Maazaa aatmaa means my soul. Here, the poetess says, her soul is her God. Which is why she listens to her soul. The soul turns into early morning breeze and wakes her up. It gives her the wings to fly in the garden. In the end, the poetess says the soul takes her mother’s form and sings lullaby for her.
माझा आत्मा माझा ईश्वर!
म्हणुन ऐकते मी त्याचे…
पहाटवारा बनतो तो अन
त्याच्यासंगे मी उठते
पंख घेउनी त्याचे सुंदर
बागेमध्ये बागडते
घेऊन डोळे अधर तयाचे
सुगंध प्राशित मी हसते
पाय घेउनी त्याचे दणकट
अविरत घरभर वावरते
हात घेउनी त्याचे मजबुत
घरकुल माझे आवरते
मुलाफुलांच्या व्यथा बोचऱ्या
टिपण्यासाठी आतुरते
बनवुन त्याला ‘माझे दादा’
पडणाऱ्यांना सावरते
धनुष्य देता तो मम हाती
जिंकुन हृदये मी येते
म्हणतो जेव्हा लिही मला तो
कविता गझला मी लिहिते
हृदय चोरुनी त्याचे नकळत
प्रेम प्रियवर मी करते
घे विश्रांती म्हणतो तो अन
मिटून डोळे मी निजते..
स्वप्नामध्ये भूत पाहता
दचकून जेव्हा मी उठते,
मम आत्म्याचे रूप आईचे!
हळुहळू मज थोपटते…