वीरबाला गुलमोहोर – VEER-BALA GULMOHOR


The story of Gulmohor i.e. Flame tree tells us  importance of preserving the green forests, animals and environment as a whole. Nowadays, people are destroying forests for building houses, offices and many other needs. In olden days too, animals were hunted and trees hacked for petty gains. This story tells us how the principle of Ahimsa principle saves the earth and living beings on this planet.

 वैशाखातलं प्रखर ऊन झळाळत होतं. उन्हाच्या झळांनी वनातली झाडं- झुडपं, वेली उसासे टाकीत होत्या. वनाच्या मध्यभागी खूप जुने वडाचे वयोवृद्ध झाड होते. उन्हाने त्रासलेली पाखरे झाडावर येऊन विसावली होती. वडाच्या झाडाशेजारीच गुलमोहराच झाड दिमाखात उभं होतं. वडाच्या झाडाने गुलमोहराच्या झाडाकडे पाहून मंद स्मित केले. फुलांनी डवरलेल गुलमोहराच झाड किती छान प्रसन्न हसलं. जणू भर दुपारी चांदणंच बरसलं.

 तेव्हा आपली पारंब्याची दाढी कुरवाळत वड म्हणाला, “भर उन्हाळ्यातही तुझं तेजानं लखलखणारं रूप पाहून खरतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तू मुळचा त्या आफ्रिकेतल्या झांजीबार बेटावरचा! तेथून मग तू मॉरिशस मार्गे भारतात आलास खरं ना? तेव्हा गुलमोहोर म्हणाला, “आजोबा, माझ्या फुलांची जन्मकथा खूपच मनोरंजक आहे. तुम्हाला सांगूनच टाकतो. पण तुम्हाला वेळ आहेका?” वडाच झाड म्हणालं, “अरे मला म्हाताऱ्याला आता कसलं आलंय काम? पण तुम्हाला सवड कुठे असते आमच्याशी बोलायला?” तेव्हा गुलमोहराने निवांतपणे आपल्या फांदया पसरवल्या आणि तो सांगू लागला…

 “खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. संपूर्ण पृथ्वीवर त्यावेळी एकच संस्कृती नांदत होती. पृथ्वीचं भोगभूमीतून कर्मभूमीत रुपांतर झालं होतं.

भोगभूमीत माणसाच्या साऱ्या गरजा कल्पवृक्षाच्या द्वारे पूर्ण व्हायच्या. कष्ट करून घाम गाळण्यातला आनंद काय असतो, याची माणसाला कल्पनाच नव्हती. जीवन निष्क्रिय होतं. पुरुषार्थ करून कोणी पराक्रमच गाजवत नव्हता. पण कर्मभूमीत कल्पवृक्षांची जागा साध्या वृक्षांनी घेतली. हळूहळू मानव या साऱ्या वृक्षांच्या आधारे आपल्या गरजा पूर्ण करायला शिकला. असि, मसि आणि कृषि यांच्या आधारे मानवाने कष्ट करून जीवन सार्थकी लावले. त्यानंतर काही वर्षे गेली .

 त्यावेळी एका बेटावर एक निसर्गवेडा राजा राहत होता. दाट वनांनी भरलेलं आणि पाण्यानं वेढलेलं ते बेट म्हणजे पृथ्वीवरच जणू नंदनवनच होतं. राजाचं आपल्या प्रजेवर खूप खूप प्रेम होतं. प्रजेप्रमाणेच राजा आपल्या बेटावरच्या झाडाझुडपांवर, तिथल्या आकाशावर, मातीवर, पाण्यावर, पशु पक्ष्यांवर खूप प्रेम करायचा.  पशुपक्ष्यांची शिकार करायची नाही, आणि झाडांवर निर्दयीपणे कोणी कुऱ्हाड चालवायची नाही, अशी त्याची सर्वांना ताकीद होती. तिथले प्रजाजन ही निसर्गातल्या प्रत्येक जीवाला आपले भाऊ बंदच मानायचे. त्यांच्या रक्षणासाठी प्रसंगी प्राणही अर्पण करायचे.

