इतुक्या सुंदर भूमीवरती जगावयाला मिळते आहे
भाव फुलांचा तयात दरवळ भरावयाला मिळते आहे
लाल असुदे अथवा काळी भूमी प्रसवे वृक्ष लतांना
उलते फुलते अंकुर जपते उदरभरण प्राण्यांचे करण्या
काठावरती वसोत वाड्या सरिता दुहिता अखंड वाहो
नीर तिच्यातील शुद्ध ठेवण्या मती आमुची तत्पर राहो
अभयारण्ये हिरव्या राया वन्य जिवांना मुक्त फिराया
प्रकृतीतल्या अन्न साखळ्या रहो सलामत जीव टिकाया
शुभ कार्याला मुहुर्त कसला शुभस्य शीघ्रम मंत्र आचरू
अंधश्रद्धा पूर्ण उखडण्या स्वतःपासुनी सुरुवात करू