‘HUNKAR’ is a Marathi word. This means inner voice. Inner voice always pushes us to achieve perfection.
कथा- हुंकार पूर्वप्रसिद्धी- तारका (नियतकालिक) एप्रिल/मे/जून ,२००३ लेखिका-सुनेत्रा नकाते
सोनलनं जांभळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसणारा मोत्यांचा सेट घातला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप करून ओठांवरून लिपस्टीक फिरवली. बॉब केलेल्या केसांवरून कंगवा फिरवला. ड्रेसिंग टेबलाच्या त्या भल्या मोठ्या आरशात ती स्वत:चं रूप पुन्हा पुन्हा न्याहाळू लागली. आरशातल्या त्या छबीशी नकळत तिचं मन बोलू लागलं. बोलता बोलता झरझर पायऱ्या उतरीत अगदी मागे मागे गेलं. लग्न होण्यापूर्वी कशी होते मी? नको बाई, ती आठवणसुद्धा नकोशी वाटते आता. सोनल स्वत:शीच म्हणाली.
लग्नापूर्वीची सुमन अन आत्ताची सोनल! जुनं नाव नवऱ्याला आवडलं नाही म्हणून त्याने बदललं. नाव जरी नवऱ्यानं बदललं तरी पुढे मात्र तिची तीच बदलत गेली. रुपानं आणि मनानंही! पण मनानेही ती बदलली असं कसं म्हणता येईल? कारण लग्नापूर्वी तिला का कुठे स्वत:चं मन होतं? स्वत:चे विचार होते? दोन्ही खांद्यांवरून घट्ट ओढून घेतलेला साडीचा पदर आणि भरपूर तेल लावून चापून चोपून विंचरलेल्या केसांची पाठीवर रुळणारी लांबसडक वेणी; अशा थाटात मान खाली घालून रोज ती नियमितपणे कॉलेजला जायची. खूप खूप अभ्यास करायची. दिसायलाही तशी चार चौघींसारखीच होती. एस.एस.सी. परीक्षेत ती गुणवत्ता यादीत आली होती. तरीही तिने डॉक्टर, इंजिनियर व्हायची स्वप्नं कधी पाहिली नाहीत.
आई म्हणायची, मुलीच्या जातीला कशाला हवं एवढं शिक्षण? मुलींची लग्नं वेळच्या वेळीच व्हायला हवीत. तरीपण तिच्या वडिलांनी तिला आर्ट्स कॉलेजात घातलं. ते म्हणायचे, आज काल शिकलेल्या मुलांना निदान पदवीधर तरी मुलगी लागतेच. मुलीनं कुठलीतरी पदवी घेतली की ती लग्नाच्या बाजारात चटकन खपते. कॉलेजच्या त्या रंगीबेरंगी दिवसातही ती अगदी नाकासमोर पाहून चालत राहिली. मानस शास्त्र घेऊन बी.ए. झाली. दरवर्षी विद्यापीठात पहिली येत होत होती. त्यानंतर लग्न जमेपर्यंत काय करायचं म्हणून एम. ए. झाली. बी.एड.ही झाली.
कॉलेजचे ते रंगीबेरंगी दिवस तिच्यासाठी कृष्णधवलच होते. कॉलेजचं स्नेहसंमेलन, क्रीडास्पर्धा, परिसंवाद वगैरे गोष्टी तिच्यासाठी नव्हत्याच. नाटक सिनेमा गाणं बजावणं असल्या गोष्टी तिने कधी अनुभवल्याच नव्हत्या. नाही म्हणायला दरवर्षी भाद्रपदात येणाऱ्या पर्युषण पर्वात इतर बायका व मुलींबरोबर दहा दिवस ती रोज मंदिरात जायची. वेगवेगळ्या भरजरी साड्या नेसायची. आरत्या व भजनं म्हणायची. याच काळात गावातल्या पार्श्वनाथ मंदिरात थोडंफार चैतन्य यायचं. काही उत्साही मंडळी परगावच्या पंडितांना प्रवचन देण्यासाठी दहा दिवसांसाठी बोलावून घ्यायची. त्यांच्याबरोबर तिकडची भजनी मंडळेही यायची. वाद्यवृंदाच्या साथीनं, फिल्मी गीतांच्या उठवळ चालीवर त्यांनी म्हटलेली भजनं, आरत्या, आबालवृद्ध स्त्रीपुरुष आनंदाने ऐकायचे. गावातल्या तरूण मुलामुलींना तेवढाच काय तो विरंगुळा अन तेवढंच काय ते मनोरंजन!
