हळदीकुंकू – HALADIKUNKU


STORY-HALADIKUNKU
This is a story of an illiterate woman. Although the woman is illiterate, she is mentally strong. After the death of her husband, she stands up firmly to face the challenges in her life. She plays the role of both mother and father to her children. The story appeared in the akshararang puravani, Lokmat News paper in the year 2000 and 12th, Women’s edition (2005-06) of ‘Swanand’ magazine.

१२ वा महिला विशेषांक, स्वानंद २००५-२००६

भाजी मंडईच्या  बाहेरच्या फुटपाथवर सुगडी आणि बोळकी विकणाऱ्या बायकांना पाहिले आणि मग तिच्या लक्षात आले, संक्रांत दोन दिवसांवर आली म्हणायची तर! अलीकडे तिचे हे असेच व्हायचे. तिचा नवरा दोन वर्षासाठी अमेरिकेला गेला आणि तिच्या वागण्या-बोलण्यातला, जगण्यातला पूर्वीचा उत्साह, चैतन्य पार नाहीसे झाले.

 यावर्षी दसरा, दिवाळी, दशलक्षण पर्व आले आणि गेले. पण यावर्षी ना दिवाळीने तिच्या हृदयात दिवा पेटवला, ना दशलक्षण पर्वात तिच्या  मनातली ज्योत उजळली. दिवाळीत प्रत्येक वर्षी पहाटे पाचला मंदिरात जाऊन निर्वाण लाडू चढवणारी ती यावर्षी सकाळी सहा वाजले तरी अंथरुणातच होती.

 दहावीत शिकणारी  तिची मुलगी आणि कॉलेजात शिकणारा मुलगा म्हणालेही, “आई यावर्षी तू कुठल्याच गोष्टीत पूर्वीसारखा रस घेत नाहीयेस. बाबा दोन वर्षांसाठी युसए ला गेले म्हणून तुझ्यासारख्या द्विपदवीधर  बाईने एवढं झुरावं हे काही मनाला पटत नाही.” तिचे तिलाही कळत होते पण वळत मात्र नव्हते. खरेतर नवऱ्याशिवाय झुरण्याचे हे तिचे वय तरी होतेका?  नवरा अमेरिकेला जाण्यापूर्वीच त्याने आणि मुलांनी मिळून तिचा चाळीसावा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा केला होता. मुले आणि तो किती आनंदात होते.

नवऱ्याची तर सतत बडबड चालायची. त्याची कंपनी, तिथले सहकारी, वर येण्यासाठी चाललेले राजकारण; आणि या सर्वातून पुढच्या वर्षासाठी अमेरिकेला जाण्यासाठी त्याची झालेली निवड! खूप उत्साहाने तो बोलत रहायचा. तिकडून आल्यावर पगार किती वाढेल, कोणती नवीन कार घ्यायची, कुठल्या एरियात नवी घर घ्यायचे, यावर त्याची आणि मुलांची चर्चा रंगात येई. तिला त्यात काडीचाही रस नव्हता.

 गेली वीस-बावीस वर्षे त्याच्याबरोबर संसारात एकरूप होऊन गेलेली ती, त्याच्याशिवाय दोन वर्षे काढायची या कल्पनेनेच गळून गेली होती. नवऱ्यालाही तिची नाराजी दिसत होती. तिचा हळवा स्वभावही त्याला माहीत होता. त्याने तिला कितीवेळा समजावलेही, “अगं फक्त दोन वर्षांचा तर प्रश्न आहे. चुटकीसरशी निघून जातील दोन वर्षे!”

