तर सोवळं-ओवळं, व्रतविधी व्यवस्थित करावा लागेल. एकासन करावं लागेल.”
“हो, करेन मी! अगदी मनापासून करेन.” ती निश्चयाने म्हणाली. आणि… त्याचक्षणी मनात आलेल्या एका वेगळ्याच विचाराने ती चमकली. थोडावेळ तिने स्वत:चंच मन जणू जोखलं…पण त्याच क्षणी तिचा निश्चय अगदी पक्का झाला.

दुसऱ्या दिवशी पार्श्वनाथ तीर्थंकरांची यथायोग्य पंचामृत अभिषेकपूजा झाली. पार्श्वनाथांच्या मूर्तीला वेदीवर ठेवल्यानंतर पद्मावतीच्या मूर्तीला आसनावर विराजमान केले. तिला वस्त्रालंकारांनी सजवून तिचे पूजन केले. दीपधूप, फुलांचे हार यामुळे देवघर आज किती शोभिवंत वाटत होते. चंदनेने आईंबरोबर हळद-कुंकू भिजाणे घालून देवीची पूजा केली. तिला मणी-मंगळसूत्र वाहिले. शेवटी देवीची आरती म्हणून पंडितांनी विसर्जन केले. पंडितांनी घरभर गंधोदकाचे सिंचन केले.

पाहता पाहता शेवटचा शुक्रवार जवळ आला. यावर्षी आईंच्या व्रताचं उद्यापन होतं. दोनच दिवसांपूर्वी सुदर्शनही आला होता. चंदना अगदी आनंदात होती. व्रताच्या उद्यापनाशिवाय तिला दुसरं काही सुचतच नव्हतं. सुदर्शनबरोबर बोलतानाही ती याच विषयावर बोले. शेवटी तो म्हणालाही,
“चंदना, अगं किती दिवसांनी भेटतोय आपण? तुला नाही वाटत माझ्या भोवती भोवती रहावं, कानाशी गुजगोष्टी कराव्यात?” यावर चंदना फक्त हसली. त्यावर तो म्हणाला,
“मलातर वाटलं होतं, तुझ्यामुळे आई थोडीफार बदलेल. पण इथेतर तूच आईमुळे बदलली आहेस.” यावर किंचित अंतर्मुख होत चंदना म्हणाली,
“कोणास ठाऊक कोण बदललं आहे आणि कोण कोणाला बदलवणार आहे? पण खरं सांगू, पूजा करताना मनाच्या चैतन्यविभोर अवस्थेत कधीकधी मी हे घर विसरते, देवघर विसरते, पद्मावतीची मूर्तीही विसरते आणि क्षणकाल का होईना पण…मी स्वत:चही अस्तित्व विसरते.”

“वा! वा! खूपच छान! पण बाईसाहेब, स्वत:ला विसरा पण मलामात्र विसरू नका हं!”असं म्हणून सुदर्शन हसू लागला.

शुक्रवारी अगदी पहाटेपासूनच उद्यापनाची तयारी सुरु झाली. बस्तीतून पंडित आले. पंचकोनी कुंभाची स्थापना करून पाच कळस मांडले. चारी दिशेला केळी-कर्दळीचे खांब उभारले. दिव्यांच्या कमानी केल्या.

अभिषेक, व्रतविधी, अगदी मनासारखा पार पडला.त्यानंतर मग पद्मावतीचे विधान झाले. पंडितांचे मंत्रोच्चार आणि घंटेचा मंगल निनाद! किती मंगलमय वातावरण झाले होते.सुवासिनींना देण्यासाठी चंदनेने द्रोणपुष्पात कुंकू आणि मोती घालून वायन तयार केले.

