This short-story is based on Jain philosophy. In this story it is told that where there is love there is a God. God lives in the heart of human beings. We can achieve moksha or Mukti On this earth.
तारका- दिवाळी,२००३
कथासंग्रह-शासन
सुमेरू प्रकाशन
मी कुणी प्रतिभेचा स्पर्श लाभलेली कलावंत नाहीकी लेखिकाही नाही. तरीपण मी आज काहीतरी लिहिणार आहे, कारण मला झालेला आनंद आज माझ्या हृदयात मावेनासा झालाय. म्हणूनच मला तो भरभरून व्यक्त करावासा वाटतोय. माझ्या या प्रकटीकरणात भाषेचं सौंदर्य नसेल, व्याकरणशुद्धताही नसेल, मनाला भावणारी शब्द तुषारांची कारंजीही नसतील कदाचित! कुणी ते वाचावं, त्याचं कौतुक करावं, एवढं त्याच मोल नसेलही. पण मी त्यासाठी हे लिहीतच नाही. मी लिहितेय फक्त माझ्या स्वत:च्या आनंदासाठी!
विवा माझं नाव! थोडं वेगळं वाटतयना? पण त्या नावामागचा इतिहास कळला तर ते वेगळं नाही वाटणार. आईबाबांचं मी सातवे अपत्य. त्यांची पहिली सहाही अपत्ये अल्पायुषीच ठरली. अगदी सहा महिन्यांच्या आतच गेली. मग मी जन्मले. आईबाबांना आनंद झाला. आईचे माहेर कर्नाटकातील हुमचा! तिथली पद्मावती माझ्या आईचं श्रद्धास्थान! माझं नाव पद्मावती ठेवावं अशी आईची खूप इच्छा होती. पण बाबांनी माझं नाव विवा ठेवलं. बाबा विद्यापीठात संस्कृत आणि प्राकृत शिकवायचे. इंग्रजीवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व होतंच.
माझं विवा हे नाव आईला अजिबात आवडलं नाही. मग त्यावेळी बाबांनी सांगितलं, “विवा, म्हणजे जीवेत शरद:शतम! हे नाव ठेवून आपल्या मुलीने फक्त शंभर वर्षे जगावं अशीच नाहीतर शंभर वर्षे शरदाच्या चांदण्यात न्हाऊन निघावं अशी मनापासूनची इच्छा व्यक्त करतोय मी!” मग मात्र आईला माझं नाव अगदी मनापासून आवडलं.
मुलगी म्हणून माझ्या आईवडिलांनी माझ्यावर कसलीही अतिरेकी बंधने घातली नाहीत. मुलींना येणाऱ्या शारीरिक मानसिक अडचणींचा माझ्या घरात कोणी कधी बाऊ केला नाही. म्हणूनच शैशवातले, तारुण्यातले सारे मनोविष्कार मी मुक्तपणे अनुभवले. कळीचे फुल होताना तिला होणारा आनंद मी अगदी मनापासून अनुभवला.
लीलाक्का माझी आत्या बालविधवा होती. ती श्राविकाश्रम चालवायची. आश्रमात जास्तीतजास्त विधवा, घटस्फोटिता, प्रौढ कुमारिकाच असायच्या. बऱ्याचजणींच्या बोलण्यातून स्त्रीजन्माबद्दल नाराजीच जाणवायची. तिथल्या स्त्रियांची, मुलींची दु:खे मी मनापासून ऐकत असे. ऐकताना माझं मन आतून हलायचं, कधी कधी ढवळूनही निघायचं…पण ते तेवढ्यापुरतेच. त्या स्त्रियांच्या समस्यांचा शोध घ्यावा, त्यांच्यासाठी धडपडून काही करावं असं मात्र मला कधी वाटत नसे. उलट मला जे मिळालय त्याचा मुक्तपणे उपभोग घ्यावा, खावं, प्यावं आणि मौज करावी अशा वृत्तीची होते मी!
त्या स्त्रियांनी भोगलेली दु:खं, वेदना मी प्रत्यक्षात कोठे अनुभवल्या होत्या? मग स्त्रीजन्म हा पुरुषजन्मापेक्षा वाईट असं मी का म्हणावं? उलट स्त्रीचं जीवन म्हणजे मला जणू गंधभरी कुपीच वाटे. पांढऱ्याशुभ्र साडीतली, सतत मोठमोठी पुस्तकं वाचणारी कर्तव्यदक्ष लीलाक्का म्हणजे मला स्वत:च्याच गंधात बुडून गेलेली झाकण बंद असलेली कुपीच वाटे, तर माझी आई म्हणजे मला झाकण उघडलेली कुपी वाटे…मुक्तपणे रंग-गंधाची उधळण करणारी!
कॉलेजात मला खास जवळच्या अशा कोणी मैत्रिणीच नव्हत्या. त्या मुलींचे अन माझे सूर कधी जुळायचेच नाहीत. सतत मुलांच्या पुढे पुढे करणाऱ्या, तोकड्या कपड्यातही सहजपणे वावरणाऱ्या मुली मला जशा आवडत नसत तसेच उगीचच लाजणाऱ्या, मुलांना टाळणाऱ्या मुलीही मला आवडत नसत. परंपरेनं स्त्रीने जे करू नये असं ठरवलं असेल ते करण्यात मला जास्त रस वाटे. म्हणूनच मी मेकॅनिकल इंजिनियरिंगला प्रवेश घेतला.
मी खूप खूप अभ्यास करायचे, प्रत्येक परीक्षेत पहिल्या पाचात असायचे. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. भविष्याची सोनेरी स्वप्ने मला साद घालू लागली. करीयरची, मनासारख्या जोडीदाराची स्वप्नं पाहण्याचच माझं ते वय नव्हतका? लग्नामुळे माझ्यावर काही बंधने येतील असंपण मला तेव्हा वाटत नसे.
