रम्य वनी चंद्रिका बैसली तळ्यात प्रतिबिंबी
वाऱ्याने जल हलता थरथरली ती अंगांगी
जललहरींनी काठ गाठला डुलत हलत जेव्हा
गालावरती तिच्या उमटली खोल खळी तेव्हा
अवचित झाली नभात गर्दी श्यामल मेघांची
जळात नाचत सरी उतरल्या अंग धुण्यासाठी
ढगाआडुनी शुभ्र चंद्रिका बिंब जळी शोधे
जांभुळलेले वस्त्र तळ्यावर वरून ती फेके
दिव्य प्रभेने झळाळणारे लेउन वस्त्र मही
निळ्या नभावर चांदणपंखी ठोकुन देय सही