त्यानंतर घरात अजितमती माताजींचा आहार झाला. स्वच्छ शुभ्र सोवळे नेसून चंदनेने आज प्रथमच आहार दिला. कसलाही अंतराय न येता आहार व्यवस्थित पार पडला.
त्यानंतर दिवाणखान्यात सवाष्णजेवणाची तयारी सुरु झाली. रंगीत पाट मांडले होते. चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली होती. समयांचा मंद प्रकाश आणि उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. हळूहळू गावातल्या बडयाबडया मंडळींच्या बायका येऊ लागल्या. त्या येताच त्या दिवाणखान्याचे स्वरूपच पालटले. अहंकाराचा दर्प जणू सगळीकडे जाणवू लागला.

“चंदना, हळदीकुंकू लाव सगळ्यांना! मगच करूयात जेवणं.” आई म्हणाल्या. त्यावर चंदना म्हणाली,
“थांबा आई, मीही दोघीजणींना बोलावलंय आज! त्या आल्याकी मग लावेन हळदीकुंकू सर्वांना! मग करूयात जेवणाला सुरुवात.” त्यावर आई म्हणाल्या,
“हो का? कोणाला एवढं खास निमंत्रण दिलेस बाई? आणि हो… परसदारी तुझी ती लाडकी शेवंता आलीये. तुझ्याकडे काही काम आहे म्हणत होती. बघून ये लवकर काय म्हणतेय ती? नाहीतर टपकायची इथेच! आणि सर्वांना तिचे ते पांढरे कप्पाळ पाहायला लागेल!” त्यावर गावपेठेतल्या चेलनामावशी म्हणजे- आईंच्या खास पाहुण्या, म्हणाल्या,
“होय हो मालुताई, येताना पाहिलं मी त्या शेवंतेला! काय रूप दिलंय हो देवाने तिला? आणखी राहतेपण कशी टापटीप! पण काय उपयोग? फुटक्या कपाळाची मेली!”

बायकांची ही मुक्ताफळे चंदना शांतपणे ऐकत होती. पण मनात मात्र विचारांचे वादळ उठले होते. तिच्या चेहऱ्यावरचे ते शांत पण निश्चयी भाव जणू वादळापूर्वीची शांतताच दाखवित होते. ती तशीच शांतपणे आत गेली आणि थोडयाच वेळात एका हाताने शेवंतास अन दुसऱ्या हाताने स्वयंपाकघरात घामेजून गेलेल्या इंदूआत्यास तिने जवळजवळ ओढीतच बाहेर आणले. मग आईंकडे पहात ती म्हणाली,
“आई, या दोघींना बोलावलंय मी सवाष्ण म्हणून आज!”
“काय? या दोघींना सवाष्ण म्हणून बोलावालास तू आज?” अंगावर वीज पदवी तश्या आई किंचाळल्या. त्यावर चंदना म्हणाली,
“हो आई! या दोघी मला खरेच सवाष्णच वाटतात. कारण त्याचं जे काही भाग्य आहे ते त्यांनी स्वकष्टाने मिळवलंय! नवऱ्याच्या श्रीमंतीवर मिळालेलं आयतं सौभाग्य नाही त्यांचं! तुम्ही लाख त्यांना पापी म्हणत असाल. पण असं वागून तुम्ही सर्वजणी पापाचा संचय करीत आहात… त्याचं काय?” हे ऐकताच दोघी बायका उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या,
“पाटलीणबाई सुनेला आवर जरा! अगदीच हाताबाहेर गेली आहे हो?”
“असा अपमान करायला बोलावलं आम्हाला इथे? चांगलं उद्यापन करता आहात हो व्रताचं! भोगाल आता त्याची फळे!” बायकांचे हे बोलणे ऐकून आई रागाने लालबुंद झाल्या. ओरडू लागल्या. थरथरू लागल्या.