त्यादिवशी कॉलेजात ‘श्रेष्ठ कोण? स्त्री की पुरुष?’ या विषयावर परिसंवाद होता. सर्वच मुलामुलींनी आपली मतं अगदी हिरिरीने मांडली. सर्वात शेवटी मी बोलायला उठले. मी म्हणाले,
“स्त्री किंवा पुरुष यांच्यात कोणी एकच कसा श्रेष्ठ असू शकतो? या माझ्या पहिल्याच वाक्याने मी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. त्यानंतर मग मी पुढे बोलतच राहिले. मी पुढे म्हणाले,
“एखादी व्यक्ती स्त्री असो की पुरुष; जर तिच्यात संयम, सहनशीलता, ऋजुता, कोमलता, वात्सल्य या स्त्रीगुणांचा आणि शौर्य, धाडस, वीरता, औदार्य या पुरुषगुणांचा परिपूर्ण संगम झाला असेल तीच व्यक्ती सर्वश्रेष्ठ नाही काय? मग ती व्यक्ती स्त्री आहेकी पुरुष हा प्रश्नच कुठे येतो? आज आवश्यक असणाऱ्या स्त्रीगुणांनाही पुरुष गुणांपेक्षा कमी दर्जाचं मानलं जातं. त्यामुळे स्त्रीलाही आपोआपच गौणत्व येतं.
येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, प्रभू रामचंद्र, तीर्थंकर महावीर, महंमद पैगंबर, या व्यक्तींना देवत्व का प्राप्त झालं? ते फक्त पुरुष होते म्हणून? नाही! त्यांना देवत्व प्राप्त झालं कारण त्यांच्यात स्त्रीत्व आणि पुरुषत्व आपल्या सर्व सौन्दर्यानिशी पूर्णपणे उमललं होतं म्हणून!”
मी बोलत होते. माझं वक्तृत्व कौशल्य, पढिक पांडित्य, हजरजबाबीपणा, विचारांचं केलेलं निर्भय प्रकटीकरण, यामुळे मी समोरच्या श्रोत्यांप्रमाणेच परीक्षकांची मनेही जिंकून घेतली. माझ्या प्रत्येक वाक्यावर क्षणाक्षणाला टाळ्या पडत होत्या. बोलणं संपवून जेव्हा मी स्टेजवरून खाली उतरले तेव्हा मी जणू हवेत तरंगत होते. तेवढ्यात…एक उंचापुरा घाऱ्या डोळ्यांचा तरुण माझ्याकडे आला. म्हणाला,
“अभिनंदन! खूपच छान बोललात तुम्ही आज. तुमचे विचार खरोखरच विचार करायला लावणारे आहेत.” त्या अपरिचित पण आकर्षक व्यक्तिमत्वाच्या तरुणाचे ते बोल ऐकून मी मोहरले. इतका वेळ व्यासपीठावर निर्भयपणे बोलणारी मी त्याच्याकडे पहातच राहिले. हृदय धडधडू लागले आणि मला एक शब्दही बोलता येईना. तेव्हा किंचित हसत तोच पुढे म्हणाला,
“मी अभिनंदन देसाई! माझ्याशी मैत्री करण्यात तुम्हाला काही हरकत नाहीना?” अजूनही मी थोडीशी संभ्रमातच होते. मग तोच पुन्हा म्हणाला,
“मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी!” असे म्हणून त्याने मैत्रीचा हात पुढे केला….पण तेवढ्यात इतर मुलामुलींनी मला घेरलं अन अभिनंदनाच्या वर्षावात मी बुडून गेले.
संध्याकाळी मी घरी आले ते आनंदाच्या लाटेवर आरूढ होऊनच. त्यावेळी चष्म्याच्या काचेतून माझ्याकडे मिस्कीलपणे पहात बाबा म्हणाले,
“काय विवाबाई, आजचा परिसंवाद गाजवलात म्हणे तुम्ही?”
“पण…पण तुम्हाला कसं कळलं?” मी काहीश्या आश्चर्यानेच म्हणाले. तेव्हा बाबा हसत हसत म्हणाले,
“आमचे बरेच खबरे आहेत म्हटलं तिथे?” असं म्हणून परत पुढे ते म्हणाले,
“तारुण्याच्या जोशात विचार मांडणं खूप सोप्पं असतं. पण ते विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणं खूप कठीण असतं. आपले विचार आणि आपली कृती यात समन्वय असायला हवा. तारुण्यातले विचार समुद्राच्या लाटांसारखे असतात. खूप उंच उसळी घेतात, पण खडकावर आपटताच फुटून चक्काचूर होतो त्यांचा!”
बाबांचे हे बोलणे ऐकून मी थोडी विचारात पडले खरी! कारण तसं पाहिलं तर मी मांडलेले विचार खरोखरच माझे होतेका? इकडच्या तिकडच्या पुस्तकातून वाचलेल्या उसन्या शब्दांची, वाक्यांची मोहक मांडामांडच नव्हतीका ती? प्रत्यक्षात माझं वागणं कसं होतं? मी किती हट्टी आणि लाडावलेली होते. संयम आणि स्त्रीची उपजत सहनशीलता खरोखरच होतीका माझ्यात?
पण हे असले विचार माझ्या मनात फारसे टिकतच नसत. परीक्षेच्या काळात झपाटून अभ्यास करायचा आणि परीक्षेनंतर कथा-कादंबऱ्यांची पारायणे करायची, किंवा लीलाक्काच्या आश्रमातल्या मुलींबरोबर गप्पा-गोष्टी करायच्या यात माझ्या उन्हाळी आणि हिवाळी सुट्ट्या पाहता पाहता संपून जायच्या.
पण यावर्षी माझं मन पूर्वीसारखं अभ्यासात रमेना. शेवटची सेमिस्टर महिन्यावर येऊन ठेपली होती. आणि…त्यादिवशी मला अचानकपणे कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये तो दिसला. तोच अभिनंदन देसाई! मला पाहताच तो माझ्याजवळ आला. त्यादिवशी मी त्याला तसं ओझरतच पाहिलं होतं पण तरीही त्याचा ऐटबाजपणा मला खूप आवडला होता. आजही तो तितक्याच ऐटबाजपणे उभा होता. त्याचं हसणं, अस्खलित इंग्रजी बोलणं, या सगळ्यांनी गारूड केलं माझ्या मनावर!
त्यानंतर तो मला बऱ्याच वेळा भेटला. आमच्यात संभाषणही घडू लागलं. परिचय वाढला आणि आमच्या भेटीगाठीही वाढल्या. आणि मग…परीक्षा संपताच आम्ही लग्न करायचं ठरवलं.
