This is a story of small boy who lost his mother. One day he forgets this truth due to his day to day routine activities. After that the things which happen are described in this story.
चिमणीचं घरटं लेखिका- सुनेत्रा नकाते
पूर्वप्रसिद्धी- साक्षात, नियतकालिक एप्रिल मे जून २००३
कथासंग्रह-कथानुयोग, सुमेरू प्रकाशन, डोंबिवली,
संपादन-डॉ. संतोष मुळावकर
पावसाची रिमझिमती सर हलकेच बरसून गेली. वातावरणात सुखद गारवा पसरला. इतका वेळ झाडांच्या फांद्यांवर,कौलांच्या वळचणीला अंग चोरून बसलेली पाखरंफांद्याफांद्यांवरून बागडू लागली. रस्त्यावर जागोजागी साठलेल्यापाण्यात उतरून चिमण्या चिवचिवाट करू लागल्या. कडूनिंबाच्या पाराजवळ नेमिनाथ उभा होता. आडोशाला उभे राहून पाऊस थांबायची तो वाटच पहात होता. शाळेतनिघायलाच त्याला उशीर झाला होता.
पाऊस थांबताच तो शाळेच्या वाटेला लागला. आजुबाजूची हिरवीगार शेतं काळ्याशार जमिनीवर उठून दिसत होती. डोळ्यांना सुखावणारा हिरवा गारवा अन आकाशाचं निळंसावळं कृष्णरूप वातावरणात भरून राहिलं होतं. रस्त्याकडेला हिरवळ पसरली होती. वाऱ्यावर डुलणारी गवतफुलं जणू हिरवळीवर स्वच्छंद पाने बागडत होती. पांढऱ्या फुलावर बसलेली पिवळीजर्द पाकोळी नेमिनाथने हळूच आपल्या बोटाच्या चिमटीत पकडली… आणि परत लगेच सोडून दिली. पाकोळी भिरभिरत लांबलांब जाईपर्यंत तो बघत राहिला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या त्याच्या शाळेची घंटा वाजली तेव्हा दप्तराची कापडी पिशवी त्याने काखोटीला मारली आणि शाळेच्या दिशेने पळत सुटला.
पहिला तास आवटे गुरुजींचा, म्हणजे धर्माचा! आता उशीर झाला म्हणून आवटेगुरुजी अंगठे धरून उभं करणार. अगदी पाठीला रग लागेपर्यंत. विचार करतच तो वर्गाच्या दारात येऊन ऊभा राहिला. गुरुजी तत्वार्थसूत्रातील मंगलाचरण म्हणत होते. मोक्ष मार्गस्य नेत्तारं, भेत्तारं कर्मभूभृताम ज्ञातारं विश्व तत्वानां, वंदे तद्गुण लब्धये. मुले त्यांच्या पाठीमागून म्हणत होती. नेमिनाथ दारातच उभा होता. तेवढ्यात गुरुजींचे त्याच्याकडे लक्ष गेले.
त्याच्याकडे नजर जाताच गुरुजींनी डोळ्यांनीच त्याला आत येण्यास खुणावले. दबक्या पावलांनी चालत तो पाठीमागच्या बाकावर जाऊन बसला. मंगलाचरण संपताच गुरुजींनी नेमिनाथकडे पाहिलं. त्याला वाटलं, आता गुरुजी आपल्याला अंगठे धरून उभं करणार.
पण तसं काहीच घडलं नाही. गुरुजी हळूहळू चालत त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, “नेमिनाथ मागची काही सूत्रे बुडाली तुझी. उद्या रविवारची सुट्टी आहे. सोमवारी सगळी सूत्रे पाठ करून ये.” असे म्हणून ते दुसऱ्या बाकावर बसलेल्या श्रीमंधरकडे गेले आणि म्हणाले, “हं श्रीमंधरशेठ, म्हणा बघू आता काल शिकवलेलं तिसऱ्या अध्यायातलं पहिलं सूत्र.” श्रीमंधर जमिनीकडे बघत अंगठा फरशीवर घासू लागला. गुरुजींनी मग त्याचा डावा कान जोरात पिरगाळला. तसा श्रीमंधर जोरात रडू लागला. मग गुरूजी म्हणाले, “हात लेकाच्या, लागलास का लगेच रडायला? सोमवारी सूत्र पाठ नसेल तर कान उपटून हातात देईन बरं!”
