पानापानावर तरुणांनो
लिहा स्वतःची गाणी
आठवणींची फुले निरागस
फ़ुलतिल पानोपानी
दोनच पानामध्ये लपुनी
कळ्या पाहती बागा
फुलण्यासाठी तापतापुनी
कधी न करिती त्रागा
ऋतू कोणता आहे त्यांना
घेणेदेणे नाही
उमलुन येती हृदय उमलता
बोलत काहीबाही
सहज चुंबितो गूज सांगतो
शीळ घालतो वारा
अंबरातुनी रातराणिला
साद घालतो तारा
माझे माझे म्हणू कशाला
विश्वचि अवघे माझे
पुनव अमावस लाट सागरी
अंतर्यामी गाजे