गोम्मट – GOMMAT


Gommat-ray is the another name of brave and honourable king(senapati) Chamund-ray. The world famous idol of Bhagvan Bahubali at Shravan belgola (karnatak state) is built by Chamundray as per his mother’s wish. In this story Gommat is a name of a small baby  who is one year old.  This baby has lost his mother. So baby’s father marries another girl who was a close friend of baby’s mother. At first the baby refused to go to his new mother. The Mother is worried about this thing. At last in Shravan-belgola in front of the idol of Bahubali, baby accepts his new mother as a real mother.

प्रेमा तुझे रंग किती?
माहेर मासिक- जुलै २००३
कथासंग्रह- शासन
सुमेरू प्रकाशन

गोम्मट शांतपणे झोपला होता. पूर्वेकडच्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी त्याचा गोरापान चेहरा अधिकच उजळला होता. डोक्यावरचे काळे-कुरळे केस वाऱ्याच्या झुळकीने भुरभुरत होते. चित्रा कितीतरी वेळ त्याच्याकडे पहात उभी होती. त्याच्या मऊशार केसातून तिने हळुवारपणे आपली बोटं फिरवली. त्यासरशी गोम्मटने हळूच डोळे उघडले.

चित्राला पाहून नेहमीप्रमाणे त्याने मान फिरवली. उजव्या हाताचा अंगठा अगदी जोरजोरात तोंडात कोंबला. तर्जनीचं बोट नाकावर ठेवलं आणि मग सुरु झालं स्वारीचं आर्त-रौद्र ध्यान! रुसलेलं, स्वत:तच हरवलेलं त्याचं ते गोंडस रूप! चित्राला अगदी गलबलून आलं. घसा दाटून आला आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या. चित्राने त्याला जवळ घेण्यासाठी आपले हात पुढे केले, पण नेहमीप्रमाणेच तिच्याकडे हरवल्यासारखा पहात तो उठला आणि दुडूदुडू धावत निघाला, आपल्या आजीच्या शोधात!

गोम्मट, नावाप्रमाणेच गोरागोमटा! डोक्यावरचे काळे-कुरळे केस आणि चेहऱ्यावरचे ते विलक्षण अनाकलनीय भाव! कधी निष्पाप निरागस तर कधी अवखळ बंडखोर, तर कधी विलक्षण गूढगंभीर! कधी कधी तर तो भासे सर्व काही जाणणारा ज्ञाता द्रष्टाच जणू! गोम्मटची आई, ऋषभची प्रिय पत्नी आणि चित्राची जिवाभावाची सखी करूणा, या जगातून जाऊन जवळ जवळ वर्ष होत आलेलं. करूणा गेली आणि ऐन तारुण्यात मुलाच्या विस्कटलेल्या संसाराची घडी बसवता बसवता शरीराने थकलेली मालूआत्या मनानेही पार कोलमडून गेली. नातवाला निवांतपणे मांडीवर खेळवण्याचे दिवस तिचे…पण अकाली आलेलं हे उसनं मातृत्व तिच्या शरीराला आणि मनालाही पेलवेनासं झालं होतं. करूणा गेली तेव्हा गोम्मट नुकताच कोठे अडखळत पावले टाकायला लागला होता. त्याच्या बोबडया बोलांनी आणि दुडक्या चालीने घरातल्या प्रत्येक माणसाचं बालपण जणू परतून आलं होतं. पण सगळं असं सुरळीत चालेल तर या संसाराला कुणी मायावी का म्हटलं असतं? ऋषभने तर खोलीतल्या चार भिंतीत स्वत:ला कोंडून घेतलं होतं. करूणा गेली हे सत्य स्वीकारायला त्याचं मन तयारच नव्हतं. त्याचं मन घुसमटे, बंड करून उठे, स्वत:वर -नियतीवर! असंख्य प्रश्नांच्या आवर्तनात तो हरवून जाई.

हे असं का व्हावं? का म्हणून मलाच ही शिक्षा व्हावी? धर्मनिष्ठेने चालणाऱ्या माझ्या घरादारावर अचानक हे दु:खाचं सावट का पसरावं? कोणत्या पूर्वसंचिताचा हा खेळ असावा? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्नच! संसाराची क्षणभंगुरता त्याला का माहित नव्हती? धर्मग्रंथातून, साहित्यातून त्याला ती उमजलीही होती. आचार्यांच्या प्रवचनातू ती ऐकलेलीही होती. पण ऐकणं आणि प्रत्यक्ष जाणण यात किती महदंतर असतं हे आज त्याला जाणवत होतं. निराशेच्या अंधारात त्याची फक्त घुसमटच होत होती. पण…त्या अंधारातून त्याला बाहेर काढलं चित्राने!