कॉलेजचं शिक्षण संपलं आणि वैशाखातल्या एका सुमुहूर्तावर कु. सुमन बाबुराव पाटील, सौ सोनल समीर चौगुले झाली. चौगुले कुटुंबीय बऱ्याच वर्षापूर्वी आपलं गाव सोडून शहरात स्थायिक झालेले. मोठ्या तिन्ही मुली शिकून सवरून सुस्थळी पडलेल्या. धाकटा समीर पवईच्या आय.आय.टी तून इंजिनियर झालेला. एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागलेला. कंपनीच्या खर्चाने परदेशीही जाऊन आलेला. त्यामुळे लग्नाच्या बाजारात त्याचा भाव अगदी तेजीत होता. सुमनचे वडील म्हणजे गावातलं बड प्रस्थ. त्यांची भरपूर शेतीवाडी आणि जमीनजुमलाही होता. चार भाऊ आणि दोन बहिणीत सुमन सगळ्यात धाकटी. तिचं लग्न म्हणजे घरातलं शेवटचं लग्न पंचवीस तोळे सोनं घालून आणि एक लाख रुपये हुंडा देऊन सुमनच्या वडिलांनी तिचं लग्न अगदी थाटामाटात लाऊन दिलं. पन्नास हजारांचा रुखवत दिला. सासरची सगळी मंडळी या दुभत्या गायीवर अगदु खुष होती.
लग्नानंतर सुमन जेव्हा पहिल्यांदा सासरी आली तेव्हा स्टीलचे मोठ मोठे डबे भरून एक हजार लाडू अणि पाचशे करंज्या घेउन आली. त्यानंतर जवळ जवळ आठवडाभर हे आणलेले लाडू आणि करंज्या शेजारीपाजारी, नातेवाइक आणि समाजातल्या इतर लोकांकडे वाटले गेले. शहरातल्या बंद सोसायटीत राहणाऱ्या चौगुल्यांच्या शेजारीपाजारी मग महिना दोन महिने या लाडू करंज्याच कौतुक पुरून उरलं. लक्ष्मी सारख्या सालस, गुणी आणि दो करांनी मुक्तहस्ते देणाऱ्या या सुनेचं चौगुल्यांच्या घरी अमाप कोड कौतुक झालं.
लग्नानंतर सुमन शहरात आली आणि दुसऱ्याच दिवशी सासुबाईंनी तिची रवानगी ब्यूटीपार्लरमध्ये केली. त्यानंतर मग सुमनच्या पार्लरमधल्या खेपा वाढल्या आणि वर्षभरातच सुमन खऱ्या अर्थाने सोनल झाली. तिचे लांबसडक घनदाट केस तिने कापून खांद्यापर्यंत केले. दाट भुवया कोरून रेखीव केल्या. पूर्वीच्या बोजड छापील साड्यांना रजा देऊन ती तलम झुळझुळीत साड्या आणि कधीकधी सलवार कमीजही वापरू लागली. सासूसासऱ्यांची आदर्श सून आणि नवऱ्याची आदर्श पत्नी बनली. सकाळी सकाळी नवऱ्याच्या चहा आणि ब्रेकफास्टची तयारी करणं, तो निघाला की तत्परतेने त्याच्या हातात रूमाल देणं, गोड हसून त्याला बाय करणं तिला छान जमू लागलं. संध्याकाळी कधीतरी त्याच्याबरोबर फिरायला जाणं, कधी सिनेमा तर कधी हॉटेलिंग यात नव्या नवलाईच वर्ष संपलं. वर्षभरातले सगळे सणवार सासरी माहेरी अगदी कौतुकाने साजरे झाले.
तशातच एकदा सासूबाईंच्या कुठल्या तरी मैत्रिणीने सुचवलकी जवळच्याच कॉलेजात लेक्चररची पोस्ट रिकामी आहे म्हणून. तिने नवऱ्याला विचारून रीतसर अर्ज केला. मुलाखत वगैरे होऊन तिची सहजच निवड झाली. तसं तिचं क्वालिफिकेशन उत्तमच होतं. त्यानंतर दर महिन्याला नियमितपणे स्वत:च्या कमाईचे पैसे मिळू लागले आणि सुमनला जणू पंख फुटल्यासारखं वाटू लागलं. तिला खऱ्या अर्थाने मोकळं मोकळं वाटू लागलं. मोकळ्या मनाने आणि सैल हाताने ती दागिन्यांची, साड्या, ड्रेसेस यांची खरेदी करू लागली. तिचा आत्मविश्वास वाढला की अहंकार, कोणजाणे पण ती पूर्वीपेक्षाही निर्भय बनली.
