नारी सम्यकदृष्टी – NAREE SAMYAKDRUSHTEE


जाति : हरिभगिनी

आंतरजाली बहरुन आली सुरभित अक्षरसृष्टी
रखाडीतल्या ठिणग्या फुलवी नारी सम्यकदृष्टी
नाकारे पंथाचा चष्मा गटातटाचा नारा
तिला डांबण्या ब्रह्मांडी या नाही कुठला कारा
पटते ते ती लिहिणारी
नोकर ना पण सरकारी
अढळ ध्रुव पण दरबारी
नकाच लागू तिचिया नादी असाल जर का भ्रष्टी
रखाडीतल्या ठिणग्या फुलवी नारी सम्यकदृष्टी

अंधरुढींना डोक्यामध्ये कधी न देते थारा
ऊर मोकळा भाव मोकळा करण्या बनते वारा
कर्मफळाची तिला न चिंता कर्तव्याने घडते
जळणासाठी फिरून सुकली काष्ठे गोळा करते
चूल पेटवे स्वतः स्वतः
कर्म जाळते स्वतः स्वतः
स्वतःस शिकवे स्वतः स्वतः
मरगळलेली कुणा भासते पण नसते दुःखीकष्टी
रखाडीतल्या ठिणग्या फुलवी नारी सम्यकदृष्टी

दांभिक दिसता मार्ग बदलते कशास करता दंगा
धुण्यास पापे कंटाळुन ही उलटी वाहे गंगा
मौन जाहली होती दुहिता अता बोलते आहे
भेटायाला नदी समुद्रा गात चालली आहे
खळाळता वाङ्गनिष्यंद
मुक्त धबाबे स्वच्छंद
चाखुन त्यातिल मकरंद
जलद बरसती धो धो धो धो करण्या मौक्तिक वृष्टी
आंतरजाली बहरुन आली सुरभित अक्षरसृष्टी

विकृत तिची ना आत्मनिष्ठा ती तर स्वधर्म अंगार
उदो उदो ना व्यर्थ कुणाचा माजविते ना बडिवार
काट्यांमधुनी वाट धुंडते स्वप्न कराया साकार
हडेलहप्पी थोपविण्या बळ स्वरव्यंजनरुप एल्गार
हवेहवेसे मिळवाया
नकोनकोसे पळवाया
कधी न विसरे कळवाया
ख्यालिखुशाली वेळोवेळी ती मनमंदिर तृष्टी
आंतरजाली बहरुन आली सुरभित अक्षरसृष्टी

गूगल अस्सल शोधक इंजिन अखंड धावत असते
ज्ञान माहिती झरझर सरसर जगास वाटत फिरते
कवीकुलाला खूप भावली संगणकाची भाषा
मुक्त होऊदे काव्यसंपदा हीच मनी अभिलाषा
पुद्गल शब्दांची शक्ती
शुद्धात्म्यावरची भक्ती
तुटे शृंखलेची सक्ती
करी जादुई फुकनी तिचिया वेत्र म्हणा वा यष्टी
रखाडीतल्या ठिणग्या फुलवी नारी सम्यकदृष्टी

हात जोडते हृदयापाशी वंदन करण्यासाठी
सरळ पुढे ती हाता नेते हात मिळवण्यासाठी
ओंजळ करते दो हातांची पाऊस धरण्यासाठी
दोन पालथे हात फिरविते रोट बडवण्यासाठी
तिची लेखणी तिची गदा
तिच्या गदेवर मीच फिदा
पायाखाली लाल मृदा
लढण्यासाठी उभी ठाकते आवळुन दोन्ही मुष्टी
रखाडीतल्या ठिणग्या फुलवी नारी सम्यकदृष्टी

ती जमिनीवर झाड वाढवे फळे मिळाया गोड गरे
दोष शोधुनी अपुल्यामधले तूही आता वाग खरे
झाडांसाठी नीर मिळाया कूप जलाशय खोद झरे
मी आम्ही अन तू तुम्ही हा खेळ जाहला अता पुरे
दुसरी तिसरी कुणी न ती
ती म्हणजे मी असेनही
कधी तिच्यातच दडून मी
शुभशुभ कार्यासाठी तिजला हसून देते पुष्टी
आंतरजाली बहरुन आली सुरभित अक्षरसृष्टी

शब्दार्थ
रखाडी – राख
भ्रष्टी – भ्रष्ट
तृष्टी – विश्वस्त, ट्रस्टी
वाङ्गनिष्यंद – वाणीचा प्रवाह
वेत्र – काठी, यष्टी, दंड
हडेलहप्पी – मनमानी
पुद्गल – अजीव


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.