तो आमच्याच जातीतला, शिवाय इतका देखणा आणि रुबाबदार! त्याचं घराणंही मोठं होतं. १० लाखांचे कर्ज काढून त्यानं स्वत:चं वर्कशॉप काढलं होतं. त्याची काही स्वप्ने होती आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याला माझी साथ हवी होती. आणि…मी तर पूर्णपणे अभिनंदनमयच झाले होते.
परीक्षेसाठी मी नेहमीप्रमाणेच खूप परिश्रम केले, आणि परीक्षा संपताच सुटकेचा सुस्कारा सोडला. दरवर्षीप्रमाणे सुट्टीत कथा-कादंबऱ्या वाचण्यात आणि कवितेत गुरफटून जाण्यात माझं मन रमेना. उन्हाळ्यातले ते लांबलचक दिवस खूपच कंटाळवाणे वाटू लागले. वळीवाच्या पावसाची वाट बघत मन झुरणीला लागले. आम्रतरूवरच्या कोकिळेचा कुहुकार ऐकत मी तासनतास बसून राहू लागले.
त्यादिवशी संध्याकाळी जेवताना माझ्याकडे पाहत बाबा आईला म्हणाले,
“विवासाठी उत्तम स्थळ आलंय. मुलगा अमेरिकेत असतो. सुसंस्कारित कुटुंबातला आहे. विवा ज्या वातावरणात वाढली त्याहीपेक्षा त्याहीपेक्षा स्वतंत्र आणि मोकळं वातावरण आहे त्यांच्या घरात! . शिवाय अमेरिकेत आपल्या विवाला तिच्या मनासारखं करियर करता येईल.”
बाबांचं बोलणं ऐकून मी थोडी दचकलेच. इतक्या लवकर या प्रश्नांवर काही बोलावे लागेल याची मला कल्पनाच नव्हती. पण तरीही विषय निघालाच आहे तर हीच वेळ आहे मनातले सांगून टाकायची; हे कळण्या इतपत मी नक्कीच चाणाक्ष होते. म्हणून धीर करून मी म्हणाले,
“बाबा, माझं लग्न मी ठरवलंय.”
“काय? तुझं लग्न तूच ठरवलंस?”
“हो! बाबा, मी ठरवलंय माझं लग्न.” मी थोडी घाबरतच म्हणाले. तसे बाबा माझ्याकडे शंकित नजरेने पाहत म्हणाले,
“विवा, कोणाशी ठरवलंस तू लग्न? त्या अभिनंदन देसाईशी तर नव्हे?” यावर मी गप्पच राहिले. मग बाबाच पुढे म्हणाले,
“विवा. खरंतर या गोष्टीचा अंदाज मला काही दिवसापूर्वीच आला होता, पण…तुझ्या परीक्षेच्या काळात तुझी मनस्थिती बिघडू नये म्हणून मी तेव्हा काही बोललो नाही.”
बाबांच्या या बोलण्यावर आई माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. बाबांना म्हणाली,
“अहो, काय म्हणतेय ही? खरच असं काही असेल तर तिला आधी विचारून मगच पुढचं काय ते ठरवा. शेवटी तिच्या लग्नाच्या बाबतीत तिचा निर्णय जास्त महत्वाचा!” त्यावर बाबा शांतपणे आईला म्हणाले,
“हे बघा तिचा निर्णय महत्वाचा हे खरेच…पण ती अजून लहान आहे, तेव्हा काही गोष्टी तिला वेळच्या वेळी समजावून सांगणे जास्त गरजेचे आहे.” मग पुन्हा माझ्याकडे वळून ते म्हणाले,
“विवा, तू आमचं एकुलतं एक अपत्य! तुला आम्ही मोकळेपणाने वाढवलं. तुझं व्यक्तिमत्व खुरटू नये, त्याचा सर्वांगानं विकास व्हावा म्हणून आमच्या परीने शक्य असेल ते सारे प्रयत्न आम्ही केले. यात आम्ही खूप काही मोठं केलं असं मला मुळीच म्हणायचं नाही.ते तर आमचं कर्तव्यच आहे. पण तरीही लग्नाच्या बाबतीत निर्णय घेताना कधी कधी तरुण मुला-मुलींकडून खूप वरवरचा विचार केला जातो असे माझे निरीक्षण आहे. म्हणून काही गोष्टी तुला सांगाव्या वाटतात.” त्यावर आई म्हणाली,
“विवा, तुला बाबा काय म्हणताहेत ते कळतंयना?” त्यावर मी मान डोलावताच बाबा म्हणाले,
“हे बघ विवा, जर तू लग्नाचा निर्णय घेतलाच असशील तर तर मी त्याला विरोध करूच शकणार नाही. पण तुझ्यापेक्षा काही पावसाळे मी जास्त पाहिलेत. तुझा स्वभाव मी पहिल्यापासून चांगलाच ओळखतो. तेव्हा मी सांगतो ते तुझ्या नक्कीच हिताचे असेल. तेव्हा माझ्या बोलण्यावर विचार करशिलना?” यावर मी पुन्हा फक्त मान डोलावली. तेव्हा बाबा म्हणाले,
“तारुण्यातले विचार, आवडी-निवडी कायम राहतीलच असे नाही. आज तुम्हा दोघांना तुमच्यातल्या ज्या गुणांचं आकर्षण वाटतंय ते तात्कालिकही असू शकतं. तुम्ही दोघंही अगदी भिन्न आणि निराळ्या वातावरणात वाढला आहात. शिवाय देसायांच्या घराचा डोलारा वरून मोठा भव्य वाटत असला तरी सध्या ‘बडा घर पोकळ वासा’ अशीच स्थिती आहे त्यांच्या घराची! बरंच कर्ज आहे म्हणे त्यांच्यावर. त्याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातलं वातावरण खूप कर्मठ अन जुन्या वळणाचं आहे. तिथल्या सोवळ्या-ओवळ्याशी अन जुन्या मतांशी जमवून घेणं तुला फार कठीण जाईल बेटा! म्हणून सांगतो यावर तू पुन्हा एकदा शांत डोक्याने विचार कर.”