“पण खरेच एवढी जरुरी आहेका तिकडे जाण्याची? सध्याच्या पगारात आपण सुखी आहोतचना?” तिने भाबडेपणाने विचारले. तेव्हा तो म्हणाला, “तो प्रश्न नाही बाईसाहेब! पण आलेल्या संधीचा फायदा का नाही घ्यायचा? शिवाय…खरे तर तू आता माझ्यात एवढे गुंतून राहणे बरे नाही. ” तिचे डोळे नकळत पाणावले. तसा तो म्हणाला, तूही स्वत:ला कशात तरी गुंतवून घेना! पाहिजे तर त्या झोपडपट्टीजवळच्या समाजकल्याण केंद्रात जात जा. बघ एकदा जाऊन तरी, बरं वाटेल तुला!”

 त्यानंतर समाजकल्याण केंद्रात तिने नाव नोंदवले. रोज दुपारी दोन तास ती तिथल्या बायकांचे साक्षरता वर्ग घेऊ लागली. त्यांच्यात ती अगदी मिळून मिसळून गेली. त्यावर्षी संक्रांतीला तिने तिच्या वर्गातल्या सगळ्या बायकांना हळदी कुंकवाला बोलावले. वर्गातल्या गबाळ्यासारख्या दिसणाऱ्या बायका हळदी कुंकवाला मात्र अगदी नटून सजून आल्या होत्या.

 बाईंनी  आपल्याला घरी हळदी कुंकवाला बोलावले याचा कोण आनंद झाला होता त्यांना! तीसुद्धा खूप खूष होती. पण त्यानंतर महिन्याभरानेच नवरा अमेरिकेला गेला आणि तिच्या मनात फुटलेली कोवळी पालवी परत गळून गेली. कशातच लक्ष लागेना.

 मुलांच्या शाळा-कॉलेजातल्या गमती ऐकून पूर्वी खळखळून हसणारी ती वरवर तोंडदेखले हसायची. मुलांनाही ते जाणवायचे. सुरुवातीला दोघेही काहीतरी करून तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे.
पण ही काही मनापासून खुलायची नाही. मुलांनीही मग तो नादच सोडला आणि आपापल्या विश्वात रमून गेली.
“काय ताई? आज सकाळी सकाळी मंडईत!”
हातात भाजीने भरलेली पिशवी घेऊन आवटी बाई हसत होत्या. तीही मग कसनुसे हसली. तेव्हा आवटी बाई म्हणाल्या,
“अहो उद्या भोगीना? मिक्स भाजी करायची म्हणून सगळ्या भाज्या घेतल्या. अगदी शंभराची नोटसुद्धा कशी उडाली तेही कळले नाही.”
“होना, त्यासाठीच तर मीही आज मंडईत आले.” ती म्हणाली अन घरी आली.
“आई तिळाच्या वड्या कधी करणार?  आल्या आल्याच लेकीने प्रश्न विचारला.  “यावर्षी आणूयात विकतच्याच!” ती म्हणाली. दरवर्षी तिळाच्या पातळ सुरेख वड्या ती घरीच करायची. हलवा मात्र विकतच आणायची. नर्मदेतल्या  गोट्यासारखा तो पुडीतून मिळणारा विकतचा हलवा! तिला आठवले,

तिच्या लहानपणी तिची आई पांढराशुभ्र  काटेरी हलवा घरीच करायची. दर संक्रांतीला तिची आई आणि शेजारच्या काकी मिळून एकत्रच हळदीकुंकू करायच्या. काठापदराचे शालू नेसलेल्या, नाकात नथ घातलेल्या त्या दोघींना पाहून तिला चैत्रातल्या गौरीच आठवायच्या.