त्यानंतर मग चौगुल्यांचा अजित, सुतारांचा शिरपा, कुलकर्ण्यांचा अरुण अशा बऱ्याच जणांना छडीचा प्रसाद मिळाला. बाबू जाधवनं मात्र सूत्र अगदी खडानखडा म्हणून दाखवले. “रत्नशर्करा वालुका पड:क धूम तमो महातम: प्रभा भूमयो धनाम्बू वाताकाश प्रतिष्ठा सप्ताs धोs ध:” धर्मानंतर दुसरा तास मराठीचा होता. मराठीच्या काळेबाई अगदी रंगात येऊन शिकवायच्या. त्या कविता शिकवित होत्या. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा का बरं आलास आज स्वप्नात? तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दु:ख नाही उरलं आता मनात पानांचा हिरवा फुलांचा पांढरा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात.
कविता ऐकता ऐकता नेमिनाथला आपले कौलारू घर दिसू लागले. घरापुढचं शेणानं सारवलेलं हिरवगार अंगण आणि त्याशेजारी पांढऱ्या फुलांनी लगडलेलं हिरवगार चाफ्याचं झाड! हिरव्यागार साडीतली त्याची गोरीपान आई त्याला अगदी त्या चाफ्याच्या झाडासारखीच वाटू लागली. त्याला वाटलं, आत्ताच्याआत्ता पळत घरी जावं. काय बरं करत असेल आत्ता आई? गोठ्यातल्या जनावरांना पाणी पाजवत असेल की मागच्या अंगणात बसून शेंगा फोडत असेल? मराठीचा तास अगदी भुर्रकन संपला. त्यानंतर इतिहासाचा तास होता. सगरे गुरुजी १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम शिकवित होते. सरांचं अगदी भान हरपलं होतं. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाचं वर्णन करता करता गुरुजी जणू त्या काळातच गेले. ऐकता ऐकता नेमिनाथ खिडकीतून बाहेर बघू लागला. समोरच्या डोंगरावरून त्याला घोड्यावरून दौडत येणारी झाशीची राणीच दिसू लागली.
हातात लखलखती तलवार डोक्याला फेटा आणि पाठीशी बांधलेला तिचा पुत्र! नेमिनाथ कौतुकानं पहात होता. राणीचा घोडा अगदी जवळ जवळ येत होता… आणि राणीचा चेहरा अगदी थेट त्याच्या आईसारखाच दिसत होता. “अरे व्वा! मग राणीच्या पाठीशी बांधलेला तो पुत्र म्हणजे मीच नाहीका?” नेमिनाथ पुटपुटला अन हसू लागला. तेव्हा शेजारीच बसलेला शिरपा म्हणाला, “ए नेमा, कुणीकडे बघतोयस?आन हासतोस काय असा खुळ्यागत? गुरुजी बघतायतना! तेव्हा नेमिनाथने पुस्तकात तोंड खुपसले.
सगरे गुरुजी प्रेमळ पण कडक शिस्तीचे होते. आता नक्कीच छडीचा प्रसाद मिळणार म्हणून नेमिनाथ घाबरला. पण सगरे गुरुजींनी ना त्याला छडीचा प्रसाद दिला, ना ते त्याच्यावर रागावले. त्याच्याजवळ येऊन ते म्हणाले, “नेमिनाथ, धडा शिकवताना बाहेर बघत बसू नये. अशाने धडा कसा समजेल तुला?” इतिहासानंतर इंग्रजीचा तास अगदी बघता बघता संपला. दुपारची सुट्टी झाली. मुले वर्गातून बाहेर आली.