“माझ्या आजपर्यंतच्या साऱ्या व्रताचरणात माती कालवलीस तू आज! आता यापुढे एक क्षणभरही या घरात थांबू नकोस!” आईंचा स्वर अगदी टिपेला पोहोचला होता. तो आवाज ऐकून आप्पा आणि सुदर्शन धावतच खाली आले. तेथे चाललेलं ते विलक्षण नाटय पाहून आप्पा तर जिन्यातच थबकले.सुदर्शन गोंधळलेला होता. सारे लक्षात येऊन चंदनेच्या या विक्षिप्त वागण्याचा त्यालाही भयंकर रागच आला. तो म्हणाला,

“हा असला तमाशा करायची काय गरज होती तुला? नाही पटत तुला असल्या गोष्टी तर व्रत करण्याचे नाटक तरी कशाला केलेस? माझ्या आईच्या श्रद्धेला असा भलत्या वेळी अचानक धक्का देऊन तू काय साधलेस? किती मनस्ताप देते आहेस तू तिला?
“श्रद्धा? या असल्या आंधळ्या अहंकाराच्या खतपाण्याने पोसलेल्या श्रद्धेला तुम्ही श्रद्धा म्हणता? ज्या श्रद्धेमुळे इंदूआत्या आणि शेवंतासारख्या कित्येक बायकांच्या कोमल भावना पायदळी तुडवल्या जातात त्या श्रद्धेला असा सुरुंगच लावायला हवा!” चंदना ठामपणे म्हणाली. हे ऐकून आई रागाने बेभान झाल्या. त्यांचे ओठ कापू लागले. त्या किंचाळल्या,
“सुदर्शन, हिला आत्ताच्या आत्ता माहेरी पोचतं कर. मला तर तुझं हे लग्न पहिल्यापासूनच पसंत नव्हतं. ही या घरातून गेल्याशिवाय पाणीसुद्धा घेणार नाही मी!”
“कुणी कोणाला पोचतं करायची गरज नाहीये. मी स्वत:च जाईन, पण त्याआधी इंदूआत्या आणि शेवंताला सवाष्ण म्हणून जेऊ घालेन! त्यानंतरच घराबाहेर पडेन! बघू कोण अडवतंय मला?” शांत वाटणाऱ्या चंदनेचा हा आवेश पाहून सुदर्शन चकित झाला. त्याला काहीच सुचेना. पण आईंचा मात्र तोल सुटला.
“कोण अडवतं तुला? या घराची मालकीण अडवते मी तुला! असे म्हणत त्या त्वेषाने पुढे झाल्या. त्या चंदनेचा हात धरणार तोच तो हात तिने अगदी वरच्यावर पकडला. तिच्या नाजुक मनगटातलं ते बळ आणि डोळ्यातलं ते विलक्षण तेज, जणू सळसळणारी नागीणच! तिच्या नजरेला नजर देणं आईंना अशक्य झालं. त्यांना घाम फुटला. त्यांचे पाय लटपटू लागले.

“नागीण! नागीण आहे ही!” वात भरल्यासारख्या त्या किंचाळू लागल्या. त्यावर शांतपणे चंदना म्हणाली,
“होय, असेन मी नागीण! पण तुम्ही जिच्यापुढे सौभाग्याचे, संततीचे आणि संपत्तीचे दान मागता ती पद्मावतीसुद्धा पूर्वभवात नागीणच होतीना? हे ऐकताच आई गपकन खाली बसल्या. सुदर्शन त्यांच्याकडे धावला. त्याच्याकडे पहात चंदना पुढे म्हणाली,
“अहो, ही पद्मावतीची मूर्ती, आपल्याला जीवन देणाऱ्या क्षमाशील धरित्रीचं प्रतिक नाही वाटत तुम्हाला?
“हिच्या हातातली ही हिरवी कंकणं धरित्रीच्या अंगावर फुललेल्या हिरव्या वनश्रीचं, सृजनाचं प्रतिक नाही वाटत तुम्हाला?”
“हिच्या माथ्यावर शोभणारा हा लालभडक कुंकवाचा टिळा, धरित्रीच्या माथ्यावर तळपणारे जणू सूर्यबिंबच नाहीका?” चंदनेचे काव्यात्म संस्कार जणू उत्स्फूर्तपणे व्यक्त होत होते. इंदूआत्याचा हात हातात धरून ती म्हणाली,
“ही इंदूआत्या! नवऱ्याच्यामागे ज्या हातांनी कष्ट करून तिने मुलांच्या आयुष्यात हिरवे मळे फुलवले, त्या वज्रासारख्या कठीण पण प्रेमाचा स्पर्श देणाऱ्या त्यांच्या हातात ही हिरवी कंकणे किती शोभून दिसतील!”

