जाळीतुनी धुक्याच्या सुप्रभात पाऊले टाकी
तिज भास्कर चाहुल देतो उठवीत दिशांना दाही
किरणशलाका हळदी प्राचीवर कुंकुम उधळे
मेघना मुग्ध बाला तलम ओढणी घेते
घाटांची मोहक वळणे नववधू जणू सजणी
दागिने फुलांचे ल्याली नाकात वेलीची नथनी
झुळझुळे खोडकर ओढा काठावर हिरवी राने
पाण्यावर नीतळ शीतल सोनेरी झुकती किरणे
सूर्याला वंदन करती पोपटी कोवळी पाने
वाहतो सुगंधी वारा खग सारे गाती गाणे