पहाट गाणे पाखरू गाते
वाटिका प्रभाती दवात न्हाते
चिवचिव किलबिल गुडगुड गाणी
खळखळ झरझर वाहते पाणी
डोलते नाचते तृणाचे पाते…
गप्पा अन गोष्टी कराया नित्य
हसत खेळत बोलावे सत्य
जपावे सुंदर चहाचे नाते …
झुळूक हवेची घरात यावी
सुगंधी लहर नाकाने प्यावी
गरगर फिरवित दगडी जाते …
उप्पीट शिरा लोणचे खावे
उदरभरण मज्जेत करावे
अंगणी चिऊ येते अन जाते …
खऱ्या गुरूंचे येताच जथे
समृद्धी सौख्य नांदते तिथे
प्रेम अन प्रीत मस्त वहाते …
पहाट गाणे पाखरू गाते
वाटिका माझी दवात न्हाते