सोहमच्या ध्यानात रमूदे – SOHAMCHYAA DHYAANAAT RAMOODE


In this poem the poetess says, I want to recite my soul’s inner voice,’Soham! Soham!Soham!… Soham is a feeling that arises in mind or heart when you know who you are.

कण कण खिरता मोह असूदे
विरहाग्निचा दाह असूदे
दिवस असूदे माह असूदे
नववर्षाचा प्रवाह असूदे
जीवाचा उन्मेष असूदे
मीरेचा तो कृष्ण असूदे
क्षमस्व अथवा बहार असूदे
नमस्कार आभार असूदे
प्रपात सागर समीर असूदे
शुभ्र हिमाची गार असूदे
धगधगता अंगार असूदे
जलधारांचा नाद असूदे
वेळू बनातील शीळ असूदे
गतकाळाचा पीळ असूदे
बकुळ फुलांचा गंध असूदे
अंत आदि मम तोच असूदे
विषय असूदे कषाय असूदे
निर्भय अथवा अभय असूदे
मान असो अभिमान असूदे
प्रीतीमधला संयम असूदे
हिमालयाचे शिखर असूदे
प्रलयामधला मलय असूदे
पहाड अबूचा उंच असूदे
मनात तरीही विनय असूदे
हृदयी जपले गुपीत असूदे
जपणा-यांचा विजय असूदे
प्रीतीचा तो अभिनय असूदे
शुष्क असो वा जलमय असूदे
पक्व फलासम रसमय असूदे
रंग श्रावणी धनुष्य असूदे
भाद्रपदातील ऊन असूदे
शरदासम चंदेरी असूदे
हेमंतातील कांचन असूदे
शिशीरामधले मौन असूदे
वसंतातला उत्सव असूदे
गुलमोहर वा पलश असूदे
ग्रीष्मामधला जलसा असूदे
सुभाष असूदे दुभाष असूदे
दूरभाष वा ध्यास असूदे
विद्या ज्ञान नी स्नेह जपू दे
राधेचा तो प्रणय असूदे
भगवंताचा प्रसाद असूदे
राहीचा ईश्वर ही असूदे
संपवण्या तम दीपक असूदे
आदित्याचा प्रकाश असूदे
शशांक शीतल उज्वल असूदे
बंधुत्वाचा प्रदीप असूदे
धीर वीर महावीर असूदे
गौतम गणधर प्रेषित असूदे
शुद्ध बुद्ध तीर्थंकर असूदे
खुदा असो वा ख्रिस्त असूदे
शांतीचा पण नाथ असूदे
भू मातेचा पालक असूदे
अवखळ चंचल बालक असूदे
स्वर्गामधला इंद्र असूदे
आत्म्याचा संतोष असूदे
समयांचा तो समय असूदे
मोक्षाचा आनंद असूदे
कैवल्याचा चंद्र असूदे
चांदण भरले अंबर असूदे
निशिगंधाचा गंध असूदे
प्रशांत असूदे प्रमोद असूदे
हर्षित होऊन मुक्त वाहूदे
मधुर प्रीतिचा संदेश असूदे
हृदयीचा अभ्युदय असूदे
कुंदफुलांसम तो बरसूदे
निरंजना सम तो तेवूदे
कोहम कोहम पुरे पुरे रे
सोहमच्या ध्यानात रमूदे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.