(राष्ट्रीय जैन विद्वत्त सम्मेलन यर्नाळ येथे ‘शांतिसागर जीवन चरित्र’ ; या विषयावर शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०१९ रोजी चतुर्थ सत्रात सौ. सुनेत्रा सुभाष नकाते पुणे यांनी केलेले भाषण ..
)
आदरणीय व्यासपीठ आणि प्रिय श्रोतेहो..
प. पू. १०८ वर्धमानसागर महाराज ससंघ व कर्मयोगी स्वस्ति श्री चारुकिर्ती भट्टारक महास्वामी श्रवण बेळगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय जैन विद्वत्त संमेलनात श्री १०८ शांतिसागर महाराज जीवन व चरित्र या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी संयोजकांची आभारी आहे.
विशेष म्हणजे हे संमेलन सातगौडा स्वामींनी गुरु देवेंद्रकीर्ती स्वामींकडून जी जैनेश्वरी दीक्षा म्हणजे दिगंबर मुनिदीक्षा घेतली त्या कर्नाटक राज्यातील यर्नाळच्या पावन भूमीवर संपन्न होत आहे.
म्हणूनच ही दीक्षा घेण्यामागे महाराजांची आंतरिक प्रेरणा हेतू काय होता, त्यामागचे प्रयोजन काय होते हे जाणणे महत्वपूर्ण ठरते. त्यासाठी इतिहासाकडे मागे वळून पाहण्याची गरज वाटते.
जैन धर्मातील आद्य म्हणजे प्रथम तीर्थंकर भ. ऋषभदेव यांच्यापासून ते अंतिम तीर्थंकरभ. महावीर या सर्वांनी असेच प्रतिपादित केलेकी जैन धर्म हा अनादी अनंत आहे. तो कोणी स्थापन केलेला नाही.
भ.महावीर व भ.पार्श्वनाथ यांना तर आता इतिहासानेही मान्यता दिलेली आहे. भ. महावीरांनी सुद्धा असे कोठेही म्हटलेले नाहीकी मी नवीन धर्म स्थापन केला आहे.
भ. महावीरांपासून ते मौर्य काळापर्यंत जैन धर्म उत्तर भारतात उर्जितावस्थेत होता. परंतु जेंव्हा मौर्य सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात उत्तरेत बारा वर्षांचा दुष्काळ पडला. तेव्हा जैन धर्मीय श्रावकांबरोबर त्यांचे गुरुही देशभरात पसरले. गुजरात कर्नाटक म्हैसूर महाराष्ट्र तामिळनाडु भागात अगदी खेड्यापाड्यात जाऊन तिथल्या प्रादेशिक भाषेतून जैन साधूंनी ग्रंथरचना करून लोकशिक्षणाचे कार्य केले. पण त्यानंतर परकीय आक्रमणाच्या काळात इथली संस्कृती सामान्य माणसे भरडली जाऊ लागली. मूर्तीच्या विटंबना इ. मुळे साधूंना मूलाचार पाळणे आहार विहार करणे यात अडचणी येऊ लागल्या.
शहाजहान बादशहाच्या काळात दिगंबर मुनी कसे असतात हे सुद्धा कळणे अशक्य झाले होते. कवी बनारसी दास यांच्या ‘अर्धाकथानक ‘ या आत्मचरित्रातील श्लोकावरून अज्ञानामुळे लोंकांमध्ये मुनी जीवनासंबंधी असणाऱ्या विचित्र कल्पना पाहायला मिळतात.
‘चंद्रभान बनारसी उदयकरण अरु थान
चारो खेलही खेळ फिर करही अध्यातमध्यान
नगन होही चारो जने फिरही कोठरीमाही
कह हि भए मुनिराज हम कछु परिग्रह नाही ‘
यात अरु -आम्ही म्हणजेच बनारसीदास चंद्रभान व उदयकरण आदि मित्रांसमवेत अध्यात्म चर्चा करता करता नग्न होऊन एका खोलीत फिरत असू आणि समजत असूकी आम्ही निर्ग्रंथ मुनिराज झालो.. जर खोलीत नग्न होऊन फिरल्याने दिगंबर साधू होत असतील तर असे साधू घराघरातून उदंड निर्माण झाले असते. तर अशी अवस्था दिगंबरात्वाविषयी समाजात का निर्माण झाली होती..काही कारणे निश्चित होती.