तसं घरातलं कमीजास्ती बघायला, येणाऱ्या जाणाऱ्यांची उस्तवार करायला सासूबाई होत्याच. म्हणूनच दोन मुलांची आई झाल्यावरसुद्धा तिला कधी नोकरी सोडावीशी वाटली नाही. कॉलेजात तिच्या काही कलिग्ज होत्या. कुणी हौसेने तर कुणी नाईलाजाने नोकरी करायच्या. कुणी आवश्यक गरज म्हणून तर कुणी मुलामुलींच्या वाढत्या हौशी पुरवण्यासाठी म्हणून नोकरी करायच्या. बऱ्याच जणींना कॉलेज संपलं की घरी जायची अगदी ओढ असे. कुणाची मुलं पाळणाघरात असायची तर एखादीचा नवरा तिच्या आधीच घरी यायचा. एखादीचे सासूसासरे उशीर झालाकी आकाश पाताळ एक करायचे. पण हिचं मात्र तसं काहीच नव्हतं. हिच्या नोकरीचं पगाराचं सासूबाईंना कोण कौतुक! नातवंडांना आजीआजोबा अगदी दुधावरच्या सायीप्रमाणे जपायचे. त्यामुळे मुलाचं दुखणं खुपणं, आजारपण तसं तिला कधी जड गेलं नाही.
लहानपणापासून कधीही न भोगलेलं स्वातंत्र्य ती आता अनुभवत होती. बरोबरीच्या बायकात मनमोकळेपणाने वावरत होती. कॉलेजातल्या तिच्या विद्यार्थिनी, त्यांचे वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे, मोठ्या कॉलेजातलं मुक्त वातावरण पाहून तिला कधी कधी वाटे, परत पंधरा वीस वर्षांनी लहान व्हावं, ते मुक्त जीवन नव्याने अनुभवावं. विशीतल्या, पंचविशीतल्या त्या अवखळ मुलींशी बोलताना गप्पाटप्पा करताना तिला घरी जाण्याचीही ओढ वाटत नसे. हळूहळू मुलं मोठी होत होती. शाळेतून कॉलेजातही जायला लागली. दरम्यान नवऱ्याचा पगारही भरपूर वाढला. दारात जुन्या मारुतीबरोबरच नवी मर्सिडीज ही आली. सगळ कसं अगदी आलबेल चाललं होतं. आणि तशातच एक दिवस, म्हणजे दोनतीन दिवसांपूर्वी तो प्रसंग घडला.
प्रसंग तसा साधाच पण सुमनच्या मनाचा तळ अगदी ढवळून गेला. त्यादिवशी स्टाफरूममध्ये चहा घेता घेता इंग्रजीची कुलकर्णी टीचर म्हणाली, “येत्या रविवारी तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे पार्टीला यायचं!” त्याबरोबर, पार्टी, कशाबद्दल पार्टी? कुठे आहे पार्टी? दोघी तिघींनी प्रश्नांची अगदी सरबत्तीच केली अगदी. तेव्हा कुलकर्णी हसत हसत म्हणाली, “पार्टी माझ्या घरी आहे आणि ती माझ्या चाळीसाव्या वाढदिवसाबद्दल आहे. “अय्या! चाळीशी गाठली म्हणायची मग तू?” कुणीतरी म्हणालं…पण त्यावेळी सुमनच मन मात्र आतल्या आत चरकलं. तिला वाटलं, आपण तर चाळीशी ओलांडून तीन चार वर्षे उलटूनही गेली. पण जेव्हा आपण चाळीशी गाठली तेव्हा कुलकर्णीसारख्या आपण आनंदानं मोहरलो नव्हतो. उलट मनात आतल्याआत कुठेतरी काटा बोचल्यासारखी वेदना सलत होती.
पस्तिशीच्या आसपास डोक्यातला पहिलावहिला पांढरा केस पाहून मनातल्या मनात ती हादरली होती. नवऱ्यानं तिची चाळीशी जोरात साजरी करायची ठरवल्यावर ती त्याच्यावर कारण नसताना उखडली होती… पण लग्नाचा वाढदिवस नवरा विसरला म्हणून एखाद्या नवोढेसारखी हिरमुसली होती. पण तरीही त्या दिवसापासून तिचं मन तिच्याशीच लपंडाव खेळू लागलं होतं. एवढ्याश्या आनंदाने कधी तिच्या मनात भरतीच उधाण यायचं तर कधी त्या आनंदाच्या ओहोटीला क्षुल्लक कारणही पुरायचं.