“म्हाताऱ्या सासूसाठी आणि तान्ह्या बाळासाठी आपल्या तारुण्याची होळी करणारी ही शेवंता! हिच्या अंतरंगात पेटलेली आत्मशक्तीची धगधगती ज्वाला, तिच्या कपाळावर कुंकवाच्या रूपाने सतत तेवत रहावी असं नाही वाटत तुम्हाला?”
“कुंकू, बांगडया, मणिमंगळसूत्र ही सारी सौभाग्यचिन्हे सबल स्त्रीच्या अंगावरच शोभून दिसतात. मग ती सधवा असो की विधवा!”
सारेजण अवाक होते. चंदनेचे कोंडलेले मन जणू मुक्त होत होते. ती बोलत होती…
“आपल्या बुद्धीच्या जोरावर, कुशल नेतृत्वाच्या जोरावर, भारताचे पंतप्रधानपद भूषवणाऱ्या इंदिरा गांधी, दत्तकपुत्राला पाठीशी बांधून देशरक्षणासाठी प्राण पणाला लावून लढलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई, या सधवा नसतील पण भारताच्या भूषण होत्या.”
“मग अगदी वेदपूर्व काळातही विद्याविभूषित असणाऱ्या ब्राम्ही आणि सुंदरीचा वारसा सांगणाऱ्या आम्ही जैन स्त्रियांनी परंपरेच्या चौकटीत अडकून का पडावे?”
“आजही आपण पतीच्या ऐश्वर्यामुळे सौभाग्यवती ठरलेल्या सूरसुंदरीपेक्षा, स्वसामर्थ्याने, प्रबळ इच्छाशक्तीने पतीचेही भाग्य बदलणाऱ्या मैनासुंदरीची स्तुतीगीते सिद्धचक्रविधान करून गातो. ती कशासाठी? अशी फक्त स्तुतीगीते गाऊन आपले भाग्य थोडेच का बदलणार आहे?”
“परंपरेच्या चौकटी आपण जरूर सांभाळाव्यात. पण…जर त्यामुळे आपल्यासारख्याच हाडामासांनी बनलेल्या या बायकांची मने कुस्करली जात असतील तर त्या चौकटी मोडूनच काढायला हव्यात. कारण कोणाचे मन दुखावणे हे सुद्धा एक पापच नाहीका?”

चंदना बोलत होती. तिच्या मुखातून जणू शब्दांचा प्रपात कोसळत होता. पायरीवर उभे आप्पा, गप्प पण चिंतनमग्न आणि शांत होते.
ऐकता ऐकता आई अचानक उठल्या आणि इंदूआत्याच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागल्या. सुदर्शनने आईचे असे रडणे कधी पहिले नव्हते. चंदनेचे बोलणे पटत असूनही त्याला तिच्या या वागण्याचा रागच आला होता. थोडावेळ सारेच गप्प होते. आई मात्र रडतच होत्या. रडत रडत बोलू लागल्या,
“माझी आई! माझी आईसुद्धा एक विधवाच होतीहो इंदूआत्या! घराच्या अडगळीच्या खोलीत एका अंधाऱ्या कोपऱ्यात ती पडून असायची. माझी आजी आणि आत्या तिचा येत जाता पांढऱ्या पायाची म्हणून उद्धार करायच्या.”