 राजाला गुल नावाची एक नाजुक सुंदर मुलगी होती. आरक्त वर्णाची ही गुल मनाने जशी हळवी तशी कणखर ही होती. मातीवरून ती प्रेमाने हात फिरवायची. पाण्यालाही हळुवारपणे थोपटायची. आईवेगळ्या गुलला सारी सृष्टी म्हणजे जणू तिची आईच वाटायची. कणखर मनाच्या गुलचं शरीर मात्र खूपच नाजुक होतं. अखेर ती एका राजाची लाडाकोडात वाढलेली लेक होती. उन्हाळ्यात उन्हाच्या गरम गरम झळांनी ती पार कोमेजून जायची. चार दासी चार वाळ्याचे पंखे घेऊन सतत तिला वारा घालायच्या.

 वसंत ऋतुच आगमन झालं तेव्हा त्या बेटावर वन महोत्सवाची तयारी सुरु झाली. प्रजा आणि सारी सृष्टीही आनंदित झाली. पक्षी मधुर स्वरात गाणी गाऊ लागले. कोवळ्या पानांचा आंबट गोड सुवास वातावरणात पसरला. फुले वाऱ्यावर झुलू लागली. तिथल्या प्रथेप्रमाणे उत्सवाच्या मुख्य दिवशी सारी प्रजा किनाऱ्यावर जायची. राजाही आपल्या गुलसमवेत तिथे जायचा. सर्वजण वायुची, जलाची, मातीची, आकाशाची, तेजाची मनोभावे पूजा करीत. कारण ही पंचमहाभुते त्यांना जगण्यास सहाय्य करीत. झाडांमध्ये राहणारे यक्ष आणि गंधर्वही त्यात सामील होत.

उत्सवाच्या दिवशी गुलने राजाबरोबर किनाऱ्यावर जायची तयारी केली. तिने केशरी रंगाचा चोळीघागरा परिधान केला. पिवळ्या रंगाची लाल पांढरे ठिपके असलेली ओढणी परिधान केली. डोक्यावर मुकुट घातला. तिच्या कमरेच्या म्यानात तलवार लटकत होती. स्वर्गातल्या परीप्रमाणे भासणारी गुल किनाऱ्यावर आली तेव्हा उन्हानं कोमेजून गेली होती. दासी तिला वाळ्याच्या पंख्याने वारा घालत होत्या. स्त्री पुरुषही नटून थटून आले होते. त्यांच्याही कमरेच्या म्यानात तलवारी लटकत होत्या. राजा व सर्वजण किनाऱ्यावर हात जोडून उभे राहिले. वाहणाऱ्या पाण्याला, आकाशाच्या निळाईला, त्यात तळपनाऱ्या सूर्याला, आधार देणाऱ्या धरित्रीला त्यांनी आपल्या हृदयाशी हात जोडून अभिवादन केले.

 सर्वजण डोळे मिटून शांत उभे होते. तेवढयात प्रचंड आवाज झाला. किनाऱ्यावरून घोंगावत वादळ आले. त्या भयंकर वादळाने झाडांच्या फांदयाही शहारल्या. पक्षी भयभीत झाले. फुलांनी झाडावरच माना टाकल्या. त्या वादळा पाठोपाठ एक प्रचंड लाकडी तराफा किनाऱ्यावर येऊन आदळला. त्यातून काळी कभिन्न राक्षसासारखी माणसे उतरली. त्यांच्या डोळ्यात जणू रक्त उतरलं होतं. हातात कुऱ्हाडी आणि भाले होते. त्या त्या माणसांनी शांतपणे उभ्या असलेल्या बेटावरच्या माणसांना वेढा घातला. त्यांच्या राजाला त्यांनी साखळदंडाने जखडले. त्यांच्या प्रमुखाने आपल्या लोकांना आज्ञा केली, “घुसा या जंगलात… आणि तोडून आणा झाडांवरची फळे, फुले, आणि फांद्या सुद्धा! शिकार करा इथल्या वाघ सिंहांची, हत्तींची, हरणांची आणि सशांची सुद्धा!”