गुरुकुलाचा तो निसर्गरम्य परिसर, काळी हाफचड्डी आणि पांढरा सदरा घातलेल्या मुलांचे हसणे-खिदळणे यांनी भरून गेला. कुंभोजगिरीच्या कुशीत वसलेला तो बाहुबली ब्रम्ह्चर्याश्रम आणि गुरुकुलाचा निसर्गरम्य परिसर! गुरुदेव समंतभद्रांनी स्थापन केलेल्या या आश्रमात कितीतरी सामान्य घरातली मुले शिकून मोठी झालेली, विद्वान झालेली. कधी कधी आश्रमाचे माजी विद्यार्थी गुरुकुलाला भेट द्यायचे, तिथल्या छात्रांसमोर जुन्या आठवणी व अनुभव सांगताना हरवून जायचे. त्यांच्या काळात हे गुरुकुल म्हणे ऋषीमुनींच्या आश्रमासारखं होतं. डोंगराच्या उतारावर सुगंधी धुपाची झाडी होती. ऐकता ऐकता नेमीनाथचं हृदय त्या धुपाच्या सुगंधानं भरून जायचं, मन अगदी हरणांच्या कळपासारखं सुसाट धावायचं… पण मागे मागे…भूतकाळात.
त्याच्या डोळ्यापुढे त्या काळच्या आश्रमाचं ते कल्पनाचित्र उभं रहायचं. आज तो भूतकाळ हरवला होता. आज गुरुकुलाच्या मुख्य वास्तूशेजारी आणि आसपास अनेक नवनवीन वास्तू उभ्या होत्या. बाहुबलीची शुभ्रधवल मूर्ती पाहण्याकरिता येणाऱ्या यात्रेकरूंसाठी धर्मशाळा, गुरुदेव समंतभद्र नीलय, जैन धर्माचा सखोल अभ्यास व संशोधन करणाऱ्यांसाठी अनेकांत शोधपीठ, वगैरे वास्तू दिमाखात उभ्या होत्या. गुरुकुलात अजूनही पूर्वीप्रमाणेच मुक्त व प्रायोगिक शिक्षणप्रणाली राबवली जायची. अशा या आपल्या गुरुकुल शाळेचा नेमिला खूप खूप अभिमान वाटे.
त्याच गाव शाळेपासून एकदीड किलोमीटर अंतरावरच होतं. आजुबाजूच्या खेड्यातली बरीच मुले शाळेत पायीच यायची. लांबच्या गावातली मुले गुरुकुलातल्या वसतिगृहात रहायची. दुपारच्या सुट्टीत आश्रमातल्या झाडाखाली बसून मुलं घरून आणलेले जेवणाचे डबे खायची. नेमिनाथाने आज डबाच आणला नव्हता. झाडावर झरझर चढणाऱ्या आणि सरसर उतरणाऱ्या खारी पाहण्यात तो मश्गुल होता. तेवढ्यात सुतारांचा शिरपा त्याच्याजवळ आला. त्याच्या हातात दोन हिरवेगार पेरू होते. त्यातला एक पेरू त्याने नेमिनाथला दिला आणि म्हणाला, “नेमा आज डबा आणला न्हाईस न्हवं? मग हा घे पेरू. पोपटानं खाल्लाय बघ. गोडच आसल.” पेरू खाता खाता दोघे वर्गात आले, आणि घंटाही वाजली.
दुपारचा पहिला तास गणिताचा होता. गणिताचे देसाई गुरुजी भलतेच मारकुटे! ते वर्गात आले आणि मुलांचा गोंगाट क्षणात थांबला. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता पसरली. सरांनी आल्या आल्या डस्टर टेबलावर आपटले. त्यानंतर त्यांनी बाबू जाधवला फळा पुसायला सांगितले.. कारण बाबू वर्गात सर्वात उंच होता. बाबूने फळा पुसल्यावर सरांनी त्यावर काटकोन त्रिकोणाची आकृती काढली. काटकोन करणाऱ्या बाजूंवर आणि कर्णावर त्यांनी चौरस काढले. त्या चौरसात परत एकक मापाचे चौरस काढले. काळ्याभोर फळ्यावर काढलेले ते छोटे छोटे चौरस नेमिनाथला जणू काळ्याभोर मातीतल्या वाफ्यांसारखेच वाटले. त्याच्या परसदारातले मेथीचे वाफे.