बापरे! घड्याळाने सुमधूर संगीताची धून वाजवत सहा वाजल्याची वर्दी दिली तेव्हा कुठे ती विचारांच्या तंद्रीतून जागी झाली. आरशातल्या प्रतिबिंबावर पुन्हा नजर टाकून ती बाहेर आली. गाडी बाहेर काढून हायवेला आली. खरंतर कुलकर्णीच्या घरी तिला जावंसच वाटत नव्हतं. नाहीतरी तिची आणि कुलकर्णीची वेव्हलेंथ कधी जुळलीच नव्हती.कुलकर्णीचं वागणं तिला जरा वेगळंच वाटायचं. चाळीशी काय म्हणून एवढ्या जोरात साजरी करायची?त्यात काय आहे एवढं आनंद मानण्यासारखं? चाळीशी आणि आनंदोत्सव? तिला ती कल्पनाच कशीतरी वाटली. तिला वाटलं, आज आपण पार्टीला नाहीच गेलो तर? नाहीतरी काय असणार आहे त्या पार्टीत? वाढत्या वयाची चर्चा आणि नको त्या गोष्टींचा काथ्याकूट. ऋतूनिवृत्ती वगैरे वगैरे. उगीचच गुदमरल्यासारखं वाटतं त्या चर्चेनं.
तिला वाटलं, हे असं काय होतंय आपल्याला अलीकडे? मनातला न्यूनगंड वाढतोय का अहंगंड? तरूण मुलींचा सहवास अगदी हवाहवासा वाटतो. चाळीशी ओलांडली तरी मन मात्र पंचविशीकडेच ओढ घेतं. मनाला परिपक्वपणा म्हणून कसा येताच नाही? तिच्या मनात अचानक एक विचार चमकला. त्यापेक्षा आपण असं केलं तर? त्या अशोका हॉटेल शेजारी असलेल्या मुक्तीशक्ती क्लबातच जावं. शेजारच्या सोसायटीतल्या पाटणकरबाई आणि खालच्या मजल्यावरच्या मिसेस घोष जातातना तिथे?
परवा संध्याकाळीच पाटणकर तिला भेटली होती. तिला पाहून कौतुकाने म्हणाली होती, “हाय मिसेस चौगुले , कित्ती सुरेख दिसताय तुम्ही या सलवार-कमीज मध्ये? मुलं कॉलेजात तुमची हे सांगूनसुद्धा खरं वाटणार नाही कोणाला. कित्ती छान मेंटेन केलंय तुम्ही स्वत:ला. अंगावर अगदी मुठभर मांस चढल्यासारखं वाटलं तिला. पाटणकरचा सहवास मैत्री तिला उगीचच हवीहवीशी वाटू लागली. मग ती पाटणकरशी काही बाही बोलत राहिली.
त्याचवेळी पाटणकरने तिला सांगितलं होतं. हायवे पासून आत कुठेतरी त्यांचा मुक्ती-शक्ती क्लब आहे. त्यांच्यासारख्याच काही बायका प्रत्येक रविवारी तिथे जमतात म्हणे. सगळ्या अगदी हाय सोसायटीतल्या बायका. धमाल चालते म्हणे तिथे अगदी! सुमनची मामेबहीण कांता दोड्डमणी तिथेच जवळपास कुठेतरी रहायची. तिच्याच कॉलेजात ग्रंथपाल म्हणून काम करायची.
तिला तिने सहज त्या क्लबाबद्दल विचारलं, तेव्हा निर्विकारपणे ती म्हणाली होती, “अगं सुमन, आपल्यासारख्या बायकांसाठी नाही तो क्लब. तिथे चालणाऱ्या चळवळी अन चर्चा आपल्यासारख्या बायकांसाठी नसतातच मुळी. तिथे चर्चा होते ती फक्त तथाकथित स्त्रीमुक्तीची. मिळवत्या स्त्रीचे अधिकार, पूर्णवेळ गृहिणीचे अधिकार, त्यांचे सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य यावर तिथल्या सुरकुतल्या चेहऱ्याच्या, भडक मेकअप केलेल्या बायका तावातावाने बोलत राहतात. आणखी एक गंमत सांगते तुला, तिथल्या बायकांची,” कांताच्या या बोलण्यावर सुमन उत्सुकतेने म्हणाली, “कसलीग गंमत?” तशी कांता म्हणाली, “पुढच्या महिन्यात तर तिथे सौंदर्यस्पर्धाही भरवणार आहेत म्हणे, पस्तीशीनंतरच्या बायकांसाठी!” खरंतर तेव्हापासून सुमन अगदी उत्सुक झाली होती त्या क्लबमध्ये जायला. पण कांतापुढे ती काहीच बोलली नाही.