चित्रा आणि करूणा अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी! दोघींची मैत्री अगदी दुधावरच्या सायीसारखी! एकीच्या पायात काटा टोचला तर दुसरीच्या डोळ्यात पाणी यावं अशी! पोकळीसारख्या खेडयातून फक्त त्या दोघीच शाहूपूर या तालुक्याच्या गावी कॉलेजला जायच्या. काव्यवाचन, कथाकथन, परिसंवाद यात हिरिरीने भाग घ्यायच्या. करुणाची मालूआत्या शाहूपुरातच रहायची. अधूनमधून दोघीही मालूआत्याकडे जात असत. त्यांच्या घरातलं वातावरण थोडंसं शहरी आणि खेळीमेळीचं. चित्राला ते खूप आवडे. करुणाचा आतेभाऊ ऋषभ पदवीधर झालेला! घरचे माग होते. त्या धंद्यातच त्याने लक्ष घातलं होतं. करूणाचं आणि त्याचं लहानपणीच लग्न ठरलेलं होतं. त्याशिवाय करुणाचा अजितदादा आणि ऋषभची बहीण त्रिशला यांचेही लग्न ठरले होते. साटेलोटे! त्यामुळे त्यांच्या घरात हास्यविनोद चेष्टामस्करी नेहमीच चाललेली असे.

बी ए ची परीक्षा संपली आणि साखरपुडा अगदी धुमधडाक्यात पार पडला. त्यानंतर एकाच मांडवात दोन लग्नांचा बार उडाला. विवाहाची ती पूर्वसंध्या! चुडा भरायला घरी कासारीण आली होती. करुणाला चुडा भरल्यानंतर चित्रालाही हात भरून बांगडया घातल्या. करवलीचा मान तिचाच होता. घरात नातेवाईकांची, मुलीबाळींची ही गर्दी जमली होती. हास्यविनोदाला ऊत आला होता. चित्राला मात्र त्या गर्दीचं वावडंच होतं. करुणालाही ते जाणवत होतंच…आणि म्हणूनच बायकांच्या गर्दीतून दोघी गच्चीवर सटकल्या.

दोघींच्या गप्पांना तिथेच रंग भरत असे…पण आज मात्र दोघीही गप्प गप्पच होत्या. गच्चीवरून दिसणारा सूर्याचा लाल-लाल गोळा डोंगरामागे दिसेनासा झाला आणि चित्राचे डोळे पाण्याने भरून आले. करुणाचे हात हातात धरत ती म्हणाली, “करूणा, उदया तुझं लग्न होईल, तू सासरी जाशील, तरीही आपलं मैत्रीचं नातं असंच राहील कागं?”
“चित्रा, अगं लग्न झालं म्हणून आपली मैत्री कशी संपेल? प्रेमाचे खूप खूप रंग असतात. पती-पत्नीमधल्या प्रेमाचा रंग वेगळा, आई आणि मुलाच्या प्रेमाचा रंग वेगळा, भावा-बहिणीच्या प्रेमाचा रंग वेगळा, तसा तुझ्या माझ्या प्रेमातला रंग खूप खूप वेगळा आहेगं…”

दोघी कितीवेळ बोलत होत्या कोण जाणे, पण बाहेर अंधार दाटून आला तेव्हा करुणाची मावशी वर आली. म्हणाली, “इथे काय करतायगं पोरींनो? केव्हापासून शोधतेय मी तुम्हाला? चला लवकर खाली! मेंदी काढणाऱ्या बाई आल्या आहेत. करुणाच्या घराच्या दारात भला मोठा मांडव घातला होता. धुमधडाक्यात लग्न लागलं. फटाक्यांच्या आतषबाजीने गाव दणाणलं. मिष्टान्नाच्या पंगतीवर पंगती झडल्या. त्यानंतरची ती निरोपाची सुन्न करणारी घटिका! करुणाच्या गळयात पडून चित्रा खूप रडली. रडून रडून दोघींचेही डोळे लाल झाले. फुलांनी सजवलेल्या गाडीत बसून करूणा सासरी गेली. त्यानंतर इकडे लगेचच नव्या सुनेच्या म्हणजे त्रिशलेच्या स्वागताची तयारी सुरु झाली. उंबरठ्यावर भरलेलं माप ठेवलं. हातात मुसळ घेऊन करुणाची चुलतबहीण नव्या वहिनीची वाट अडवून उभी राहिली. उखाण्यांचा आग्रह सुरू झाला. हास्यविनोदाला अगदी ऊत आला.
मघाची निरोपाची ती सुन्न करणारी घटिका…स्वागताच्या या मधुर क्षणांनी अगदी नटून सजून गेली. घटकेपूर्वी डोळ्याला पदर लावून रडणाऱ्या बायका तोंडाला पदर लावून हसू लागल्या. चित्राला अगदी कससंच झालं. तिला वाटलं, कसं जमतं असं क्षणात बदलणं यांना? खरेतर मघाशी रडणारी करूणा आता सासरघरच्या स्वागताने मोहरून गेली असेल आणि मी मात्र…का हे असं जगावेगळं काळीज दिलंय मला देवाने?

