बोल मना कवाड उघड
दारे खिडक्या सताड उघड
घडा घडा बोलत जा
साठलं पाणी ओतत जा
पाऊस मग येईलच
चिंब चिंब भिजवेलच
भर पुन्हा रिता घडा
चढत जा उंच कडा
कड्यावरती ढगच ढग
डोळे भरून त्यांना बघ
डोळे तुडुंब भरुन येतील
झरझर अश्रू झरुन जातील
मन बनेल आरसपानी
गाण्यासाठी सुंदर गाणी