लग्नानंतर जे जे हवं ते सर्व तिला मिळालं होतं. म्हणूनच की काय तिचं मन उगीचच रडायला कारणं शोधायचं. तरूण वयात तारुण्यातला वसंतबहार तिच्या आयुष्यात कधी आलाच नव्हता. खेडेगावातली सतत चौकशा करणारी माणसं, कडक शिस्तीचे आईवडील, स्वत:चा उपजत भित्रेपणा यामुळे त्या काळात खऱ्या अर्थाने ती कधी उमललीच नाही. पण म्हणून काय झालं? आतातर आपण स्वतंत्र आहोतना? खरंच काय हरकत आहे तो क्लब जॉईन करायला? तिला वाटलं, लग्ना आधी जे नाही एन्जॉय करता आलं ते निदान आता तरी करावं. मनात आलेल्या या विचारासरशी तिने कार मागे घेतली, आणि अशोका हॉटेलच्या दिशेने वळवली. कुलकर्णीकडे आता जायलाच नको, तिने मनाशी ठरवूनच टाकलं. पण कारण काय सांगावं तिला उद्या, न येण्याचं?
सवयीने तिचे हात स्टीअरिंग व्हीलवरून फिरत होते पण मनात मात्र प्रश्न उभा राहिला होता. पण तेवढ्यात समोरून येणाऱ्या हॉर्नच्या आवाजानं ती भानावर आली. तिने जोरात ब्रेक दाबला. समोरच्या मोपेडवर एक प्रौढ महिला होती. मोपेडवरून उतरून ती कारच्या खिडकीपाशी आली अन म्हणाली, “काय बाई दिवसा झोकलीत की काय?” खरंतर तिच्या या वक्तव्याचा अस्सा राग आला होता तिला. पण तिने तिच्याकडे निरखून पाहिलन मात्र ती जवळजवळ ओरडलीच. “रेणुका! रेणुकाच ना तू? तशी ती महिला तिच्याकडे न्याहाळून पहात म्हणाली, “सुमन,अगं तू? कित्ती बदललीस गं?” तिच्या या उद्गारांनी सुमन सुखावली. कारमधून खाली उतरली. रेणुकाच्या गळ्यात हात घालीत म्हणाली, “रेणू कॉलेज सुटल्यापासून पहिल्यांदाच भेटतोयना आपण ?” खूप खूप बोलायचय तुझ्याशी. चल, समोरच्या कॉफी हाऊसमध्ये बसुयात.”
रेणुका गासावी, सुमनची कॉलेजातली मैत्रीण. सुमन आणि रेणुका, एकाच गावच्या. बसने जाता येता दोघी एकत्रच असायच्या. रेणुका भटक्या समाजातली पण प्रखर बुद्धीचं लेणं लाभलेली. अभ्यासात जेमतेम पण क्रीडास्पर्धा अन वक्तृत्वस्पर्धा गाजवावी ती तिनेच. वादविवाद स्पर्धेत मुलांनाही पुरून उरायची. सुमनला ती नेहमी म्हणायची, “सुमन, अगं जरा बदलव स्वत:ला. एवढी शिकलीस एवढे मार्क्स मिळवतेस पण मुलखाची भित्री बाई तू. बाईचा स्वभाव कसा नीडर आणि खंबीर असायला हवा. कसं होणार गं तुझं सासरी?”