आगमातील वर्णनाप्रमाणे प्रत्यक्ष साधूचे वास्तविक सत्य दर्शन न झाल्याने अश्या भ्रामक विकृत कल्पना निर्माण झाल्या होत्या. पण दक्षिणेत काही प्रमाणात ही परंपरा टिकून राहिली होती.
अथणी अकिवाट म्हैसूर चिकोडी तेरदाळ रायबाग स्तवनिधी नांदणी कोल्हापूर या भागात निर्वाण स्वामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिगंबर गुरुंची अक्षुन्न टिकून राहिली होती.
आणि अश्या या काळात यळगुड मुक्कामी ज्येष्ठ वद्य ६, इ.स. १८७२ साली शांतीसागर महाराजांचा जन्म झाला. (संतश्रेष्ठ आचार्यश्री शान्तिसागर चरित्र लेखक- डॉ.सुभाषचंद्र अक्कोळे, द्वितीय संस्करण २००४ वरून )
इ.स. १९११ साली सातगौडांच्या मातोश्रींनी आणि तत्पूर्वीच पित्यानेही इहलोकीची यात्रा संपविली. दुकानाचा धंदा व शेतीउद्यम करत असतानाही त्यांनी स्वहिताचा, आत्महिताचाच जास्त विचार केला. शिखरजी श्रवणबेळगोळच्या यात्रा केल्या.मनोभूमीस पुण्यभूमी बनवले.
अंतरंगातील उपजत वैराग्य भावना उसळून वर येऊ लागली तेव्हा बंधुजनांसमोर दीक्षा घेण्याचा मनोदय स्पष्ट केला. तेव्हा कुमगौडा नावाचे धाकटे बंधू म्हणाले,
“बंधो! खऱ्या गुरुंच्या अभावाने समाजात त्यागी वर्गाला योग्य असे वातावरण राहिले नाही. अशी अवघड दीक्षा घेऊन तू कोठे विहार करणार? आहारासाठी कोठे जाणार?”
आपल्या भावाने आहारासाठी दुसऱ्या कोणाच्या दारी जावे हे कुमगौडाच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते.
पण खरेतर याच्या अगदी उलट विचार सातगौडांच्या मनात होता. त्यांना सर्व प्रकारच्या ममत्वाचा त्याग करायचा होता. समाज अज्ञानाच्या अंधःकारात सरपटत असताना त्यांना मार्ग दाखवण्यासाठी व स्वतःची आत्मोन्नती करून घेण्यासाठी आपण स्वतःच खरा गुरु होणे योग्य नाही काय? असे त्यांना वाटत होते.
त्याच काळात भोजपासून जवळ असलेल्या कागल तालुक्यातील कापशीजवळील उत्तुर गावी एक दिगंबर एक दिगंबर मुनिराज, देवाप्पा स्वामी म्हणजेच देवेंद्रकीर्ती आले होते. त्यांच्याकडे जाऊन सातगौडांनी त्यांना भक्तिपूर्वक वंदन केले व निर्ग्रंथ दीक्षा देऊन कृतार्थ करावे अशी इच्छा व्यक्त केली. पण देवेंद्रकीर्तीनी त्यांना सांगितले कि गृहस्थावस्थेतही प्रतिमा म्हणजेच पायऱ्या (steps ) असतात. एक एक पायरी चढत शेवटी क्षुल्लक पद त्यानंतर ऐल्लकपद व त्याचे निरातिचार पालन केल्यानंतर दिगंबर मुनिदीक्षा घ्यायची असते. अंतःकरणातील वैराग्याची झेप मोठी असूनही गुरुंची आज्ञा प्रमाण मानून सातगौडांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस (शके १८३७, वि.स. १९७२) इ.स. १९१६ रोजी क्षुल्लक पदाची दीक्षा घेतली.(संतश्रेष्ठ आचार्यश्री शान्तिसागर चरित्र लेखक- डॉ.सुभाषचंद्र अक्कोळे, द्वितीय संस्करण २००४ वरून )
तेव्हा तांब्याला दोरी बांधलेले कमंडलू व देवेंद्रकीर्तीच्या पिंछीतील काही पिसे काढून बनवलेली पिंछी त्यांना मिळाली. पण असल्या बाह्य उपकरणापेक्षाही त्यांचे वैराग्य नैसर्गिक होते. कुठल्याही बाह्य आघाताने तर आलेले नव्हते. जणू पूर्वजन्माचेच ते संस्कार होते.