खरतर बाबांनी सर्व काही किती व्यवस्थितपणे समजावून सांगितलं मला! पण त्यावेळी त्या सर्व गोष्टींवर विचार करण्यासाठी माझ्याकडे उसंतच नव्हती. मी खरेतर त्यावेळी शुद्धीतच नव्हते. अभिनंदनशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. त्याचं चालणं, बोलणं, दिसणं…आणि त्याची ती नजर माझ्या अंत:करणाला किती व्यापून राहिली होती.
त्यानंतर दोन-तीन वेळा घरातून मला समजावण्याचा प्रयत्न झाला…पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. आणि म्हणूनच मी शेवटी अभिनंदनशी विवाहबद्ध झाले.
लग्नानंतर पहिले काही दिवस माझ्या शरीराबरोबर माझं मनही जणू फुलांच्या पायघड्यांवरून चालत होतं. शिकलेली, बुद्धिमान, स्मार्ट अन लाडाकोडात वाढलेली माझ्यासारखी सून सासरघरच्या कौतुकाचा विषय होती. मीही सुरुवातीच्या त्या कौतुकभरल्या दिवसात किती रमून गेले होते. आमचं ते एकत्र कुटुंब म्हणजे आईच्या कौतुकाचा विषय होते.
माहेरी इकडची काडीही तिकडे न करणारी मी नवऱ्याच्या आधी उठून त्याची सर्व कामे मनापासून करू लागले. त्याचे कपडे, रुमाल, कामाची कागदपत्रे तत्परतेने त्याला हव्या त्यावेळी देऊ लागले. त्याच्या कपड्यांना इस्त्री करताना, त्याच्यासाठी चहा बनवताना, त्याच्या आवडी-निवडी जपताना मी माझं मीपण जणू विसरूनच गेले. देखण्या रुबाबदार नवऱ्याच्या सहवासानं, त्याच्या आकर्षक व्यक्तीमत्वानं माझं स्वत:चं व्यक्तिमत्व पुसलं गेलं होतं की झाकोळून गेलं होतं कोण जाणे पण मी पहिल्यापेक्षा अगदी वेगळी वेगळी झाले होते. आई आणि लीलाक्का तसं बोलूनही दाखवायच्या. बाबा काही बोलत नसत पण माझ्यातला हा बदल त्यांना अस्वस्थ करी. त्यांची नाराजी त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवे.
एक दोन वेळा त्यांनी मला नोकरीसाठी चारदोन ठिकाणी अर्ज करण्यासही सुचवले पण अभिनंदनने ते उडवून लावले. त्याचं म्हणणं असं होतं की काही दिवसांनी मी वर्कशॉपमध्येच लक्ष घालावं. घरचाच व्यवसाय असल्याने बायकोने दुसरीकडे नोकरी करू नये असे त्याचे म्हणणे पडले. आणि त्यावेळी ते मलाही लगेचच पटले, कारण लग्न म्हणजे म्हणजे कुणी एकाने दुसऱ्याच्या व्यक्तीमत्वात पूर्णपणे विरघळून जाणे नसून; परस्परांच्या साह्चर्याने प्रेमाने आपापली व्यक्तिमत्वे स्वतंत्रपणे फुलवीत राहणे हे जणू मी विसरूनच गेले होते…
आणि म्हणूनच लग्नानंतर जोडीने हुमच्याच्या पद्मावतीच्या दर्शनाला जाण्याची आईची इच्छा मी धुडकावून लावली. अभिनंदनच्या म्हणण्यानुसार त्याच्या आईला व आप्पांना ते आवडले नसते. त्यांच्या दृष्टीने देवी-देवतांची उपासना करणं, त्यांचं दर्शन घेणं म्हणजे मिथ्यात्व होतं. खरेतर मिथ्यात्व, सम्यकत्व असल्या शब्दांचे अर्थ माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरचे होते. तरीही मी अभिनंदनचं म्हणणं मुकाट्याने मान्य केलं.
बाबांना माझं हे वागणं अपेक्षित नव्हतं. कारण मानवी मनातल्या अहिंसक श्रद्धांना, भावनांना त्यांच्या मनात आणि जीवनातही स्थान होतं. सश्रध्द आणि सुजाण लोकांच्या मनातील उत्कट श्रद्धा यांच्यामुळेच आज आपण आपली मंदिरे, मूर्ती, लेण्या आणि शिल्पकलेचा वारसा टिकवून ठेवू शकलो आहोत, असं त्यांनी मला व अभिनंदनला समजावून सांगितलं. ते म्हणले,
“देवीच्या दर्शनाला गेल्याने आपल्याला भौतिक संपदेचा लाभ होतो किंवा आपल्याला मोक्ष मिळतो हे कोणाही सुजाण माणसाला पटणारच नाही, पण रूढ धर्मातील काही चालीरीती या काही आर्थिक लाभ अथवा व्यक्तिगत मोक्ष मिळवण्यासाठी असतात असे नाही. धर्म ही एक संपूर्ण जीवनाचा सर्वांगीण विचार करणारी पायाभूत संकल्पना आहे. सामाजिक स्थिरतेसाठी परंपरेनुसार चालत आलेले काही रीतीरिवाज रूढी आपण पाळत असतो. त्यामुळे जर व्यक्ती आणि समाज यामधले हितसंबंध सलोख्याचे होत असतील, काहीवेळा मनाला विरंगुळा लाभत असेल तर त्यांचे पालन करण्यात काय गैर आहे? अहिंसक रूढी परंपरांच्या आचरणाने का कुठे धर्म भ्रष्ट होतो?”
खरेतर या साऱ्या गोष्टी मीच अभिनंदनला समजावून सांगायला नको होत्याका? पण त्यावेळी पतीप्रेमाने की त्याच्याविषयीच्या बाहय आकर्षणामुळे मी माझी विवेकबुद्धी कोठे गहाण ठेवली कोण जाणे? त्याशिवाय का माझ्या आईच्या सहजसुंदर भावना मी दुखावल्या?