पण सध्या सुमनच सासरी अगदी छान चाललंय हे तिने ओळखलं. वाफाळत्या कॉफीचा घुटका घेत ती म्हणाली, “सुमन काय करतेस तू सध्या? “मी काय करणार? संसार आणि नोकरी हेच चाललंय. पण तुझं मात्र बरंय बाई, लग्नच केलं नाहीस म्हणे तू? मागच्या महिन्यात पेपरात नाव वाचलं तुझं.” “हं, हं, इतके दिवस डोंगराळ भागातल्या आदिवासींसाठी, मुख्यत्वेकरून तिथल्या बायकांसाठी मी काम करायचे. सहा महिन्यांपूर्वीच इथे शहरातल्या मध्यवर्ती भागात जागा मिळवून आश्रम काढलाय आम्ही, निराधार अनाथ स्त्रियांसाठी!” रेणुका म्हणाली. “कसलासा पुरस्कारही मिळालाना गं तुला?” सुमनच्या या प्रश्नावर रेणुका प्रसन्नपणे हसत म्हणाली, “हो, मिळाला खरा पुरस्कार! पण त्या पुरस्कारापेक्षाही या कामातून जो आनंद मिळतोना तो जास्त मोलाचा वाटतो मला. पण ते जाऊदे ,तू आणखी काय काय करतेस?” “मी आणखी काय करणार? मुलं, संसार, नवरा, सासू-सासरे आणि शिवाय नोकरी यातून वेळच कुठे मिळतो दुसरं काही करायला?”
सुमनच्या या उत्तरावर रेणुका गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, “अच्छा म्हणजे अगदी फुलटाइम बिझी आहेस तर तू? पण तू काही म्हण सुमन, वाटलं नव्हतं तू इतकी बदलशील म्हणून. अगदीच कायापालट झालाय तुझा!” त्यासरशी सुमन खुलली. मोकळेपणाने सांगू लागली, “खरंच कायापालटच झालाय माझा. आपल्या त्या खेडेगावात कित्ती बंधनं होती आपल्यावर. ना कोणाशी मनमोकळं बोलता यायचं ना मनासारखे कपडे वापरता यायचे. सगळ्याच बाबतीत फक्त बंधनंच होती. आता तर मी स्वत:नोकरी करते. पैसे मिळवते. त्यामुळे मी ते हवे तसे खर्चही करू शकते. लग्नानंतर स्त्रीवर बंधनं येतात म्हणे, पण मीतर खऱ्या अर्थाने लग्नानंतरच स्वतंत्र झाले. मुक्त झाले.
तिच्या या बोलण्यावर रेणुकाच्या भुवया वक्र झाल्या. ती म्हणाली, “अच्छा, म्हणजे या आर्थिक आणि पोशाखी स्वातंत्र्याला तू मुक्ती मानतेस?” “अर्थात! यापेक्षा आणखी काय हवं असतं माणसाला?” “म्हणजे? तुला काय म्हणायचंय सुमन? स्त्रियांनी पुरुषांसारखे कपडे घातले आणि त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या, पैसे मिळवू लागल्या तर त्या स्वतंत्र झाल्या? आणि तसंच जर असेल तर मग आमच्या भटक्या समाजात ही स्त्री पहिल्यापासूनच मुक्त आहे म्हणायची. ” रेणुका आवेशाने बोलत होती आणि सुमन फक्त ऐकत होती.
बोलता बोलता रेणुका थांबली. मग गळ्यात आलेला आवंढा गिळत ती हळुवारपणे म्हणाली, “आम्ही सर्व भावंडं लहान होतोना, तेव्हा माझी आई पहाटे पहाटे माझ्या छोट्या भावंडांना अफूची गोळी घालून बापाबरोबर कोयता अन खुरपं घेऊन कामाला जायची. संध्याकाळी दमूनभागून दोघं घरी यायचे. बाप मिळालेल्या पैशाची दारू ढोसायाचा आणि आई, त्या पैशातून धान्य विकत आणायची. ते जात्यावर दळायची आणि मग धगधगत्या चुलीपुढे बसून आम्हाला रांधून वाढायची. चुलीच्या लालसर प्रकाशात उजळलेला तिचा तांबडा-लाल चेहरा मला अजूनही आठवतो. ती माझी आई मुक्त होती, स्वतंत्र होती, असं म्हणायचंय का तुला?”