 त्यासरशी प्रार्थना संपवलेल्या लोकांनी स्त्री- पुरुषांच्या म्यानातल्या तलवारी विजेसारख्या लखलखल्या. तलवारीच्या धारेसारख्या धारदार आवाजात गुल म्हणाली, “या भूमीवरील झाडांची पशु- पक्ष्यांची हत्या करण्या पूर्वी तुला माझ्याशी लढावं लागेल.”यावर तो प्रमुख जोरजोरात हसला. जणू ढगांचा गडगडाट झाला. “मूर्ख मुली, बाजूला हो नाहीतर मुंगीसारखी चिरडली जाशील,” तो म्हणाला.

 गुलने डोळे मिटले. सृष्टीतल्या साऱ्या चराचरातल्या चैतन्याला आणि हृदयातल्या चैतन्याला आवाहन केले… आणि सर्व शक्ती एकवटून तिने त्या प्रमुखाच्या हातावर वार केला. त्याच्या हातातली तलवार गळून पडली. तो पशुसारखा चवताळला. तलवार उचलून तो गुलच्या अंगावर धावला. गुलच्या हातातली तलवार विजेच्या वेगाने फिरत होती. तिचं अपूर्व धैर्य पाहून तो प्रमुख चिडला… त्याने त्वेषाने गुलच्या मानेवर वार केला. रक्ताचं कारंजं उसळल… आणि भूमीवर पडलेल्या गुलच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून तिच्या शेकडो प्रतिकृती तलवार घेऊन उभ्या राहिल्या .

 त्या सगळ्या जणींनी त्या प्रमुखाला आणि त्याच्या सर्व माणसांना धरणीवर लोळवले. त्यांच्या रक्ताने जमीन रक्तरंजीत झाली. पाण्याला आणि जमिनीलाही प्रेमाने थोपटनाऱ्या रक्तबंबाळ गुलच हृदय हा रक्तपात पाहून विदीर्ण झालं. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या… आणि त्याचवेळी गुलच्या शेकडो प्रतिकृतीही धरणीवर आसवांचा अभिषेक करू लागल्या.

 गुलच मन वैराग्यान भरून गेलं, करुणेन वाहू लागलं. ते पाहून ढगही पाझरू लागले. धरणीच हृदय गद्गदलं आणि ती दुभंगली. त्यातून प्रचंड आगीचा लोळ बाहेर आला. पाहता पाहता गुल आणि तिच्या सर्व प्रतिकृती त्या आगीच्या लोळात दिसेनाश्या झाल्या.

 आग आणखीनच उसळली. त्या आगीच्या लोळातून एक झाड वर आलं. पेटलेल्या ज्वालेसारख! त्या झाडावर शेंदरी रंगाची असंख्य फुलं उमलली होतो. त्या फुलांच्या मध्यभागी जो केशरी रंगाचा तुरा होता तो म्हणजे गुल होती. पिवळ्या रंगाची, लाल पांढरे ठिपके असलेली ओढणी एका पाकळीच्या रूपाने तिच्या भोवती लपेटली होती. वाळ्याचे पंखे चार पाकळ्यांच्या रूपाने तिच्याभोवती उभे होते. तिला वारा घालण्यासाठी.

 सौंदर्याचं, शौर्याचं, वैराग्याचं आणि त्यागाचं प्रतीक असलेली शेकडो गुलमोहोराची फुले त्या झाडावर उमलली होती…गुलमोहोराने आपली कहाणी संपवली आणि वडाकडे पाहिले, वडही आतून तृप्त तृप्त झाला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.