लग्नानंतर काही दिवस माझ्या शरीरावर आणि मनावर एक धुंदीच चढली होती; आणि तसे घडणे मला स्वाभाविकच वाटत होते. पण त्या धुंदीने माझ्यात झालेला तो बदल भरतीच्या पाण्यासारखा तात्कालिकच होता. कारण कालांतराने जेव्हा भरती ओसरू लागली तेव्हा किनाऱ्याजवळचे ओबडधोबड खडक, त्यांची विरूपता, उंचसखलपणा माझ्या नजरेत टोचू लागला.
माझ्या नवऱ्यामधले, सासू-सासरे यांच्यामधले दोष मला अगदी त्या खडकांप्रमाणेच नजरेत भरू लागले. इतके दिवस मला त्यांच्या ज्या गुणांचं कौतुक वाटे तेही मला अवगुण वाटू लागले.
सकाळी सकाळी देवघरात चालणारी पंचामृत पूजा, सासूबाईचं सोवळं, सहाणेवर चंदन उगाळणारे, गळ्यात जानवं घालणारे माझे सासरे या सर्वांचं सुरुवातीला मला किती कौतुक वाटे. पण अलीकडे सोवळं नेसून पूजेसाठी आडाचे पाणी काढताना माझे हात भरून यायचे आणि मग उगीचच चिडचिड व्हायची. सकाळच्या कामाच्या घाईगडबडीत अभिनंदनने टॉवेल किंवा रुमाल मागितला तर माझ्या जीवाचा अगदी संताप होई. वाटे, स्वत:ची साधी साधी कामेही याला करता येत नाहीका? पण खरेतर यात चूक माझीच नव्हतीका? नवेपणाच्या लाडाकोडात मीच त्याला परावलंबी बनवले नव्हतेका?
लीलाक्काच्या आश्रमातल्या काही मुली बायकांचा जन्म फार वाईट असं म्हणायच्या तेव्हा मी त्यांना हसत असे. पण अलीकडे घरातल्या कर्त्या पुरुषांची जेवणे झाल्यावर उष्टीखरकटी काढून जेव्हा आम्ही बायका जेवायला बसायचो तेव्हा मला हटकून त्या मुलींची आठवण होई. एवढ्या मोठ्या घराची झाडलोट, धुणीभांडी करताना माझ्या मोठ्या जाऊबाई शीलावहिनी थकून जायच्या. मग हळूहळू त्यांना कामात मदत करणं मलाही भाग पडू लागलं.
या सर्व कंटाळवाण्या कामात दिवस कधी संपत असे ते कळतही नसे. सुरुवातीच्या दिवसात अभिनंदन घरी लवकर यायचा. आम्ही कुठे कुठे फिरायला जायची, कधी कधी सिनेमालाही जायचो. पण अलीकडे त्याला घरी यायला रोजच उशीर होऊ लागला. वर्कशॉपमधल्या कामाच्या ऑर्डर्स वाढल्या होत्या. एके दिवशी रात्री मी त्याला म्हणाले,
“वर्कशॉपमधले काम जर वाढले असेल तर उद्यापासून मीही येत जाईन तुझ्याबरोबर!”
“तू काय करणार तिथे येऊन? तुला काय कळतय त्यातलं?” तो कुत्सितपणे हसून म्हणाला.
“का? सरावाने कळेल हळूहळू! तुला काय सर्व गोष्टी उपजतच कळत होत्या की काय?” मी म्हणाले.
“मग घरातली कामे कोण करणार? एकट्या वहिनीवर सगळी कामे पडतील त्याचे काय?” तो म्हणाला. त्याचे हे असले बोलणे ऐकून मला राग आला. मी संतापाने म्हणाले,
“म्हणजे? माझ्याशी लग्न एवढ्यासाठीच केलंस तू? केवळ घरकामात तुझ्या शीलावहिनीला मदत व्हावी म्हणून? मीसुद्धा तुझ्यासारखीच इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. तुझ्या कामात तुला माझी मदतच होईल. शिवाय घरातल्या नीरस कामात अलीकडे माझं मन नाही लागत.”
“छान! घरातली कामे बायकांना नीरस वाटायला लागली तर मग ती कामे काय पुरुषांनी करायची?”
“का? कामाला एखादी बाई नाहीका ठेवता येत? घरातल्या बायकांना थोडी विश्रांती तरी मिळेल.” माझ्या या बोलण्यावर तो म्हणाला,
“हे बघ विवा, घरकामाला बाई ठेवणं आईला पटणार नाही. शिवाय वर्कशॉपचे काम सध्या मी एकटा व्यवस्थित सांभाळू शकतो. पुढेमागे बघू! लागलीच गरज तर दुपारी दोनेक तास येत जा तू.” त्याचं हे असलं बोलणं ऐकून माझं डोकच भडकलं. मी संतापून म्हणाले,
“वा! चांगले विचार आहेत तुझे! एक-दोन वर्षात घरकामाने माझी बुद्धी गंजून गेली तर काय फरक राहिला माझ्यात आणि एखाद्या अशिक्षित बाईत?
“तुझ्या शिक्षणाचा अन तुझ्या पदवीचा तुला एवढा अहंकार असण्याचं काहीच कारण नाही. शीलावहिनीसुद्धा एम ए झाली आहेचना? श्रीपालदादा बरोबर तिलाही कॉलेजात सहज नोकरी मिळाली असती. पण तिने नाही धरला तुझ्यासारखा हट्ट!”
लग्नापूर्वी स्त्रीशिक्षण, स्त्रीमुक्ती, स्त्रियांची व्यवसायकुशलता यावर तावातावाने आपली मते मांडणारा हाचका तो अभिनंदन, असा मला क्षणभर प्रश्न पडला. तरीही मी न चिडता म्हणाले,
“हे बघ अभिनंदन, मी एवढं व्यावसायिक शिक्षण घेतलं ते काही फक्त नावापुढे पदवी मिरवण्यासाठी नाही. मी उद्यापासून वर्कशॉपमध्ये येणार म्हणजे येणार!” पण त्याची आणि घरातल्यांची नाराजी पत्करून वर्कशॉपमध्ये जाण्याचं धाडस मला झालं नाही. पण घरातली कंटाळवाणी कामं ज्याची मला लहानपणापासून सवयच नव्हती ती करताना मला रडू कोसळे. माझ्या वर्गातल्या काही मुली पुण्यामुंबईसारख्या शहरात नोकरी करायच्या. कधीकधी त्या भेटायच्या. त्यांचं विश्व माझ्या विश्वापेक्षा किती वेगळं होतं? करियर, नोकरी यात पुढे गेलेल्या त्या मुलींचं ते जीवन पाहिलं की माझं मन आक्रंदे. हृदय आतल्याआत रडत राही. त्यामुळे माझं मानसिक संतुलन वारंवार बिघडू लागलं. त्याचा परिणाम माझ्या प्रकृतीवर होऊ लागला. घरातल्या इतर लोकांवरही माझा राग निघू लागला. नवेपणाची नव्हाळी ओसरू लागली आणि माझं भविष्य मला अगदी काळंकुट्ट वाटू लागलं.
