आले आले वादळ वारे उडतो पाचोळा
भिजावयाला चिंब पावसी मन झाले गोळा
काळे काळे मेघ दाटले पश्चिम क्षितीजावरी
संथ मंद वाऱ्याच्या झुळकी झुळझुळती भूवरी
नभात पक्षी उडू लागले गाठाया झाडे
घरट्यामध्ये परतून आली किती चिमणपाखरे
सैरावैरा धावत धावत ढग झाले गोळा
भरून गेला आभाळाचा फलक निळा सावळा
सुटले वादळ देत इशारा झाडांना अवघ्या
खिडकीमधुनी शिरला वारा मागाहुन धारा
पाऊस आता धो धो धो धो कोसळेल अंगणी
छपरावरती तडतड गारा वाजतील नाचुनी
आला आला दूत पावसा तुझा चिमुकला पक्षी
झरझर भरभर सरी अंगणी रेखाया नक्षी
ठाऊक मजला अता पावसा तू येणारच रे
पीठ भज्यांचे कालविते मी कापून कांदा रे
रस्त्यावरची गर्दीसुद्धा हळूहळू पांगली
पाऊस बघण्या खिडकीपाशी सान बालके बसली
येरे येरे निळ्या पावसा धरेवरी धावून
दोरीवरचे सुकले कपडे ठेविन मी लावून
दळण दळाया बसली आहे ढगात म्हातारी
दळेल आता गात खुशीने ओताया झारी
जात्यामध्ये भरडून गारा झरतील पाऊस सरी
उडून काही उनाड गारा पडतील भूमीवरी
वेचून वाकुन करूत गोळा गारांचे मोती
भिजली माती सुगंध उधळील जोडाया नाती