क्षुल्लक दीक्षा घेतल्यानंतर त्यांचा पहिला चातुर्मास कोगनोळीला दुसरा कुंभोजला व तिसरा परत कोगनोळीला झाला. त्या भागात धर्माच्या नावाखाली भोंदू साधू लोकांकडून पैसे उकळीत, व्यसन करीत, देवदेवतांची अवास्तव भीती दाखवून मंत्र तंत्र करीत, गंडेदोरे बांधीत. आपल्या उपदेशात महाराज लोकांना अश्या मिथ्या काल्पनिक देवदेवतांपासून सुटका करून घ्यावी हेच सांगत असत.
कोगनोळीच्या चातुर्मासानंतर महाराज जैनवाडीस व नंतर बाहुबली कुंभोजला आले. तेथे भेटलेल्या काही श्रावकांबरोबर आगगाडीने गिरनार यात्रेला गेले. खरेतर इर्यापथ शुद्धी पूर्णपणे पाळली जावी यासाठी पदविहार केव्हाही श्रेष्ठ! पण त्याकाळात त्यागी लोकांना योग्य शास्त्रोक्त आचारविधी समजावून सांगणारा कोणी नव्हता व महाराजांना स्वतःसही फारसा अनुभव नव्हता.
गिरनारहून येताना कुंडल रोड स्टेशन ला उतरून ते कुंडल क्षेत्राच्या पार्श्वनाथाच्या दर्शनास गेले. तेथेच पार्श्वनाथांच्या मूर्तीसमोर, यापुढे आपण आजन्म कोणत्याही वाहनात बसणार नाही, पायीच विहार करू अशी स्वयं प्रतिज्ञा घेतली. तिथूनच पुढे त्यांचा पायी पदविहार सुरु झाला.
कुंडलहून पदविहार करीत महाराज नसलापूर,ऐनापूर, अथणी मार्गे विजापूरजवळील बाबानगरास आले. तेथील सहस्त्रफणी पार्श्वनाथांचे दर्शन घेऊन ऐनापुरात आल्यानंतर तेथील आदिनाथ जिनमंदिरात त्यांना निर्ग्रंथ मुनिराज श्री. आदिसागर यांचा पावन सहवास लाभला. त्यांची त्यागमय अवस्था स्थीर झाली व ते स्वतःच ऐल्लक बनले.
अंतरंगात दिगंबर वृत्ती तर होतीच. मग बाह्य दिगंबरत्व कधी ना कधी येणारच. आत्म्याची विशुद्धी पंचेंद्रिय विषयापासून निर्लेप अलिप्ततेत असते. जितका संयम अधिक तितकी विशुद्धी अधिक हे सत्य समीकरण आहे. संयमाशिवाय इंद्रिय वासनाही नष्ट होणार नाहीत. इंद्रियांच्या वासना जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत विशुद्धी झाली असे कोणत्या अर्थाने म्हणता येईल…
दिगंबरत्वाचा असा एक भावपूर्ण सुसंगत आशय आहे. पण याचा अर्थ असाही काढू नये कि दिगंबरत्व म्हणजेच सर्वस्व!
‘दिगंबरत्व’ हा महात्म्यांच्या पूर्णावस्थेला आवश्यक असणाऱ्या गुणसमुच्चयाचा अंतिम व अविभाज्य असा घटक आहे. वैदिकांची परमहंस स्थिती देखील दिगंबर स्वरूपातच पाहावयास मिळते.
दिगंबर दीक्षा… जैन धर्मात मूर्च्छेला परिग्रह असे म्हटले आहे. शरीर वा शरीरबाह्य कुठल्याही वस्तूसंबंधी ममत्व भावनेच्या त्यागालाच दिगंबर दीक्षेत महत्व असते. तो तर दीक्षेचा अंतस्थ प्राण असतो.