रोजच अभिनंदनशी माझे खटके उडू लागले. त्यानंतरच्या दोन-तीन महिन्यात आमच्यामधल्या मतभेदाने आणि एकमेकावरच्या आरोप-प्रत्यारोपाने कळस गाठला. आमच्यामधल्या उरल्यासुरल्या प्रेमाची ती धुंदी ओहोटीला लागली; आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. मनाच्या एका अशाच संतप्त आणि उध्वस्त स्थितीत मी एका रात्री नेसत्या वस्त्रानिशी सासर सोडून माहेरी आले.
माझ्या त्या अकस्मात आणि अवेळी येण्याने घरात एकाच गोंधळ उडाला. आमच्या दोघांचं वैवाहिक जीवन लग्नानंतर काही महिन्याच्या आतच असं संपुष्टात आलं. एकुलत्या एका मुलीच्या आयुष्याचा असं मातेरं झालेलं बघून आईने अंथरूण धरलं. बाबांनी तर मला सासरी पाठवण्यासाठी किती किती प्रयत्न केले. हरप्रकारे माझं मन वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
लीलाक्कानेसुद्धा किती समजावले मला! पण मी तिलाही सांगून टाकलं,
“मी आता परत त्या घरात जाणार नाही. नोकरी करून करियर करण्यातही आता मला कुठलंही स्वारस्य उरलं नाही. हवंतर मी तुझ्या श्राविकाश्रमात मदतनीस म्हणून काम पाहीन आणि तुझ्यानंतर तुझा श्राविकाश्रमही चालवेन.” माझ्या या बालिश बोलण्यावर त्या स्थितीतही लीलाक्का हसली. म्हणाली,
“विवा, लाडात वाढलेल्या तुला प्रेमविवाह करून तो निभावता आला नाही म्हणून मी तुला अगदीच अपरिपक्व समजत नाही, पण एक सांगते,
“श्राविकाश्रमासारखी संस्था चालवायला माझ्यासारख्या बोरी-बाभळीच योग्य असतात. तुझ्यासारखी सतत निगराणी लागणारी केळ त्यासाठी नाही चालायची. अजूनही अहंकार थोडा बाजूला ठेव. झालं गेलं विसरून परत संसाराला लाग. पुढे आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू.”
पण मी कोणाचेच ऐकले नाही. माझ्या हट्टी स्वभावापुढे सर्वांनीच हात टेकले. त्या हट्टी स्वभावापायीच मी सर्वांचा विरोध पत्करून घटस्फोटाची नोटीस अभिनंदनकडे पाठवली. त्यादिवशी मला काय वाटलं? आनंद, दु:ख, नैराश्य की आणखी काही वेगळं? समुद्राच्या पाण्यात हेलकावे खाणाऱ्या नावेसारखी स्थिती झाली माझी! पण माझ्या भोवताली असणारी माझी माणसे त्या नावेला स्थिर करण्यासाठी किती प्रयत्न करीत होती, धडपडत होती.
या प्रेमाच्या माणसांबरोबरच माझ्या मनाला स्थिरता येण्यासाठी आणखी कोणीतरी हळूवारपणे धडपडत होते. माझ्या भोवतालचा निसर्ग! इथली पंचमहाभूते, ती नव्हतीका धडपडत माझ्यासाठी? कारण माझा जीवही या विश्वचक्राचा एक छोटासा भाग नव्हताका? आणि म्हणूनच माझं विसकटलेलं मन हळूहळू शांत होऊ लागलं. चिंतनात रमू लागलं.
कधी मनाच्या निवांतक्षणी मला वाटे, शैशवात मुग्धपणे, निरागसपणे पाकळीपाकळीतून उमलणारं आपलं मन तारुण्याचा स्पर्श होताच कसं चारी अंगांनी फुलून येतं. वाहत्या वाऱ्याबरोबर सुगंधाची उधळण करतं. पण एखादं मन कसं संयमी असतं. उमलतानाही किती संयमाने उमलतं. म्हणूनच त्याचं उमलणं त्याच्या जीवनात आनंद निर्माण करतं, अगदी फुलाच्या उमलण्यासारखं! पण माझ्यासारख्या एखादीचं चंचल मन जे पुढचा मागचा विचारच करत नाही, वाऱ्याबरोबर सैरावैरा उडत राहतं, वाहत्या पाण्याबरोबर वाहवत जातं, अश्या मनाला स्थिर करण्यासाठीच जीवनाच्या वसंतातही अशी शिशिरातली पानगळ त्यांना अनुभवावी लागत असेलका? आणि मग अशा प्रसंगानंतरच मन भौतिकतेपासून हळूहळू दूर होऊन अंतर्मुख होत असेलका?
आत्म्याला कधीकाळी झालेलं कर्मबंध कर्मनिर्जरेनेच नाहीसा होतो. आगमातली सहज कधीकाळी वाचलेली वाक्ये अलीकडे मला अचानकच आठवायची. मग पूर्वी कथा कादंबऱ्या वाचण्यात रमणारे माझे मन उमास्वामींचे तत्वार्थसूत्र आणि कुन्द्कुन्दांचा समयसार वाचण्यातही तितकंच रमून जाई. पण म्हणून काही पंचविशीच्या आतच मला काय वैराग्य आलं होतं? छे! छे! अशी पुस्तकं वाचून का कधी कोणाला वैराग्य येतं? पण माझ्या जीवनात घडलेल्या या प्रसंगाने आत्मपरीक्षणाची केवढी मोठी संधी मिळाली होती मला! तटस्थपणे स्वत:मधले गुणदोष पाहण्याचा मला त्याकाळात छंदच जडला होता. कधीकधी मग मला वाटे, घाईघाईने घटस्फोटाची नोटीस पाठवून मी काही चूकतर केली नाहीना? पण खरे तर या घटनेला माझ्याइतकाच तोही जबाबदार नव्हताका?