 आईबरोबर ती शेजारीपाजारी हळदीकुंकवाला हटकून जायचीच. तिथे मिळणारे वाण  खेळण्याच्या लाकडी खोक्यात भरून ठेवायची. लहानपणीचा तो भातुकलीतला संसार आठवून तिला हसू आले. शैशवातल्या आठवणींनी तिच्या मनावर जणू मोरपीस फिरले. बऱ्याच दिवसांनी ती स्वत:शीच प्रसन्नपणे हसली आणि मुलीला म्हणाली, “सोनू, यावर्षी संक्रांतीच्या दिवशीच हळदीकुंकू उरकून घेऊयात.”
तुलाही त्यादिवशी सुट्टी असेलना? तसं रथसप्तमीपर्यंत  केव्हाही केलं तरी चालतं. पण पुढे तुझी परीक्षाही जवळ येईलना?”
आईच्या  या बोलण्याने लेकीलाही आश्चर्य  वाटले. पण चेहऱ्यावर ते न दाखवता ती म्हणाली, “हो, हो करूयातना! तुझ्या केंद्रातल्या बायकांना आणि साक्षरता वर्गातल्या बायकांना पण बोलवूयात. मी जाऊन निमंत्रण देऊन येते!” आपली आई जरा माणसात आल्याचे पाहून लेकही सुखावली.

 संक्रांतीच्या दिवशी अगदी पहाटेपासूनच तिच्या अंगात हळदीकुंकू संचारले. सगळे आवरून तिने मंदिर गाठले. पायावर पाणी ओतून मंदिरात प्रवेश करताच तिने भगवंतापुढे माथा टेकला. जगाकडे अलिप्तपणे पाहणारी ती शांत वीतराग मूर्ती! अर्धोन्मीलित नेत्र, नासाग्र दृष्टी; पाहता पाहता तिचं मन शांत झालं. विचारांचे तरंग नाहीसे झाले.
भगवंतांच्या डाव्या बाजूला विराजमान झालेल्या शासनदेवतेला पद्मावतीला तिने हळदीकुंकू वाहिले आणि तिचे तिलाच नवल वाटले. बुवाबाजीवर, अंधश्रद्धेवर, निरर्थक कर्मकांडावर टीका करणारी ती पहातच राहिली. कपाळी हळदीकुंकू, हातभर  हिरव्या बांगडया, हिरवागार शालू, फुलांचे गजरे ल्यायलेली पद्मावती जशी साद घालायची तशीच तिच्यातला आत्मविश्वाससुद्धा जागवायची.

 संध्याकाळ झाली. नटूनसजून बायका येऊ लागल्या. कुणी एकट्यादुकट्या तर कुणी घोळक्याने येऊ लागल्या. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या काहीजणी गप्पात अगदी रंगून गेल्या होत्या. किती बोलू आणि काय बोलू असं प्रत्येकीलाच झालेलं. बंद सोसायटीच्या या युगात हळदीकुंकू म्हणजे बायकांना एक पर्वणीच! हसून बोलून मने मोकळी होत होती.

टेबलावरच्या वाणांचा ढीग कमी झाला होता. निवांतपणे बोलून तिचे मनही अगदी तृप्त झाले होते. त्यातच नवऱ्याचा फोनही आला. ती नेहमीपेक्षा खूष आहे हे त्यालाही जाणवले. रात्री झोपताना तिने तृप्त मनान अंथरुणावर पाठ टेकली. पण का कोण जाणे तिचा डोळाच लागेना. का ते कळत नव्हते पण मनाला एक विलक्षण हुरहूर लागून राहिली होती… आणि अचानक विचार करता करता तिला दुर्गा आठवली.
दुर्गाबाई, साधारण पंचवीस-तीस वर्षांची, साक्षरता वर्गात शिकायला यायची. इतर बायकांमध्ये आपल्या वेगळेपणाने उठून दिसायची.
दोन्ही हातात कोपरापर्यंत बांगडया, डोक्यावरून घेतलेला इरकली लुगड्याचा पदर आणि कपाळावर उठून दिसणारे ठसठशीत कुंकू! तिचा नवरा गवंडीकाम करायचा. त्याला कुठलेही व्यसन नव्हते.