नेमिनाथची आई परसबागेत असेच छोटे छोटे वाफे बनवायची. त्यात मेथीचं बियाणं पेरायची. त्यावर माती सारण्याचं, झारीने पाणी शिंपायचं काम नेमिनाथचं असायचं. नेमिनाथने आपल्या वहीत फळ्यावरची आकृती काढली आणि त्यातल्या छोट्या चौरसात काढले मेथीचे कोवळे कोंब. सर त्याच्या बाकाजवळ केव्हाचे येऊन थांबले होते. पण नेमिनाथचे तिकडे लक्षच नव्हते. “या चौरसात हे काय आहेरे?” सरांच्या या प्रश्नाने नेमिनाथ एकदम दचकला. म्हणाला, “मेथीची भाजी सर!”
त्यासरशी सगळा वर्ग हास्यस्फोटात बुडून गेला. नेमिनाथ अगदी कावराबावरा झाला. तेव्हा सर म्हणाले, “नेमिनाथ गेल्या दहाबारा दिवसात बुडालेला अभ्यास तुला आता भरून काढायला हवा. हवं तर रोज संध्याकाळी माझ्या घरी येत जा. मी समजाऊन सांगेन तुला.” तेवढ्यात तास संपल्याचा टोल वाजला. सर घाईघाईने निघून गेले. सरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नेमिनाथ अचंब्याने पहात राहिला. त्यानंतरचा तास भूगोलाचा होता. भूगोलाच्या बाई कोणालाच मारित नसत. त्यामुळे मुले थोडीशी सैलावली.
भूगोलानंतर चित्रकलेचा तास होता. सोनावणे सरांनी सायंकाळचे निसर्गचित्र काढले होते. डोंगरामधून खळाळत वाहणारा ओढा, काठावरचं साळीचं शेत, अस्ताला जाणारा सूर्य, ओढ्याचं सोनेरी भासणारं पाणी. नेमिनाथने अगदी मन लावून चित्र काढलं. चित्र रंगवायला त्याने रंगपेटीच आणली नव्हती. पुढच्या बाकावरच्या मारुतीने त्याला रंगपेटी दिली. मग नेमिनाथने त्या चित्रात सुरेख रंग भरले. चित्रात सायंकाळ अगदी प्रत्यक्ष अवतरली होती. सोनावणे सर म्हणाले, “व्वा! सुरेख! खूपच छान चित्र काढलस रे.” नेमिनाथ अगदी संकोचून गेला. आनंदानं त्याचं हृदय त्या ओढ्याच्या पाण्यासारखं भरून वाहू लागलं. शाळा सुटल्याची घंटा वाजली. सरांच्या पाठोपाठ मुलेही वर्गाबाहेर पडली. पाचच मिनिटात वर्ग रिकामा झाला.
गुरुकुलाच्या वसतिगृहात राहणारी मुले सोडून इतर सर्व मुले आपापल्या गावाच्या वाटेने निघाली. शिरपा, बाबू, श्रीमंधर, नेमिनाथ आणि मारुती एकाच गावचे गप्पा मारीत ते रमतगमत निघाले. आज शनिवार होता आणि उद्या शाळेला सुट्टी होती. शनिवारची संध्याकाळ नेमिनाथला नेहमीच खूप आवडायची. घरी गेल्यापासून ते झोपेपर्यंत नेमिनाथ आईभोवती घोटाळत राहायचा. तो त्याची आई आणि त्या दोघांचंच ते छोटसं कौलारू घर. होय! ते घर फक्त त्या दोघांचंच होतं.