कुणाचाही निरोप न घेता लग्नघरातून चित्रा तडक घरी आली. आई व आप्पा बसले होते. अशोकअण्णा म्हणजे चित्राचा थोरला भाऊ नुकताच दुकानातून आला होता. कुणाशीच न बोलता चित्रा माजघरात गेली. फळीवरच घोंगड काढून अंथरलं आणि निपचित पडून राहिली. तसे आई व आप्पा आत आले. आई जवळ आली, तिच्या डोक्यावरून हात फिरवित म्हणाली, “काय झालंयगं चित्रा? बरं वाटत नाहीका?
“मला काय झालंय? बरी आहे मी”
“असं कसं होईल? करूणा गेली म्हणून वाईट वाटतंय न तुला?” आई म्हणाली.
तसे आप्पा म्हणाले, “अगं चित्राक्का, मुलीची जात कधीतरी लग्न होऊन जाणारचकी. आता उदया तुझं लग्न झालं तर तू काय इथंच राहशील?”
“नाही आप्पा, मला इतक्यात लग्नच नाही करायचं. बऱ्याच दिवसापासून मला वाटतंयकी जी.डी आर्टचा कोर्स करावा.” चित्राच्या या बोलण्यावर आप्पा म्हणाले,
“आता पुरे झालंकी शिक्षण. कितीही शिकलं तरी शेवटी भाकरीच थापायच्याना?”
आप्पा शेतकरी माणूस. खेडयातल्या रीतिरिवाजांना धरून चालणारे. लेकीच्या अंतरंगात दडलेलं कलासक्त मन त्यांना कसं दिसणार? ते पुढे म्हणाले,
“बोरगावच्या मगदुमांचं स्थळ आलंय. मुलगा शाळेत मास्तर आहे आणि शिवाय एकुलता एक. दहा एकर पाण्याखालची जमीन आहे. येत्या रविवारी पाहुणे येतील बघायला.”
“काय येत्या रविवारी? मला विचारायचं तरी आप्पा!” चित्रा त्रासिकपणे म्हणाली.
“तुला काय विचारायचं त्यात? चार बुकं शिकलीस म्हणून फार शहाणपण आलं होय?” आप्पांचा आवाज नकळत चढला तसा अशोकआण्णा आत आला व म्हणाला,
“काय झालं गं चित्रा ? कशासाठी एवढा वाद चाललाय?” तेव्हा आप्पाच म्हणाले,
“एवढ्यात लग्नच करायचं नाही म्हणते ही? आत्ता हिचं लग्न केल्याबिगर तुझं लग्न केलं तर लोकं काय म्हणतील? घोडनवरी घरात ठिवून हुंड्यासाठी मुलाचं लग्न केलं म्हणतीलकी.
“आप्पा तुम्ही जरा शांत व्हा बघू. दुकानाचं बस्तान नीट बसल्याशिवाय मला लग्न करायचं नाही, आणि चित्राला मी सांगतो समजावून” अशोक आण्णा म्हणाला.