महाराजांनी ऐल्लक दीक्षा तर स्वतः स्वतःच घेतली होती व त्या पदाची अनुभूती घेतल्यानंतर त्यांना निर्ग्रंथ दीक्षा घ्यायची होती. विशेषकरून जैन मुनींची विदेही वृत्ती कशी असते याचो साक्षात अनुभूती घ्यायची होती.
सिद्धांत ग्रंथात ज्या आठ प्रवचन मातृका असतात त्यात पाच समिती व तीन गुप्तीचा समावेश होतो.
चालणे, बोलणे, अन्नग्रहण करणे, वस्तू उचलणे, ठेवणे इतकेच काय पण मलमूत्र विसर्जन समयी सुद्धा सावधान व प्रामादरहित असावे . म्हणजेच ईर्या, भाषा, एषणा , आदान-निक्षेपण,उत्सर्ग या पाच समितींचे पालन करणेआणि मन वचन काय यांच्या बहिर्मुख प्रवृत्तीचा निरोध करणे म्हणजे मनोगुप्ती, वचनगुप्ती व काय गुप्ती होत.
ज्याप्रमाणे सावध माता आपल्या अपत्यांचे रक्षण करते त्याप्रमाणे सावधानपूर्वक पालन केलेल्या अथम प्रवचन मातृका मुनींच्या रत्नत्रयांचे व समता भावाचे रक्षण करतात. महाव्रतींच्या महाव्रतांचे रक्षण करणाऱ्या या धर्ममाताच असतात.
फक्त बाह्यवस्त्रांच्या त्यागाला दिगंबर दीक्षा म्हणत नाहीत तर या आठ मातांच्या वत्सल छायेखाली प्रमादरहित राहून निरंतर रत्नत्रयात रत असणे हेच दिगंबरव होय. हीच ती भगवती दीक्षा… जिची आस महाराजांना लागली होती.
महाराजांचा विहार जेव्हा ऐनापूर येथून निपाणी संकेश्वर, या भागाकडे सुरु झाला त्यावेळी संकेश्वरजवळील यर्नाळ येथे पंचकल्याणिक पूजा महोत्सव होता. महाराजांचे दीक्षागुरु श्री देवेंद्रकीर्ती व त्या भागातील त्यागीवृन्द तेथे जमलेला होता.
ऐल्लक सातगौडा जेव्हा तेथे आले तेव्हा त्यांच्या मनात दिगम्बरत्वाचे भाव दाटून आले. गुरुंपुढे त्यांनी मन मोकळे केले. देवेंद्रांकीर्तींनी दीक्षेसाठी आपले पात्र नीट पारखले तर होतेच पण तरीही पात्राला सावध करण्यासाठी ते म्हणाले,
” आजच्या काळात दिगंबर दीक्षा वाटते तितकी सहज सुलभ राहिलेली नाही. मिथ्यात्वाची भुतावळ हरेक जागी थयथयाट करीत असताना मनोमालिन्य, मुनीपदाविषयी ग्लानी वाटण्याची संभवता असते. असमर्थ आत्मा तहान-भूक इ. परिषहांचे नित्य प्रहार सहन करू शकत नाही. ”
यावर ऐल्लक सात गौडा म्हणाले,
” गुरुवर्य ! आपण सत्यच बोलताहात, पण, तुमचे चरण साक्षी ठेवून मी एवढेच सांगेनकी, मी हा पदभार सहजतेने तरीही प्राणपणाने सांभाळेन.
तेव्हा तेथे जमलेल्या समस्त नर-नारींनी महाराजांची योग्यता ओळखून त्यांच्या दीक्षेस आनंदाने सम्मती दिली.