दहा वर्षापूर्वी त्याचे बाप्पा त्या घरातून निघून गेले म्हणजे त्यांनी दीक्षा घेतली तेव्हापासून ते घर फक्त त्या दोघांचच होतं. त्यावेळी चातुर्मासासाठी गावात मुनीमहाराजांचा संघ आला होता. प्रत्येक धर्मवत्सल श्रावकाच्या घरात रोजच चौक्याची तयारी व्हायची. महाराजांना पडघावण्यासाठी घराघरातल्या गृहिणी दारात येऊन उभ्या राहायच्या. कुणाच्या डोक्यावर मंगलकलश असायचा तर कुणाच्या हातात अष्टद्रव्याने भरलेलं तबक असायचं. कुठे कुणी कुमारिका हातात कमळफुले घेऊन उभी असायची. ज्यांच्या घरात महाराज पटायचे, जिथे त्यांचा आहार कसलाही अंतराय न येता पार पडायचा ते लोक स्वत:ला धन्य समजायचे. चार महिने लोक हातातली कामे टाकून सकाळ संध्याकाळ महाराजांचे प्रवचन ऐकायला गोळा व्हायचे.
नेमिनाथचे बाप्पा या चार महिन्यात फक्त झोपायलाच घरी यायचे. दिवसभर महाराजांचं प्रवचन, त्यांचं वैयावृत्त, परगावाहून दर्शनासाठी येणाऱ्यांची व्यवस्था या साऱ्यात ते आपले घरदार, शेतीवाडी, बायको, मुलगा हे सारं सारं विसरूनच गेले होते.या चार महिन्यात घरातल्या कामाबरोबरच शेतातली कामेही गड्यांच्या मदतीने आईच करायची. गोठ्यातल्या गाई म्हशीचं वैरणपाणी, धार काढणं, वगैरे कामेही तिच्यावरच पडली होती. पण त्या चार महिन्यात तिने त्याबद्दल कसलीही कुरकुर केली नाही. तिला वाटे, चातुर्मास संपवून संघ निघून गेलाकी नवरा आपसूक परत माणसात येईल. या चार महिन्यात काय पुण्य मिळवायचं ते मिळवून घेऊ दे त्याला.
पण चातुर्मास संपला आणि घडलं ते वेगळंच. नेमिनाथचे बाप्पा परत घरी आलेच नाहीत. महाराजांच्या संघाबरोबर ते निघून गेले. नेमिनाथची आई त्या काळात खूप उदास असायची. त्यानंतर सहा महिन्यातच त्यांनी मुनिदीक्षा घेतल्याची बातमी गावात आली आणि मग मात्र नेमिनाथच्या आईने कंबर कसली. घराशेजारच्या खोपटात माहेरच्या गावाकडचा एक गडी आणि त्याच्या बायकोला आणून ठेवले. त्यांच्या मदतीने ती स्वत:पण शेतात राबू लागली. तशी ती एस.एस.सी पर्यंत शिकलेली होती. शेताचे, धान्याच्या खरेदीविक्रीचे व्यवहार ती कुशलतेने हाताळू लागली.
शेतीची कामं, बाहेरची कामं, घरातली कामं अशा अखंड कामात बुडालेली त्याची आई शनिवारची संध्याकाळ मात्र आपल्या नेमिनाथसाठी राखून ठेवायची. संध्याकाळच्या व्याळूसाठी ती त्याच्या आवडीचा मेनू करायची. शेवयाची खीर, मुगाची खिचडी, वांग्याचं भरीत आणि ताज्या लोण्याचा गोळा घातलेली गरमागरम भाकरी! चुलीवरची शेवटची भाकरी आई आपल्या ताटात वाढून घेई आणि मग हसतखेळत दोघांचं जेवण चाले. जेवता जेवता नेमिनाथ तिला शाळेतल्या गमतीजमती सांगे.
घरी जाता जाता नेमिनाथ एक एक गोष्ट ठरवू लागला. त्याने ठरवलं, गेल्या गेल्या आईला चित्रकलेच्या वहीतले आज काढलेले चित्र दाखवायचे. त्याला वाटलं, आपण घरी जाऊ तेव्हा आई काय बरं करत असेल? पितळी चरवीवर पांढरंशुभ्र फडकं घालून धारेला चालली असेल की धार काढायला बसलीही असेल. आदाप्पा रेडकाचं दावं धरून उभा असेल. आपण जेव्हा गोठ्याच्या दारात जाऊ तेव्हा आई तोंडावर बोट ठेवून आपल्याला आवाज न करण्याबद्दल खुणावेल. धार काढून झालीकी रेडकू म्हशीकडे धाव घेईल. आई चरवीतल धारोष्ण दूध लोट्क्यात ओतेल.