यावर सुमन म्हणाली, “रेणुका, तुमच्या समाजात स्त्रीवर अजूनही अन्याय होतोच आहे, कारण अजूनही कमालीच अज्ञान अन दारिद्र्य आहे तुमच्या समाजात.” यावर खिन्नपणे हसून रेणुका म्हणाली, “आमच्या समाजाचं एकवेळ सोड, पण सधन आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या तुमच्या समाजातही काय स्थिती आहे बायकांची? एवढ्या श्रीमंत बापाची लेक तू! पण लग्नापूर्वी स्वत:ची स्वतंत्र मतं मांडू शकत होतीस? नाही! कारण जे स्वातंत्र्य तुझ्या आईला नव्हतं, ते तुला कसं असणार? तुला तुझ्या घरच्यांनी शिकवलं कारण लग्नाच्या बाजारात शिकलेल्या स्त्रीला किंमत असते म्हणून! तू म्हणतेस तुला लग्ना नंतर बरंच स्वातंत्र्य मिळालंय. पण या स्वातंत्र्याचा काय उपयोग केलासगं तू? तुझा फक्त बाह्यत: कायापालट झालाय. तुझ्या भावनांचा, विचारांचा थोडासुद्धा विकास झालेला दिसत नाही मला. अनेक दिवस पिंजर्यात ठेवलेल्या पक्ष्याला जर आपण मोकळ्या रानात सोडलं तर तो नाही उडू शकत मुक्तपणे. कारण मुक्तपणे उडावं कसं हे ही त्याला माहीतच नसतं. उडण्यासाठी फक्त पंखात बळ असून चालत नाही, पण उडण्याची जबरदस्त इच्छाशक्तीही असावी लागते. मला तर तुला भेटल्यापासूनच जाणवतंय की तुझाही तसंच काहीतरी झालंय.”
रेणुका बोलत होती आणि सुमनचं मन आतल्या आत हिंदकळत होतं, डुचमळत होतं. नाहीतरी अलीकडे तिचं मन कुठे थाऱ्यावर होतं? तिच्या मनाला सतत स्वत:चंच कौतुक हवं असायचं कौतुक कुठे कमी पडलं की मग तिला भीती वाटायची. तारुण्य ओसरल्यावर पुढे काय याचीही तिला भीती वाटायची. म्हणूनच कुलकर्णीच्या चाळीशीच्या पार्टीला जायची तिला भीती वाटली होती. ती सुन्नपणे बसून राहिली. रेणुकाकडे पहात राहिली, अचंब्याने.
तेव्हा रेणुकाच पुढे म्हणाली, “सुमन रागावू नकोस तू पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं मला. कॉलेजात मानसशास्त्र शिकवतेस ना तू? मग माणसाच्या बाईमाणसाच्या मनाचा कधी अभ्यास केलास कागं तू? तिला सन्मान हवा असतो, तिच्या उपजत कलागुणांचा, मृदू भावनांचा, अंगभूत कौशल्याचा. पण काल काय अन आज काय, गरीबांच्यात काय अन श्रीमंतांच्यात काय, तिच्या मृदू, सर्जनशील मनाचा, कोमल भावनांचा कुणी विचारच करत नाही. तिने पुरुषांसारखे कपडे घातले, पुरुषांसारखी बंडखोरी केली, पुरुषांसारखे घराबाहेर पडून पैसे मिळवले किंवा फार फार तर टी. व्ही. वृत्तपत्रांसारख्या मिडीयामधून आपल्या स्त्रीदेहाचा उपयोग पुरुषांना रिझवण्यासाठी केला तरच तिचा सन्मान होतो. असा हा सन्मान म्हणजे आजच्या स्त्रीला तिचा गौरव वाटतो. स्त्रीच पुरुषासारखं असणं हा तिचा प्लस पॉइंट ठरतो आणि स्त्रीचं स्त्रीसारखं असणं हा तिचा मायनस पॉइंट ठरतो. “सावळ्या रंगाची, रापलेल्या चेहऱ्याची पण तेजस्वी डोळ्यांची रेणुका बोलत होती तेव्हा क्षणभर तिच्या डोळ्यात वीज लखलखल्याचा भास झाला तिला.
तिच्या डोळ्यातले झरझरून बदलणारे भाव आणि चेहऱ्यावरचं ते तेज! जगतसुंदरीच वाटली ती तिला…आणि मग तिच्या त्या सावळ्या तेजस्वी रंगापुढे सुमनला तिचं नितळ गोरेपण फिकं फिकं वाटू लागलं. डाएटिंग करून मेंटेन केलेला तिचा सडपातळ बांधा, रेणुकाच्या कणखर शरीरयष्टीपुढे अगदी मोडून पडल्यासारखा वाटला आणि पार्लरमधून कोरून घेतलेल्या तिच्या भुवयांची रेखीवता रेणुकाच्या घनदाट भुवयांपुढे झाकोळून गेल्यासारखी वाटली तिला. तिचा वरवरचा अहंकार अगदी गळून पडला. रेणुकाचे हात आपल्या हातात घेत ती म्हणाली, “रेणू किती छान बोलतेस गं तू? अगदी हृदयाच्या तळापासून. तुझं बोलणं म्हणजे फक्त शब्दांचा फुलोरा नाही तर त्या शब्दाशब्दातून जाणवतोय, ऐकू येतोय स्त्रीच्या आतल्या मनाचा हुंकार. रेणुका मलाही माझ्या आतल्या मनाचा हुंकार ऐकायचाय. ”
‘ “मग त्यासाठी माझ्या “रानवारा” आश्रमात ये तू. पूर्वायुष्यात अनेक दु:खे भोगलेल्या, अन्यायाची, अत्याचाराची शिकार झालेल्या कितीतरी मुली, बायका आहेत तिथे. रानवाऱ्यातल्या निर्मळ वाऱ्याने आता कुठे त्या स्त्रिया थोडया थोडया फुलताहेत. तुला तुझ्या आतल्या मनाचा हुंकार ऐकायचा असेल तर आधी स्वत:चं रडगाणं बंद करावं लागेल. तिथल्या मुक्या मुक्या बनलेल्या स्त्रियांचा खोल खोल दबलेला हुंकार तुला जीवाचा कान करून ऐकावा लागेल.
