कशास गाणे लिहू अता मी वाचायाला तो नाही
खरी समीक्षा करू कशाची जाणायाला ती नाही
कशास वाटा चालू आता वाट बघाया तो नाही
अवघड वळणे कशास घेऊ वळणावरती ती नाही
खिदळत नाचत गाऊ कशाला ऐकायाला तो नाही
कशास खुडू मी जुई मोगरा गजरा करण्या ती नाही
कशास अश्रू ढाळू आता रुमाल देण्या तो नाही
चुका कशाला करू त्याच त्या टिपावयाला ती नाही
मौन कशाला घेऊ आता मौनामध्ये तो नाही
कशास जुळवू शब्द शब्द मी शब्दामध्ये ती नाही
राजहंस मी बनू कशाला बिंब दावण्या तो नाही
सुंदर मोहक दिसू कशाला नजर लावण्या ती नाही
कशास मी मी करू अता मी तू तू करण्या तो नाही
ऊर बडवुनी रडू कशाला सांत्वन करण्या ती नाही
One response to “तो नाही अन ती नाही – TO NAAHEE AN TEE NAAHEE”
रचनेमध्ये एकप्रकारचे आदिम नृत्य आहे . काव्याचा आनंद मिळतो वाचून.