मग त्या फेसाळत्या धारोष्ण दुधाचा लोटा मी एका दमात फस्त करेन. मग माझ्या ओठांवरच्या पांढऱ्या पांढऱ्या मिशा बघून आई म्हणेल, “ए म्हाताऱ्या चल आता जेवायला.”
“अरे नेमा, ते बघ ते चिमणीचं घरटं!” शिरपाच्या या उद्गारांनी नेमिनाथ तंद्रीतून जागा झाला. चालता चालता सगळेजणच थांबले. रस्त्याकडेला झाडावरून चिमणीचं घरटं खाली पडलं होतं, का कोणी मुद्दामच पाडलं होतं कोण जाणे! घरट्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या झाडावर बसून चिमण्यांचा थवा अखंड चिवचिवत होता. नेमिनाथने पटकन पुढे जाऊन घरट्यातल्या पिल्लाला उचलले. बाहेरच्या उजेडाने पिलाने आपले डोळे मिटून घेतले.
तसा शिरपा एकदम ओरडला, “आरं नेमा का शिवलास त्या पिल्लाला? आता चिमण्या त्याला परत त्यांच्यात घेणार नाहीत. मारून टाकतील त्याला.” “का रे शिरपा, असं का असतरे?” नेमिनाथच्या या प्रश्नावर शिरपा ठामपणे म्हणाला, “ते मलाबी ठाव न्हाय, पण ते तसंच असतंय.” पण पिलाचे आईवडील नेतीलना त्याला.” शिरपाकडे आशेने बघत नेमिनाथ म्हणाला. “नाय, ते असते तर तवाच नेलं नसतका त्याला? सापानं गिळलं असल त्यानला.” शिरपाच्या तऱ्हेवाईक डोक्यातून नाना कल्पना बाहेर पडू लागल्या. तेव्हा नेमिनाथ म्हणाला. “मग मी नेतो या पिल्लाला घरी. घरटं मी टांगीन आमच्या चाफ्याच्या झाडाला. माझी आई घालेल याला दाणापाणी आणि सांभाळेल याला.”
“आता ह्याची आई सांभाळणार म्हणे या पिल्लाला!” आदगोंडा म्हणाला. तेव्हा शिरपा सोडून इतर सर्व मुले एकमेकांना खुणावून हसू लागली. तसा अंगापेराने दांडगा असलेला शिरपा आदगोंडाच्या अंगावर धाऊन जात म्हणाला, “आता गुमान जावाकी घरला. कशापायी दात काढताय?” त्यासरशी आदगोंडासकट तिघाचौघांनी आपापल्या घराच्या दिशेने धूम ठोकली.
आता शिरपा व नेमिनाथ एक शब्दही न बोलता निघाले होते. कडूनिंबाच्या पारापाशी येताच शिरपा म्हणाला, “नेमा मी जातोरे आता, तू नीट जा घरी.” असं म्हणून उजवीकडे वळलेल्या कच्च्या पायवाटेवरून तो झपाझप चालत दिसेनासा झाला. आता नेमिनाथ एकटाच चालला होता. आणखी थोडंसं पुढे गेलं की रस्त्याला दोन फाटे फुटत. डाव्या फाट्यापासून पुढे गेलं की नेमिनाथच्या शांतामावशीच घर लागे आणि उजव्या फाट्यापासून पुढे गेलं की नेमिनाथचा मळा आणि मळ्यातली विहीर लागायची. विहिरीपासून नेमिनाथच घर अगदी हाकेच्या अंतरावर होतं.