खरेतर त्याची आठवण आली नाही असा एक तरी दिवस गेला होताका? रात्रीच्या वेळी खिडकीतून दिसणारा रुपेरी चंद्र, बागेत उमललेल्या रातराणीचा गंध घेऊन येणारा अवखळ वारा, त्याच्या आठवणींनी मला व्याकूळ करी. आयुष्यातले काही सुखाचे क्षण मी त्याच्या सहवासात घालवले होते. त्या सुखद स्मृतींची मनोज्ञ प्रतिबिंबे माझ्या हृदय सरोवरात उमटत. मग मला वाटे, यापूर्वी अशी मनोज्ञ प्रतिबिंबे मला कधीच का दिसली नाहीत? कारण…कारण माझ्या हृदय सरोवरातलं पाणी इतकं शुभ्र नव्हतंच कधी! किती गढूळलेलं होतं ते! आणि गढूळलेल्या पाण्यात पडलेली प्रतिबिंबे का कधी सुंदर असतात?
आठवणीत रमून जाण्याचे ते क्षण किती सुखद असायचे. अशाच काही क्षणी मी ठरवायचे, पुरे झाली आता ही मनाची तडफड; सरळ उठावं आणि जाऊन सांगावं त्याला, की मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय! पण दुसऱ्याच क्षणी मला वाटे, तो तर सुखात जगतोच आहेना माझ्याशिवाय? मग मी का नाही जगू शकणार? एवढ्या दिवसात एखादा फोनही नाही करावा वाटला त्याला? अहंकाराने माणसाच्या मनात किती खोलवर पसरवलेली असतात आपली पाळेमुळे? अशी सहजासहजी का ती उखडून टाकता येतात? पण….
त्यादिवशीची ती घटना! त्या प्रसंगाने माझा सारा स्वाभिमान, अहंकार किती आकस्मिकरित्या गळून पडला. अभिनंदनला तो दुर्दैवी अपघात झाल्याची बातमी कुणीतरी मला फोनवरून सांगितली. त्यासरशी माझा सारा अहंकार कसा कापरासारखा उडून गेला. आईला घेऊन मी धावतपळतच हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं होतं. त्याचे दोन्ही पाय ट्रकच्या चाकाखाली पूर्णपणे चेंगरले होते. दोन्ही पायावर जवळजवळ तीन तास शस्त्रक्रिया चालली होती. त्यानंतर जवळजवळ तासाभराने तो शुद्धीवर आला. तोपर्यंत मी त्याच्याजवळ बसून होते. शुद्धीवर आल्यानंतर इतका वेळ न जाणवणाऱ्या वेदना तीव्रतेने जाणवून त्याचा चेहरा कसा काळवंडून गेला. पण जेव्हा त्याने माझ्याकडे पहिले, तेव्हा त्याही स्थितीत त्याचे डोळे कसे आनंदाने चमकले.
अभिनंदनच्या उजव्या पायावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण…डावा पाय? डावा पाय बरा होणं खूप कठीण होतं. मुंबईच्या नामांकित डॉक्टरांना बोलावून त्यावर परत शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पण त्यासाठी जवळजवळ चार-पाच लाख रुपये तरी खर्च येणार होता, आणि इतकं करूनही जर शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही तर पाय गुडघ्याखाली कापावा लागणार होता. अभिनंदनला हे सर्व कळलंच होतं.
त्यादिवशी मी बाबांबरोबर हॉस्पिटलमध्ये गेले होते, तेव्हा आप्पा आणि श्रीपालदादा हलक्या आवाजात काहीतरी बोलत होते. आम्ही दोघं आत जाताच त्यांचं बोलणं थांबलं. थोडा वेळ कोणीच काही बोलेना. त्या शांततेने माझा जीव गुदमरायला लागला. म्हणून मीच म्हणाले,
“आप्पा ऑपरेशन कधी करायचं ठरवलंय? डॉक्टरांशी काही बोलणं झालं का?”
“ऑपरेशन करायचंच नाही असं ठरवलंय आम्ही! आप्पांच्या या उत्तराने मी शहारले. म्हणाले,
“म्हणजे? म्हणजे? पाय..पाय कापावा…” बोलता बोलता मी अडखळले. पुढे शब्दच फुटेना. तेव्हा श्रीपालदादा म्हणाले,
“सध्या चार-पाच लाख रुपये खर्च करून रिस्क घेण्यासारखी परिस्थिती नाही आमची! शिवाय डोक्यावर वर्कशॉपसाठी काढलेलं दहा-बारा लाखांचं कर्ज आहे. वर्कशॉप विकून सारं कर्ज फेडायचं ठरवलंय आम्ही!”
त्यासरशी अभिनंदनने मान दुसरीकडे वळवली आणि तो म्हणाला,
“पाय कापावा लागला तरी चालेल पण ….आता एवढे पैसे खर्च करूनही जर तो नीट झाला नाही तर ते सहन करायची तयारी नाही माझी.” त्या सर्वांचे ते बोलणे ऐकून माझे डोळे अश्रूंनी भरून आले. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले,
“असा टोकाचा निर्णय का घेत आहात तुम्ही? शस्त्रक्रिया यशस्वी होणारच नाही असं का वाटत तुम्हाला?” त्यावर आप्पा म्हणाले,
“अहो, माणसाच्या आयुष्यात ज्या बऱ्या-वाईट घटना घडतात ते त्याच्या कर्मांचे फळ असते. अभिनंदनच्या आयुष्यात जर पांगळेपणा ठरलेलाच असेल तर तो आपण नाही बदलू शकत.” त्यावर बाबा म्हणाले,
“पांगळेपणा त्याच्या आयुष्यात असेल किंवा नसेलही! पण म्हणून काय आपण जे होईल ते फक्त बघत बसायचं? अहो पुरुषार्थ करून सिद्धपद मिळवणाऱ्या तीर्थंकरांचे वारसदार आहोत आपण! वैद्यकीय तंत्रज्ञान आज केवढं प्रगत झालंय? कर्मवादाच्या विपर्यस्त कल्पना उराशी बाळगून जर त्याचा उपयोग नाही करून घेतला तर तो आपला करंटेपणाच ठरेल.”
