चहा हवा मज मैत्रीसाठी कॉफी पण तव प्रीतीसाठी
दुधात केशर काडी नाजुक घालू साखर गोडीसाठी
बोलायाचे असूनसुद्धा कुणीच का रे बोलत नव्हते
अधरामधले शब्द नेमके कोणासाठी अडले होते
गप्पागोष्टी इतुक्या केल्या व्यक्त व्हायचे जमले नाही
एकांतातिल माझी स्वप्ने अतीव सुंदर कळले नाही
प्रश्न केवढे आणिक मोठे तरी न उत्तर कुणास पुसले
एकलीच मी उकलत बसले उकलत जाता हसले रडले
येच सखे तू विडा खावया रंगवूत मग आठवणींना
दूरदूरवर चांदण्यात फिरु भरते येण्या साठवाणींना
होते वेडी चिडकी रडकी मूढ आणखी हट्टीसुद्धा
चिंब चिंब मन भिजण्यासाठी घेइन पुन्हा कट्टीसुद्धा