राम-लक्ष्मणासारखी दोन सावळी गुटगुटीत मुलं होती. नवऱ्याच्या जेमतेम मिळकतीत ती टुकीने संसार करायची. गेल्यावर्षी सर्वांच्या आधी हळदी-कुंकवाला हजर झालेली दुर्गा आज का बरं आली नसेल? विचार करता करता तिला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी वर्गात दुर्गा दिसली नाही. वर्गातल्या बायकांना तिने त्याबद्दल विचारलेही. तेव्हा त्या म्हणाल्या, “अवो बाई, आता महिना होऊन गेलाकी ती यायचं बंद होऊन!” महिना झाला? मग माझ्या कसे लक्षात आले नाही? पण अलीकडे आपले तरी चित्त कुठे थाऱ्यावर असते? ती स्वत:शीच म्हणाली.

“दुर्गाचा नवरा अपघातात गेलाकी बाई! ट्रकवाल्याने त्याची सायकल उडवली आणि जाग्यावरच गेलाकी बिचारा! नवरा जिथं कामाला जायचा तिथंच दुर्गा आता कामाला जाते. गवंड्याच्या हाताखाली पाट्या उचलायचं काम करते.” बायकांनी ही बातमी सांगितली आणि ती परत सुन्न झाली. “दुर्गाला सांगा मी तिला घरी यायला सांगितलंय म्हणून.” असं म्हणून ती घरी आली.

त्यानंतरच्या रविवारीच दुर्गा दुपारी दारात हजर झाली. नेहमीसारखीच हसतमुख पण थोडीशी वाळलेली. डोक्यावरचा पदर तसाच पण पांढऱ्याफटक कपाळावर हिरवगार गोंदण उठून दिसत होतं. ती आली. नेहमीसारखीच खाली अंथरलेल्या चटईवर बसली आणि बोलायला लागली.
“बाई, तुमचा निरोप आला आणि लगोलग धावत यावं वाटलं बघा! अर्धा डाव सोडून कुंकवाचा धनी गेला. हातपाय गळाठले. जीव नकोसा झाला, पण दोन लेकरांकडे पाहिलं आणि जगण्याची उमेद आली.

गावाकडच्या भाऊबंदांनी तर जीव नकोसा केला. शहरगावात एकटी राहू नकोस. मुकाट्याने गावाकडे निघून ये, अश्या धमक्याही दिल्या.” दुर्गा बोलत होती आणि ती फक्त ऐकत होती.
“खरं सांगते बाई, आता मला कसलंच भ्या वाटत नाय. आता मी माझ्या पोरांना लई शिकवणार. माझ्या घरधन्याचं राहिलेलं सपान पुरं करणार!” किती आत्मविश्वासानं बोलत होती दुर्गा. मुलांच्या रक्षणासाठी जातीवाल्यांना धुडकावून परिस्थितीशी झुंजणारी एक वेगळीच दुर्गा होती ती.

 तिचं ते नवं रूप पाहून ती थक्क झाली. क्षणभर तिला वाटलं ही दुर्गा नव्हेच! ही तर मंदिरातली चतुर्भुज पद्मावती. तिच्यातला आत्मविश्वास जागवणारी, हृदयात दाटलेलं वात्सल्य आणि प्रचंड अशा शक्तीचा स्त्रोत! पद्मावतीच जणू! आणि मग भारावल्यासारखी ती नकळत उठली. देवघरातला करंडा घेऊन बाहेर आली. झाकण उघडलं आणि त्यातलं कुंकू घेऊन तिने दुर्गाच्या कपाळावर रुपायाएवढा ठसठशीत टिळा लावला… अगदी पहिल्यासारखाच! पण तरीही त्याहुनही खूप खूप वेगळा!

 दुर्गा हसली. अगदी मंद मंद स्मित केले तिने, जाईजुईच्या फुलांसारखे कोमल आणि सुगंधी! त्या हास्यात दडलेल्या सुगंधाने तिने आपला श्वास भरून घेतला. तिच्या हृदयाचा कोपरान कोपरा सुगंधित झाला. तिच्या हळदीकुंकवाची आज खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.