त्यानंतर यर्नाळच्या पंचकल्याणिकात दीक्षाकल्याणिकाच्या दिवशी फाल्गुन शुद्ध १३, (वि.स. १९७६, शके १८४१,) इ.स. १९१९/२० रोजी ऐल्लक सातगौडांनी सर्व प्रकारच्या वस्त्रांचा त्याग करून दिगंबर दीक्षा धारण केली.(संतश्रेष्ठ आचार्यश्री शान्तिसागर चरित्र लेखक- डॉ.सुभाषचंद्र अक्कोळे, द्वितीय संस्करण २००४ वरून )
परमहंसरूप धारण केलेल्या या हंसाचे जातरुपधारी मुनीचे नाव शांतिसागर ठेवण्यात आले… हा दिवस महाराजांच्या जीवनात जितका महत्वाचा होता तितकाच अर्वाचिन जैन समाजाच्या इतिहासात पण महत्वाचा होता. त्यापूर्वीच्या चार-पाच शतकात जाणीवपूर्वक कोणी कोणाला दीक्षा देण्याघेण्याचा प्रयत्न केला असल्याची नोंद नव्हती. या त्यांच्या नव्या जाणिवेने जैन समाजाच्या नेणिवेतील आध्यात्मिक जीवनाला सुरेख वळण मिळाले.
महाराजांनी धारण केलेल्या या दीक्षेला जैनेश्वरी दीक्षा म्हणतात. त्या मुद्रेला जिनमुद्रा म्हणतात. ही मुद्रा धारण करणारा श्रमण हा अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचे मन-वचन-कायेने यावज्जीव पालन करतो. म्हणून त्याला महाव्रती म्हणतात.
अशा रीतीने ऐल्लक सातगौडा शांतिसागर होऊन पुनश्च विहारास सिद्ध झाले. ते शांतिसागर बनले असले तरी प्रारंभी चिकोडी भागात त्यांना सातगौडा स्वामी म्हणूनच लोक ओळखत असत.
कर्नाटक राज्यातील याच यर्नाळच्या पुनीत भूमीवरून शांतिसागरानी पुनश्च विहारास प्रारंभ केला. पुढे त्यानंतर कुंथलगिरी येथे समाधिस्थ होईपर्यंत त्यांचा विहार व धर्मोपदेश निरंतर चालूच राहिला.
शांतिसागर महाराजांच्या समग्र जीवन चरित्रात लौकिक दृष्ट्या मूर्त घटना किंवा कार्य म्हणजे त्यांचा जन्म १८७२ साली झाला. १९५५ साली कुंथलगिरी येथे ते समाधिस्थ झाले. १९२० ला त्यांनी मुनिषद धारण केले. १९३० ला राजाखेडा हत्याकांड त्यांच्या अपूर्व आत्मबलाने टाळले. १९३१ साली भारताची राजधानी दिल्ली येथे अपूर्व धर्म प्रभावनेने चातुर्मास संपन्न झाला.
१९४४ साली कुंथलगिरी येथी चातुर्मासात समाजाला अतिप्राचीन जिनवानी म्हणजेच धवलादि ग्रंथाच्या उद्धारासाठी प्रेरणा दिली. १९५४ साली बाहुबली कोल्हापूर भागात भ. गोमटेश्वर बाहुबलीची महामूर्ती उभी करण्याचा शुभ संकल्प समाजासमोर ठेवला.
माझे पिताश्री डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांनी लिहिलेल्या संतश्रेष्ठ आचार्य श्री शांतिसागर चरित्रात या चरित्र लेखनाच्या संदर्भात जे सारभूत असे लिहिले आहे ते असे आहे.
“या सर्व घटना आमच्या लौकिक विचाराला महत्वाच्या वाटल्या. आचार्यश्रींच्या दृष्टीने यात काही महत्वाचे नव्हते. त्यांनी स्वतःच्या ज्ञान-दर्शन-चारित्र्याचा संपूर्ण सुखद असा विकास साधला. त्या गुणांचा विकास हाच त्यांचा आनंद. हेच त्यांचे अद्वितीय व्यक्तिमत्व. त्यांचे चरित्र म्हणजे त्यांच्या आत्म्याचे चरित्र. येथे त्यांच्या नावागावाला महत्व नाही. कालानुसारी घटित घटनांना सुद्धा महत्व नाही. जन्म समाधीच्या ठिकाणांना सुद्धा महत्व नाही. दीक्षेला विहाराला महत्व नाही. शिष्य-प्रशिष्यांच्या संघसमूहाला महत्व नाही. त्यांच्या आत्मचरित्रात हे सर्व अभूतार्थ आहे. ..हा त्यांचा मनोमन निश्चय होता. म्हणूनच त्यांचा व्यवहार हा व्यवहार ठरला.
धन्यवाद!!
समाप्त …..