निळ्या पापण्यांवरून फिरती
मोरपिसे ही नाजुक लोभस,
फुलून येती अन हृदयातिल
आठवणीतिल गुलाब राजस!
ब्रम्ह-कमळ नी निशिगंधासम
दवात भिजली लिली दिवाणी,
किती लाघवी कुंद-काकडा,
लाजलाजते कण्हेरराणी!
धवल गुलाबी गडद किरमिजी
ती शेलाटी मधुमालती;
नाजुक-साजुक गोकर्णीची
अंबाड्यावर माळे फांती…
कोण कशाला कुठे निघाले?
नका विचारू प्रश्न सारखे;
प्रीतसागरी डुंबायाला
जसे उतरले जळी पारवे!!