निळा रंग आभाळाचा मनात जेव्हा उतरत जातो..
नयनांमधल्या निळ्या डोहात हळूहळू पसरत जातो
पंख पसरून मुक्त पाखरे झेप घेतात नभात जेव्हा
मन गाणे गात गात हिंदोळ्यावर झुलते तेव्हा
हिंदोळ्यावर झुलता झुलता तरल होऊन शब्द काही
नकळत अर्थ देऊन जाती देहबोलीला दिशात दाही
डोळे बोलतात अधर विलगतात शब्दांमधला पकडून भाव
तरल धुक्याच्या पडद्याआडून हाका मारतो अनाम गाव
त्या गावाशी माझे नाते जन्मजन्मांतरीचे जोडून
काव्यगंगा खळाळून वाहे माझ्या आनंदी हृदयामधून