आईंच्या तोंडून तो करुणार्द्र सूर ऐकून सगळ्यांनीच कान टवकारले. मध्येच स्फुंदत आई सांगत होत्या,
“लहानपणापासूनच नकळत मीही तिचा दुस्वास करू लागले. तिच्या जवळ जायचे टाळू लागले. तरुणपणीच वैधव्याची कुऱ्हाड कोसळलेल्या त्या अभागी अश्राप जीवाचा मीच एक आधार होते.”
“पुढे माझं लग्न झालं. माझा संसार फुलला, मोहरला. त्याबरोबर माझ्या मनातला अहंकारही फुलत गेला.”
“एकदा मी माहेरी गेले होते. आत्या आणि आजी माझ्या सासरच्या वैभवाचे आणि माझ्या भाग्याचे खूप कौतुक करीत होत्या.”

“एकदा अशीच माझी आई त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर आली. मला पाहून रडू लागली. म्हणाली,
“पोरी, मला तुझ्या सासरी एकदा घेऊन चल. तुझा भरला संसार मला डोळे भरून बघायचाय.” तेव्हा मी म्हणाले,
“काही नको, माझ्या भरल्या संसारावर तुझी सावलीसुद्धा नको आहे मला.” आणि पोटच्या पोरीचे ते शब्द ऐकून ती खाली कोसळली. दोन महिने तिने अंथरून धरलं आणि…त्यातच ती गेली! माझ्या आईचा मीच अपमान केला आणि त्यातच ती गेलीहो इंदूआत्या!”
आई रडत होत्या. ओक्साबोक्शी रडत होत्या. वर्षानुवर्षे हृदयातात सलणारी व्यथा मोकळी होत होती. अश्रूंचा महापूर लोटला होता. त्या अश्रूंनी त्यांच्या अंतरंगातला अहंकार पार धुवून निघाला होता. काळोखाचे साम्राज्य संपले होते. निशांत झालं होता आणि तेथे नव्या जाणिवेची प्रभात फुलली होती.

“चंदना, तू जिंकलीस. मी हरले.” आई शांतपणे म्हणाल्या.
“नाही आई, मला जिंकायचंही नव्हतं आणि तुमचं व्रत असं उधळायचही नव्हतं.” चंदना म्हणाली.

“तुम्ही व्रते जरूर करा. सवाष्णजेवणे घाला. पण कोणाचं मन दुखवू नका. शेवंता काय किंवा इंदूआत्या काय, त्यांना तुमच्याकडून सवाष्णजेवणाची मुळीच अपेक्षा नाही. त्यांना जरुरी आहे ती फक्त मायेच्या प्रेमळ शब्दांची, आत्मसन्मानाची!

“खरं म्हणतेस तू चंदना, पण मी ठरवलंय…आज मी स्वत: इंदूआत्या आणि शेवंताला सवाष्ण म्हणून जेवू घालणार आहे. मग या समाजाने मला वाळीत टाकले तरी चालेल.” आईंचे ते शब्द! चंदनेला भरदुपारी अंगावर चांदणे बरसावे तसे वाटले. तिच्या चेहऱ्यावर आनंदाची समाधानाची पौर्णिमा फुलली होती. तिने नकळत वर पहिले.
इतकावेळ जिन्याच्या पायरीवर एक शब्दही न बोलता उभे असलेले आप्पा, त्यांच्या ‘धरणेंद्राच्या’ या वल्लभेकडे मोठ्या कौतुकाने पहात होते. जवळ येऊन उभ्या राहिलेल्या सुदर्शनच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. चंदनाच्या मनातील भाव व्यक्त होण्यासाठी धडपडत होते.

“सॉरी हं सुदर्शन!….” तिला म्हणायचं होतं आणि “आप्पा, मला क्षमा कराल?” असं आप्पांना उद्देशून विणवायचही होतं. पण त्या दोघांनाही तिच्या शाब्दिक अभिव्यक्तीची आता गरजच नव्हती.
सवाष्ण म्हणून आलेल्या गावातल्या साऱ्याजणी मात्र केव्हाच निघून गेल्या होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.