त्यानंतर मग अशोकआण्णाच्या शब्दाखातर रविवारी चित्रा बोरगावच्या त्या मास्तरसमोर पाटावर जाऊन बसली. मुलाच्या मामाने नाव काय? शिक्षण किती? भाऊबहीण किती? वगैरे प्रश्न विचारले…आणि त्यानंतर हात दाखवा, पाय दाखवा, पायांची बोटे दाखवा, अशी प्रात्याक्षिके झाली.मुलगा मात्र मख्ख चेहऱ्याने बसून होता. चित्राला अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. बाजार मांडला होता, जसा काही तिच्या रूपाचा.
दोनच दिवसांनी मगदूम यांच्याकडून निरोप आला. त्यांना चित्रा पसंत नव्हती. मुलगी सावळी म्हणजे काळीच आहे. शिवाय कॉलेजात शिकलेली! खेडेगावात सासरी नीट राहील की नाही याची त्यांना शंका वाटत होती. आप्पा थोडे नाराज झाले पण चित्राला मनातून हायसे वाटले. ती मग अशोकआण्णाला म्हणाली,
“आण्णा, खरेतर असलं दाखवणं, मुलीच्या रूपाचा असा बाजार मांडणं मला बिलकुल पसंत नाही.” मग आधीच नाराज झालेले आप्पा चित्राच्या या वाक्याने संतापून म्हणाले,
“काय करायचं मग? सीतेसारखं स्वयंवर मांडायचका तुझं?”
शब्दाने शब्द वाढू नये म्हणून चित्रा गप्प बसली. पण तिने ठरवलं आता जे काही करायचं ते अशोकआण्णाकडूनच. त्यानंतर कसे काय माहीत पण आण्णाने आप्पांना पटवलं आणि चित्रा पुण्याला गेली. पुण्याला अभिनव कला महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला. दोन वर्षासाठीका होईना पण चित्राला मुक्ती मिळाल्यासारखं वाटलं.

चित्राची बोटं अगदी लवचिक, जातिवंत कलाकाराची! तिच्या कल्पनेची भरारी अगदी पक्ष्यासारखी! रंग, रेषा, त्रिमिती यांचा अनोखा मिलाफ दिसे तिच्या चित्रातून. रंग-रेषांच्या त्या दुनियेत किती हरवून गेली चित्रा! अभिव्यक्तीच्या त्या सुखद क्षणात दोन वर्षे अगदी पाखरासारखी उडून गेली. करुणा ही या दोन वर्षात आपल्या संसारात रमून गेली. गोम्मटसारख्या गोमट्या गोजिऱ्या बाळाची आई झाली.

दोन वर्षानंतर एका रंगीबेरंगी जगातून चित्रा पुन्हा वास्तवातल्या जगात आली. मनात थोडी खंत असली तरी गावाकडची ओढही लागली होती. आई, आप्पा, अशोकआण्णा, करूणा यांचा सहवास हवाहवासापण वाटत होता.

कितीतरी गोष्टी करायच्या होत्या तिला. ओढयाच्या काठाकाठाने मोराची पिसं शोधत हिंडायचं होतं. सरत्या संध्याकाळी पाटाच्या पाण्यात पाय सोडून बसायचं होतं. मंदिरात जाऊन आदि भगवंताचा अभिषेक पाहायचा होता. पंडितांच्या धीरगंभीर आवाजातला जयजया जयजयाचा जयघोष कानात साठवून घ्यायचा होता. आणि…करुणाशी तर कितीतरी बोलायचं होतं. पुरत्या दोन वर्षांनी भेटणार होती करूणा तिला! तिच्या गोम्मटला तर तिने अजून पाहिलेही नव्हते. मागच्या उन्हाळ्यात करूणा दक्षिण भारताच्या प्रवासाला गेल्याने चित्राला ती भेटलीच नव्हती.
एका अनिवार ओढीने चित्रा आपल्या गावी परतली. पण आल्यानंतर ती बातमी ऐकली, करूणा गेल्याची! चित्राची तर थोडावेळ शुद्धच हरपली. मेंदूतल्या रक्तस्त्रावाने करूणा गेली. सगळं होत्याचं नव्हतं झालं. चित्राची परीक्षा चालू होती म्हणून हे सारं तिला कळवण्याचे धाडस अशोकआण्णाला झाले नाही.
मालूआत्याला भेटायला चित्रा शाहूपूरला आली आणि अनेक पूर्वस्मृतींनी तिच्या हृदयात कल्लोळ माजला. चित्राच्या गळ्यात पडून मालूआत्या आणि त्रिशला खूप खूप रडल्या. ऋषभची अवस्था तर पाहवत नव्हती. खोलीत आढ्याकडे पाहत तो भकास चेहऱ्याने बसून होता. त्याच्या शेजारीच पाय पोटाशी घेऊन गोम्मट निजला होता. गोंडस पण चेहऱ्यावरचं तेज लोपलेला.
चित्राने त्याच्याकडे पाहिलं अन तिच्या काळजात प्रचंड कालवाकालव झाली. हृदयातला कल्लोळ डोळ्यावाटे बाहेर येण्यासाठी उसळी मारू लागला पण…त्याचक्षणी चित्राला आठवले त्या संध्याकाळचे ते शब्द! मृत्यू महोत्सवाबद्दल अगदी सहजपणे बोलणारी करूणा तिच्या डोळ्यापुढे उभी राहिली. आणि… त्याचक्षणी तिने ठरवलं, या घराला या दु:खातून आता आपणच बाहेर काढायचं. त्यानंतर कोमल हृदयाची चित्रा वरवर तरी कणखर बनली. करुणाच्या घरी रोजच जाऊ लागली. आपलं वय विसरून मालूआत्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगू लागली.

