चल चल वाऱ्या माझ्यासंगे
वेळुबनातुन धावायाला
शीळ घाल तू साद द्यावया … माझ्यातिल लपल्या गाण्याला….
चल चल पाण्या माझ्यासंगे
झरा होउनी बागडण्याला
खळखळ खळखळ मुक्त नाच तू… माझ्यामधली प्रीत नाचण्या
चल चल बिजले माझ्यासंगे
मेघांमधुनी कडाडण्याला
चाबुक फिरवित कडाड वीजे … माझ्यामधुनी वीज फिराया….
चल चल आभाळा मजसंगे
क्षितिजावरती झुकावयाला
झुकता झुकता हळू चूंब तू … माझ्यामधल्या दिवानगीला ….
चल चल पृथवे माझ्यासंगे
रानामध्ये भटकायाला
भटकत भटकत घट भर सुंदर … माझ्या आतिल दिवा पेटण्या….