विहिरीजवळून घर अगदी स्पष्ट दिसायचं. स्वयंपाकघराच्या धुराड्यातून निघालेल्या धुराच्या रेषा त्याला तिथूनही दिसायच्या. गोठ्यात चाललेली जनावरांची खसफस, हंबरनं त्याच्या कानांना स्पष्ट जाणवायचं. मग अधीरपणे तो तेथूनच धूम पळत सुटायचा. हातातलं दप्तर आणि घरटं सांभाळत नेमिनाथ मळ्यातल्या विहिरीपाशी आला. मान उंचावून घराच्या दिशेने पाहू लागला. पण आज स्वयंपाकघराच्या धुराड्यातून वरवर जाणाऱ्या धुराच्या रेषा त्याला दिसतच नव्हत्या. कानांना गोठ्यातल्या जनावरांची कसलीच चाहूल जाणवत नव्हती. दप्तर आणि घरटं सावरीत नेमिनाथ घराच्या दिशेने पळतसुटला. पळता पळता अडखळला आणि घराच्या उंबऱ्याशी तोल जाऊन खाली पडला. दोन्ही गुडघ्यांना खरचटलं आणि त्यातून रक्त येऊ लागलं. त्याला वाटलं, आई आता गोठ्यातून बाहेर येईल आणि म्हणेल, “धडपडलासना नेमी? धांदरट आहेस बघ अगदी!”
पण तसं काहीच घडलं नाही. त्याची नजर वर गेली. घराचा दरवाजा बंद होता आणि त्यावर पितळी कुलूप ठोकलं होतं. नेमिनाथ धडपडत उठला. स्वयंपाक घराच्या अर्ध्याउघड्या खिडकीतून त्याने आत पाहिलं. चूल थंडगार होती आणि भिंतीवर फोटो होता… त्याच्या आईचा. तो फोटो पाहिला आणि नेमिनाथला ब्रम्हांड आठवलं. त्याचं डोकं गरगरू लागलं. त्याला ते सगळं सगळं आठवलं की जे तो सकाळपासून विसरूनच गेला होता.
पंधरा दिवसापूर्वीचा तो प्रसंग… त्यादिवशी अचानक आईला ताप भरला. जवळच राहणाऱ्या शांतामावशीने तिला काढाही करून दिला. पण त्या रात्री ताप खूपच वाढला. शांतामावशी जवळच बसून होती. सकाळच्या पहिल्याच एस्टीने आईला मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये नेले. पण डॉक्टर म्हणाले, “फार उशीर केलात. ताप मेंदूला चढलाय. पण तरीही आपण प्रयत्न करू.” पण डॉक्टरी प्रयत्नांना यश आले नाही आणि त्यानंतर नेमीने पाहिलं ते त्याच्या आईच कलेवर. ते सगळं त्याला आठवलं, अगदी लख्ख आठवलं आणि… नेमिनाथ मटकन खाली बसला. गुडघ्यात डोकं खुपसून तो हमसून हमसून रडू लागला.
रडता रडता त्याला सकाळपासूनच्या साऱ्या घटना एकामागून एक आठवू लागल्या. शांतामावशीच्या घरातून तो शाळेला जायला निघाला. रिमझिमणारा पाऊस, गवतफुलांवरच्या पाकोळ्या, झाडांवरच्या चिमण्या, खारी पाहून तो हळूवार झाला. ओल्याहिरव्या सृष्टीचा वत्सल स्पर्श त्याच्या तनामनावर हळूवारपणे फिरू लागला. आपल्या आईच्या मृत्यूचं कटू सत्यही तो विसरला. हळूहळू सकाळपासूनच्या साऱ्या घटना त्याच्या डोळ्यापुढे आल्या.
आवटे गुरुजींनी उशीर होऊनही आज आपल्याला शिक्षा का केली नाही? खिडकीबाहेर पहात असताना सगरेगुरुजी आपल्यावर का ओरडले नाहीत? दुपारच्या सुट्टीत शिरपाने आपल्याजवळचा पेरू का दिला? गणिताच्या सरांनी राहिलेला अभ्यास पूर्ण करायला आपल्याला घरी का बोलावले? आणि मघाशी ती सारी मुले आपापसात का हसत होती? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला वेडावून हसू लागली. त्या मुलांसारखीच!