घरात कोंडून घेतलेल्या ऋषभलाही तिने हळूहळू बोलतं केलं. हळूहळू तोपण सावरू लागला. कारखान्यावर जाऊ लागला. गोम्मट मात्र अजूनही रुळत नव्हतं. ऋषभ आणि मालूआत्याशिवाय त्याचे पानही हलत नसे. चित्राचं शाहूपूरला जाणं आता नित्याचंच झालं होतं. आप्पांची त्यावरून कधीकधी बडबड चाले.
त्यादिवशी चित्रा अशीच घरी यायला निघाली होती. त्यावेळी मालूआत्याने तिच्यासमोर अडखळत तो प्रस्ताव मांडला. ऋषभशी लग्न करण्याचा. त्या म्हणाल्या,
“चित्रा तुझ्यामुळेच ऋषभ माणसात आला. मला नक्की खात्री आहे, तूच गोम्मटला आईचं प्रेम देऊ शकतेस. बघ, पण शेवटी तुला मनापासून पटलं तरच होय म्हण. पाहिजे तर अजून पुढे तू शिक. नोकरीसुद्धा कर, पण…गोम्मटची आई हो!” बोलता बोलता मालूआत्याचा गळा दाटून आला.

अचानक समोर आलेल्या त्या प्रस्तावाने चित्राचं मन मात्र सैरभैर झालं. नाहीतरी घरात तिच्या लग्नाची बोलणी चालूच होती. परत परत दाखवण्याचा तो फार्स! तिटकारा आला होतं तिला या सगळ्याचा! पण तिने विचार केला, मी जरी नाही म्हटलं तरी आजना उद्या दुसरी कोणीतरी सून म्हणून येईलच ना या घरात? आणि जर तिने गोम्मटला नीट नाही सांभाळले तर? मी…मी देईन गोम्मटला सख्ख्या आईचं प्रेम! निदान करुणाच्या आत्म्याला तरी समाधान मिळेल. तसं ऋषभमध्ये तरी काय आहे नाकारण्यासारखे…एक बिजवराचा डाग सोडला तर?

तिला स्वत:ला तर हे सगळं पटत होतं…पण आप्पांना हे सारं पटवणं खूपच अवघड गेलं. त्यांचं आपलं एकच पालूपद! माझी लेक काय आंधळी पांगळी आहे; म्हणून तिला बिजवराला दयायची? ते म्हणत, पाहिजे तर दोन एकरांचा डाग विकेन पण अगदी नंबरी स्थळ शोधेन मी तिच्यासाठी!” आप्पांचं हे असं तर आईची वेगळीच शंका, ती म्हणे,
“अगं चित्रा, सवतीच्या पोराला वाढवायचं तुला वाटत तेवढं सोपं नाही. तू कितीही नीट केलंस तरी लोकं दहा दहा तोंडांनी बोलतातच!” पण चित्राचा निश्चय अगदी ठाम होता….आणि म्हणूनच याही वेळेला तिचा अशोकआण्णा तिच्या पाठीशी उभा राहिला. नाईलाजाने आप्पांनी संमती दिली आणि लग्न अगदी साधेपणाने पार पडलं. निरोप देताना अशोक आण्णा म्हणाला, “चित्रा इथून पुढेच तुझी खरी कसोटी आहे. पण मला खात्री आहे की तू या कसोटीत नक्की जिंकशील”

लग्नानंतर तीनचार महिन्यातच साऱ्या घरादाराला चित्राने आपलंसं केलं होतं. आत्या आणि मामंजींची कर्तव्यदक्ष सून म्हणून, ऋषभची पत्नी म्हणून सारेजणच तिला किती मानायचे! कधीकधी तिला किती अभिमान वाटे स्वत:बद्दल! आपण काहीतरी जगावेगळे केले आहे अशी भावना क्षणभर तिच्या मनाला स्पर्शून जाई, पण…गोम्मटच्या एका नजरेने तिचा सारा अभिमान गळून पडे. तिला वाटे, हे एवढंसं पोर, पण कसली एवढी खळबळ चालते त्याच्या इवल्याश्या हृदयात? का स्वीकारीत नाही तो मला आई म्हणून? का माझ्या हातून तो दूधही पीत नाही आणि अंघोळपण करून घेत नाही?