“हो रेणुका, येईन मी तुझ्या रानवाऱ्यात! सुमन म्हणाली, पण…तुझ्यासारखं झोकून देऊन काम करणं मला कसं जमेल? किती झालं तरी मी एक संसारी स्त्री आहे.” त्यावर रेणुका म्हणाली, “त्यासाठी अगदी माझ्यासारखं झोकुनच कशाला दयायला हवं?खारीचा वाटा तरी उचलता येईलच की तुला. आठवडयातून एखादया दिवसातला दोन-तीन तास वेळ जरी तू यासाठी दिलास तरी तुला त्यातून जो आनंद मिळेल त्याचं मोल मला शब्दात नाही सांगता येणार! पण त्यासाठी मनापासून तळमळ हवी. तिथल्या बायकांशी हळुवारपणे बोलून, त्याचं मन जाणून, तू त्यांना बोलतं करू शकतेस.”
खरच करू शकेन मी हे सगळं?” सुमन काहीशा उत्तेजित स्वरात म्हणाली. तशी रेणुका थेट तिच्या डोळ्यात पहात म्हणाली, “सुमन मानसशास्त्रात सुवर्णपदक मिळवणारी तू! ते मिळवलेलं ज्ञान पाट्या टाकल्यासारखं तुझ्या विदयार्थ्यांना दिलंस. पण माझ्या आश्रमात तुला खऱ्या अर्थानं माणसाच्या मनात शिरावं लागेल. त्यांच्या मनातील अनेकपदरी गुंता सोडवून तो तुला सरळ करावा लागेल…आणि तो तू करू शकशील. ज्यांच्या डोक्यावरचं आभाळच फाटलंय अशा बायकांच्या दगड झालेल्या मृत मनात तू चैतन्याची झुळूक अनु शकशील.” रेनुकाच्या या बोलण्यानं सुमन मोहोरली.
तिच्या अंगांगात जणू सहस्त्रावधी कलिकांचा मोहोर फुलला. कॉफी हाउसच्या खिडकीतून तिने बाहेर पाहिलं. पश्चिम क्षितिजावर अस्ताला जाणारा सूर्य आपल्या तांबूस रंगाची आकाशात उधळण करीत होता. पाखरांचे थवे मुक्तपणे झेपावत होते. ते तेजस्वी सूर्यबिंब आपल्या डोळ्यात साठवून घेत सुमनने आपले डोळे मिटून घेतले. ती म्हणाली, “रेणू, माझ्या मिटल्या डोळ्यांना दिसतेय माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात उजळलेली एक ज्योत; आणि माझ्या कानांना ऐकू येतोय माझ्या मनाचा अस्पष्ट हुंकार!”
तेव्हा रेणुकाच्या चेहऱ्यावर मंद स्मित फुललं. ती म्हणाली, “सुमन, स्वप्न पहावीत, पण उघड्या डोळ्यांनी!” मग हातातल्या घड्याळाकडं पाहात ती म्हणाली, “सुमन, उठुयात आपण आता. मला जायला हवं. संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी मुली माझी वाट पाहात असतील.” असं म्हणून रेणुका उठली आणि चालूही लागली. मोपेडला किक मारून त्यावर स्वार झाली. बघता बघता अगदी दूर दूर गेली. सुमनच्या हृदयात एक नवा अंकुर फुलवून ती निघून गेली. ढगात अदृष्य होणाऱ्या सौदामिनीप्रमाणे दिसेनाशी झाली.