नेमिनाथ रडत होता. हुंदक्यांचे आवाज त्या कातरवेळी वातावरणात भरून राहिले होते. नेमिनाथ बरोबर त्या घराचं अंगण, तो गोठा, ते चाफ्याचं झाड ही रडत होतं. हुंदके देत होतं. जवळच नेमिनाथचं दप्तर आणि ते घरटही पडलं होतं. त्या घरट्यातून ते चिमणीचं पिल्लूही आपले डोळे उघडून चिवचिवाट करत होतं. ते ऐकताच नेमिनाथचे हुंदके थांबले. तो उठला. शर्टाच्या बाहीने अश्रू पुसून त्याने त्या पिल्लाला आपल्या तळव्यांवर घेतलं. तेवढ्यात त्याला दिसलं, विहिरीच्या बाजूने धावतपळत शांतामावाशी येत होती. त्याला पाहताच ती पळतच त्याच्याजवळ आली. म्हणाली, “नेमि, आता इकडं रे कशासाठी आलास? केव्हापासून आम्ही वाट बघतोय तुझी. सकाळी जेवणाचा डबाही विसरून गेलास? भूक लागली असेलनारे?”
मावशीच्या या उद्गारांनी नेमीनाथचं रडू परत उसळलं. तिच्या पदरात डोकं खुपसून तो परत हमसाहमशी रडू लागला. तशी मावशीही रडू लागली. डोळे पुसत ती म्हणाली, “नेमि, आता इथलं सगळं विसरायचं. रोज शाळेत जायचं. खूप अभ्यास करायचा. शिकून मोठ्ठं व्हायचं. होशिलना?”
तेव्हा नेमिनाथ रडू आवरत म्हणाला, ” मावशी मी आता परत नाही रडणार… पण तू ह्या पिल्लाला मला घरी आणू देशील?” “हो, देईनकी, पण कुठून आणलस रे हे घरटं?” तिने विचारलं. त्यावर नेमिनाथ म्हणाला, “हे मला येताना वाटेत मिळालं. त्यात हे पिल्लूपण होतं. या पिल्लाच्या आई वडिलांना सापाने गिळल असेल, असं शिरपाच म्हणत होता. या पिल्लाला आता मलाच सांभाळायला हवं कारण मी त्याला शिवलो ना? म्हणून चिमण्या त्याला आता परत त्यांच्यात घेणार नाहीत… असं शिरपाच म्हणत होता.”
त्याबरोबर मावशी त्याला जवळ घेत म्हणाली, “वेडा आहेस बघ तू अगदी, आणि तो तुझा तो शिरपासुद्धा. अरे चिमण्यांना तर माणसं खूप आवडतात. माणसांजवळ राहायला त्यांना आवडतं. म्हणून तर त्या आपल्या घरात घरटी बांधतात. कळलंका?” “हो कळलं!म्हणजे हे पिल्लू माझ्याजवळ नीट राहील आणि मोठं झाल्यावर उडून जाईल.” नेमिनाथ म्हणाला. त्यावर मावशी म्हणाली, “तू सुद्धा खूप मोठा हो. या घरट्याच्या मोहात अडकून पडू नकोस. मोहाचे पाश माणसाच्या कर्तृत्वाला जखडून ठेवतात. आकाशात भरारी घे. सात समुद्रापार जा. खूप नाव कमव. हवं तर एक नवं घरटं बांध. पण एक लक्षात ठेव जर घरटं बांधलस तर त्यातल्या पिल्लांची काळजी घ्यायला विसरू नकोस. निदान त्यांच्या पंखात बळ येईपर्यंत तरी त्यांची काळजी घे. आणि हो…कधीमधी या तुझ्या आईच्या घरट्याकडे पण येत जा. मोह म्हणून नाही पण तुझ्या आईने याच घरट्यात तुझ्यावर संस्कार केले, प्रेम केलं, त्याची आठवण म्हणून. लक्षात ठेव, खरं प्रेम आपल्या पंखांना कधीच बांधून ठेवत नाही. उलट ते आपल्याला आणखी उंच उंच उडण्याचं बळ देतं. ”
शांता मावशीचं बोलणं नेमिनाथला किती समजलं किती उमजलं कोण जाणे, पण नेमिनाथ अगदी प्रसन्नपणे हसला. त्याने घरटे आणि दप्तर उचलले आणि तो शांतामावशीच्या मागून लांब लांब ढांगा टाकीत चालू लागला.