काल-परवाचीच गोष्ट. सकाळी गोम्मट दुदू-दुदू करत स्वयंपाकघरात आला. आत्या परसात फुलं तोडत होत्या. चित्राने दुधाचा ग्लास भरला आणि हळूच गोम्मटला उचललं. त्याच्या गोबऱ्या गोबऱ्या गालावर तिने आपले ओठ टेकवले. सुखाची लहर शरीरभर दौडत गेली. पण…त्याचक्षणी गोम्मटने तिचा चेहरा झटक्याने दूर सारला आणि खाली झेप घेतली. दुधाचा ग्लास खाली पडला आणि आतले दूध जमिनीवर सांडून गेले.

अपमान आणि दु:खाने चित्राचा चेहरा रडवेला झाला. त्यातच भर म्हणून मागल्या दाराने पुतळा मोलकरीण हसत आत आली. म्हणाली,
“आई म्हणून घ्याचं एवडं सोप्पं न्हाय वैनी! मरणाच्या कळा सोसाव्या लागतात तेव्हा कुठं पोर जल्माला येतं. निस्तं चमच्यानं दुद पाजून कुटं आई व्हता येतं व्हय?” पुतळाचे हे उद्गार; चित्राला अगदी इंगळ्या डसावेत तसे वाटले. मनात असंख्य प्रश्नांचं मोहोळ उठलं.

“काय करू मी? हा गोम्मट मला कधीच आई म्हणून स्वीकारणार नाहीका? त्याच्या जन्माच्या प्रसववेदना मी सोसल्या नाहीत म्हणून काय झालं? यशोदेने कुठे सोसल्या होत्या कृष्णजन्माच्या कळा? म्हणून का तिचं कृष्णावरचं प्रेम खरं नव्हतं? आणि वेदना काय फक्त शरीरालाच होतात? शरीरापेक्षा मनाला होणाऱ्या वेदनाच जास्त दुखऱ्या नसतातका? गोम्मटने मला आई म्हणावं, माझ्याजवळ यावं म्हणून केवढी तडफड होते माझी मनाची? ही जीवघेणी तडफड, तगमग, वेदना, प्रसववेदनांपेक्षा का कमी प्राणांतिक आहे?”

दु:खाने चित्रा वेडीपिशी झाली. तिच्या डोळ्यातून झरझर आसवे ओघळू लागली. तेवढयात आत्या तिच्याजवळ आल्या. त्यांच्याही जीवाला चटका बसल्यासारखंच झालं होतं. चित्राच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या, “चित्रा, तू आणि ऋषभ श्रवणबेळगोळच्या यात्रेला आणि म्हैसूर बेंगलोरला तरी जाऊन येताका चार दिवस? नाहीतरी लग्न झाल्यापासून तुम्ही दोघे कुठेही गेलाच नाहीत.”
“नको, कुठंही जायचं नाही मला! आणि…कुठेही गेलं तरी माझ्या मनाला शांती नाही लाभायची!” चित्रा विमनस्कपणे म्हणाली. रात्री जेवताना आत्यांनी ऋषभपुढे यात्रेचा विषय काढला. त्यालाही जरा बदल हवाच होता. तो चित्राला म्हणाला, “जायचंका चित्रा मग?” त्यावर चित्रा म्हणाली,
“जाऊयात आपण! पण गोम्मटलाही बरोबर न्यायचं आपण!” तेव्हा मात्र ऋषभ नवलाने म्हणाला, “अगं तो तर तुझ्या वाऱ्यालाही उभा रहात नाही. प्रवासात किती त्रास देईल तो आपल्याला?”
“देऊदे त्रास! चालेल मला! पण त्याला घेतलं तरच मी येईन; नाहीतर नाहीच!” चित्रा म्हणाली. त्यानंतर मग आठच दिवसांनी चित्रा आणि ऋषभ गोम्मटला घेऊन श्रवणबेळगोळला निघाले. प्रवासात गोम्मट खूपच आनंदात होता. पण चित्राकडे जायला मात्र अजिबात तयार नसायचा. तिने हात जरी लावला तरी किंचाळायला लागायचा. नाहीतर मग अंगठा तोंडात आणि तर्जनीचं बोट नाकावर, अश्या थाटात ध्यानाला सुरुवात व्हायची.

