सकाळी सकाळी
कोंबडा आरवे
कडधान्य खाण्या
अंगणी पारवे
गोठ्यातली म्हैस रवंथ करते
रेडकू खुंट्याच्या भवती फिरते
सकाळी सकाळी
म्हणत भूपाळी
आजीबाई फिरे
गव्हाळी गव्हाळी
वासुदेव येतो नाचत नाचत
धान्य ओते माय तयाच्या झोळीत
सकाळी सकाळी
पूजा मंदिरात
अष्टद्रव्य घेते
आई तबकात
मंदिरात जाई माझी छान आई
तिच्यासवे जाण्या किती माझी घाई
सकाळी सकाळी
मोगऱ्याची फुले
भरून सानुली
परडी ग झुले
परडी घेऊन जाते मंदिराला
प्रभू चरणाशी पुष्प वहायाला