” जे व्हायचं ते होणारच म्हणून फक्त बसून राहणं यालाका धर्म म्हणतात? यालाका ममत्वाचा लोप म्हणतात? ही तर शुद्ध फसवणूक आहे. स्वत:च्या भावनांशी केलेली शुद्ध फसवणूक! अभिनंदनचे ऑपरेशन व्हायलाच हवे. हवे तर सगळा खर्च मी करेन!” बाबांनी शेवटचे वाक्य उच्चारले तसे आप्पा उठून उभे राहिले आणि म्हणाले,
“का? तुमच्या मुलीच्या सुखासाठीच करता आहातना तुम्ही हे सारं? पण आम्ही तुमच्या मुलीलाही बंधनातून मुक्त करायचं ठरवलंय! सारं काही सुरळीत असतानाही जिथे त्या दोघांच पटलं नाही तेव्हा या अशा स्थितीत तुमच्या मुलीचं आमच्या घरात जमेलसं वाटत नाही मला!” त्यांचे ते बोलणे ऐकून मी कानावर हात ठेवले आणि अभिनंदनकडे पाहिलं. त्याक्षणी त्याने आपली मान फिरवली आणि उशीखाली असलेली घटस्फोटाची नोटीस माझ्या हातात दिली व तो म्हणाला,
“मी सही केली आहे त्यावर. नियतीच्याच मनात आपण एकत्र यावं असं दिसत नाही.” त्यावर मी म्हणाले,
“या कागदावर सही करून आपल्या दोघांचे मार्ग कदाचित वेगळे होतीलही! पण माझ्या मनातल्या तुझ्याविषयीच्या भावना; त्या अशा सहजासहजी पुसता येतीलका?”
बोलता बोलता मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्याप्रमाणेच त्याच्याही डोळ्यात आसवे दाटून आली होती. त्याक्षणी तो मला किती निरागस वाटला. पहिल्या भेटीतच माझ्यावर मोहिनी घालणारे त्याचे ते चमकदार तेजस्वी डोळे किती शांत अन निष्पाप वाटले मला. प्लास्टरमध्ये बांधलेले त्याचे दोन्ही पाय, त्या पायांच्या बोटांवरून मी अलगद माझ्या हातांची बोटे फिरवली. तेव्हा त्याक्षणी तरी सृष्टीतील सारी वत्सलता माझ्या हृदयात दाटून आल्यासारखी वाटली मला! मातृत्वाच्या अनुभवातून मी अजून गेले नव्हते पण त्याक्षणी तरी मला असा वाटून गेलं की त्याचं डोकं आपल्या मांडीवर घ्यावं. तान्ह्या बाळासारखं त्याला थोपटावं. किती मृदू मोहक स्वप्न होते ते!
“विवा, चला जाऊयात आपण!” बाबांच्या या वाक्याने मी भानावर आले. त्या मोहक स्वप्नातून जागी झाले. माझ्या समोरचं वास्तव त्या स्वप्नापेक्षा किती वेगळं होतं.
पण…कठोर निश्चयाने आपण आपलं स्वप्न का नाही वास्तवात आणू शकणार? मनातल्या प्रश्नाने उंच उसळी घेतली आणि माझ्या मनातला निश्चय माझ्या गात्रागात्रातून एकवटू लागला आणि त्याचक्षणी सर्व बळ एकवटून मी माझ्या हातातल्या त्या कागदाचे तुकडे तुकडे केले. वाऱ्याच्या झुळकीने ते सैरावैरा उडू लागले.
बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे जणू मला सांगत होते, ‘अगदी माझ्या मनासारखं केलंस. हीच अपेक्षा होती माझी तुझ्याकडून!’ मग मी आप्पांकडे वळून म्हणाले,
“आप्पा अभिनंदनचं वर्कशॉप मी सांभाळेन. त्याच्या पायाचं ऑपरेशन यशस्वी होईल याची खात्री आहे मला. पण जर तुम्हाला तसं वाटत नसेल, दुर्दैवाने त्याला पांगळेपण येणारच असेल तरीही मी त्याच्यावर अगदी मनापासून प्रेमच करीत राहीन.””आप्पा, तुमच्या धर्मशास्त्रानुसार स्त्री ही मुक्तीच्या मार्गातली धोंड असेल, तिला मोक्षाचा आनंद मिळवता येणारही नसेल, पण वात्सल्याच्या स्पर्शाने तिला मिळणारा अनामिक आनंद! हा आनंद पृथ्वीतलावरच्या कोणत्याही आनंदापेक्षा जास्त मोलाचा आहे. जेव्हा असा आनंद स्त्रीला मिळतो तेव्हा कविकल्पनेतल्या असो किंवा धर्मशास्त्रातल्या असो त्या रमणीय स्वर्गाचा मोह; अथवा वेदनादायक नरकाची भीती तिला मुळी उरतच नाही. कारण…जगत असलेल्या जीवनालाही स्वर्ग बनवण्याचं सामर्थ्य तिच्या प्रेमात असतं.” बोलता बोलता मी थांबले. बाबा, आप्पा, श्रीपालदादा या साऱ्यांचीच दृष्टी माझ्यावर खिळली होती…आणि… अभिनंदन!
त्याच्या नजरेतल्या क्षमेचं, मार्दवाचं, आणि आर्जवाचं ते रुपेरी चांदणं, माझ्या तना-मनावर जणू सहस्त्रधारांनी बरसत होतं. त्या आनंदाच्या धारात भिजून माझं मन चिंब चिंब झालं होतं. तेव्हा त्याक्षणी तरी मला झालेला तो आनंद मोक्षाच्या आनंदापेक्षा का वेगळं होता?