पहिला मुक्काम श्रवण बेळगोळलाच होता. बस मुक्कामी पोचली तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते. ऋषभच्या खांद्यावर गोम्मट झोपला होता. झोपेतला त्याचा शांत पण काहीसा क्लांत चेहरा! थोडया वेळेपूर्वीच रडल्याने गालावर सुकलेले अश्रुंचे ओघळ! चित्राला अगदी भडभडून आले. पण काय उपयोग होता तिच्या या वांझोट्या वेदनांचा? खिन्न मनाने तिने आजुबाजूला पाहिलं. रात्रीच्या नीरव शांततेत विन्ध्यगिरीचा पहाड स्तब्ध उभा होता.
सकाळी चित्रा जरा उशिराच जागी झाली. उठून पाहते तर ऋषभ आणि गोम्मट आधीच आवरून तयार झाले होते. चित्राही मग झटपट तयार झाली. आज प्रथमच ती गोमटेश्वराचं दर्शन घेणार होती. दोनच वर्षापूर्वी आई आणि आप्पा महामस्तकाभिषेकासाठी आले होते, पण त्यावेळी चित्रा मुद्दामच आली नव्हती. गर्दी आणि गोंगाट तिला पहिल्यापासूनच नकोसा वाटे.

आज मात्र तिला गोमटेश्वराच्या दर्शनाची अनिवार ओढ लागली होती. आजुबाजूचा पवित्र आणि नयनरम्य परिसर, सकाळची सुगंधित हवा, सोनेरी सूर्यप्रकाश; तिच्या मनात अनाम आनंदाची लहर दौडत होती. गोम्मटही अडखळत, धडपडत, धावत होता. बोबड्या शब्दात ऋषभला काही सांगत होता.
चित्राच्या मनात मात्र लहानपणी वाचलेली गोमटेश्वराच्या मूर्तीच्या निर्मितीची कथा रुंजी घालत होती. मातृभक्त चामुंडरायाने, गोम्मटरायाने मातेच्या संकल्पपूर्तीसाठी घडवलेलं ते अजरामर शिल्प तिला डोळे भरून पाहायचं होतं. आणि म्हणूनच आपल्याच नादात  झपाझप चालत होती. चालता चालता ऋषभ आणि गोम्मट थांबले; तशी तिचीही पावले थबकली. तिने वर पाहिलं, आणि ती पहातच राहिली. विंध्यगिरीच्या श्यामल पाषाणातून घडवलेलं ते अजरामर शिल्प प्रत्यक्ष तिच्या डोळ्यासमोर उभं ठाकलं होतं. खड्गासनात उभी असलेली ती प्रशांत ध्यानमुद्रा पाहून तिचं भान हरपलं. निर्जीव पाषाणातून अरिष्टनेमीने साकारलेलं ते शिल्प पाहून तिच्या पापण्या झुकल्या, बोटं थरथरू लागली.

तिला अनिवार इच्छा झालीकी; कागद घ्यावा, पेन्सिल घ्यावी आणि ते अनोखं शिल्पसौंदर्य चित्रबद्ध करावं. पण याक्षणी न तिच्याकडे कागद होता ना पेन्सिल! ती मग फक्त पहात राहिली. पाहता पाहता तिच्या निमुळत्या लवचिक बोटातली थरथर तिच्या हृदयात उतरली.

महाकवी रन्नने महायोगी बाहुबलीचं रूप शब्दात आणि काव्यात साकारलं मग एका अभिजात शिल्पकाराने ते प्रथम चित्रबद्ध केलं. त्यानंतर आपला सर्व कसब, आत्मसौंदर्य पणाला लावून त्याला शिल्पात आकारबद्ध केलं. त्या दोन महान कलाकारांच्या तप:श्चर्येच फलित चित्रा आपल्या डोळ्यात साठवून घेत होती. सत्तावन्न गज उंचीची ती प्रमाणबद्ध मूर्ती, डोक्यावरचे कुरळे केस,प्रमाणबध्द पाय, त्यांना लपेटणाऱ्या लतावेली, नासाग्री स्थिरावलेली नेत्रकमले!
जिसट्ट कंदट्ट दलाणुयारम
सुलोयनम चंद समान तुंडम
घोणाद्रियम चंपय पुक्ख सोहम
तं गोम्मटेसम पणमामी णिच्चं….
चित्राच्या ओठातून आचार्य नेमिचंद्र यांच्या प्राकृत स्तुतीच्या ओळी बाहेर पडू लागल्या. पाहता पाहता ती निश्चल झाली. एकाग्र दृष्टीने पहात राहिली. सर्व जगतावर वत्सलतेचा वर्षाव करणारी ती गोमटेश्वराची करुणेने ओथंबलेली नजर! काय दिसत होतं तिला त्या नजरेत? आई आणि आप्पांच्या डोळ्यातली ममता, ऋषभच्या डोळ्यातली प्रेमळ आश्वासकता की करुणेच्या डोळ्यातली स्निग्धता…समईच्या शुभ्रप्रकाशासारखी!

चित्राच्या हृदयाच्या डोहात तरंग उठत होते आणि त्यातून बाहेर येत होते एका आगळ्या वेगळ्या जाणिवेचे सोनेरी किरण! ते किरण भगवंताच्या वत्सल नजरेच्या पावसात भिजून चिंब चिंब झाले…आणि मग त्यातूनही आरपार गेले. त्या रंगातूनच आता इंद्रधनुष्य फुललं होतं. चित्राच्या स्वच्छ मन:पटलावर!
आता तिचा मनमयूर पिसारा फुलवून मोहक पदन्यास करीत होता. तिच्या हृदयात जणू क्षीरसागराचे लोट उसळले होते. जणू शरीरभर पांढऱ्याशुभ्र दुग्धधारा दौडत होत्या. तिच्या हृदयाचा गाभारा एका अनामिक सुगंधाने भरून गेला होता. भगवंताचे ते निर्विकार दिगंबर रूप पाहून तिला गोम्मटचं बाळरूप आठवलं. निष्पाप आणि निरागस! त्याच्याविषयीच्या प्रेमभावनेने तिचं हृदय भरून वाहू लागलं…आणि त्याचक्षणी तिच्या मनातल्या साऱ्या क्षुद्र, हीनदीन भावना, शंका, कुशंका, भीती, आणि अभिमानसुद्धा पार वाहून गेला.

“माझा गोम्मट! माझं बाळ!”, ती म्हणाली आणि हुंदके देऊन रडू लागली….तेव्हा तिच्याशेजारी असलेला ऋषभ तिच्याकडे विस्मित होऊन पाहत होता…आणि चित्राच्या मनात परत असंख्य प्रश्नांनी गर्दी केली होती.
तिला वाटलं, इतके दिवस मला गोम्मटबद्दल वाटत होतं ते काय होतं? ममता, प्रेम की वात्सल्य? तिचं मनच तिला सांगत होतं. ते वात्सल्य नव्हतंच मुळी! एका आईवेगळ्या बाळाबद्दल वाटणारी ती कीव होती, सहानुभूती होती; किंवा कर्तव्यपूर्तीसाठी तिच्या बाह्य मनाने केलेला तो दिखावा होता. मनावरचे असंख्य पापुद्रे अलगदपणे उलगडले गेले होते; अगदी तिच्याही नकळत! तेही गोमटेश्वराच्या पायाशी! गेले कित्येक दिवस तिच्या मनाची चाललेली अखंड तडफड अचानकपणे आलेल्या या पुरामुळे अगदी थांबली होती. तिने अत्यानंदाने गोम्मटला हाक मारली,
“गोम्मट, गोम्मट!” तेव्हा ऋषभ म्हणाला,
“तो बघ गोम्मट ! उभा आहे तिकडे! सध्या माझ्यावरही रुसलाय तो!” चित्राने मागे वळून पहिले, गोम्मट कठड्याला रेलून उभा होता. हट्टीपणाने त्या दोघांकडे तो पहात उभा होता. उजव्या हाताचा अंगठा तोंडात आणि तर्जनीचे बोट नाकावर ठेवून तो नेहमीप्रमाणे उभा होता. चित्राला त्याचं ते ध्यान पाहून हसूच आलं…आणि मग तिने एक पाऊल पुढे टाकले, आपले दोन्ही बाहू पसरून काठोकाठ भरलेल्या नेत्रांनी, अपार प्रेमाने तिने त्याच्याकडे पहिले. कधी नव्हे ती गोम्मटनेही तिच्या नजरेत नजर मिळवली…आणि तो पहातच राहिला, एका अनिवार ओढीने! आणि …पाहता पाहता तो तिला येऊन बिलगला.

चित्राने त्याला आपल्या मिठीत घेतलं. तिच्या डोळ्यातल्या आनंदाश्रूंनी गोम्मटचे कुरळे केस भिजून चिंब चिंब झाले होते. गोमटेश्वराच्या साक्षीने जिवाशिवाच्या भेटीचा तो सोहळा ऋषभ अनिमिष नेत्रांनी पहात होता…आणि विंध्यगिरीच्या भूमीवर खंबीरपणे पाय रोवून उभ्या असलेल्या, गगनाला गवसणी घालणाऱ्या अतिविशाल गोमटेश्वराचे अंशरूप चित्राच्या हृदयात अंकुरलं होतं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.