शिशिर ऋतू मी शिशिर ऋतू
मम ह्रदयाचे पाच ऋतू
घर बर्फाचे बांधुन मी
तयात बघतो राहुन मी
कधी झोपतो निवांत मी
म्हणत वसंत ये ये तू
संगे त्याच्या बागडतो
वठली खोडे पालवतो
वाद्ये मंजुळ वाजवतो
गीष्मासंगे जात उतू
कुंकुम वर्णी निसर्ग हा
हिरवाईने नटे धरा
खाउन आंबे फणस गरा
म्हणतो वर्षे कोसळ तू
मीच धबधबा नीर झरा
वाहत जातो पुढे खरा
भरून सांडतो भराभरा
म्हणतो हेमा झळाळ तू
सुवर्ण कांती हळदीची
हेमंतातील सोन्याची
फळा-फुलांची धान्याची
म्हणतो शरदा लपेट तू
नेसुन सुंदर चंद्रकळा
कोजागिरीचा मुक्त गळा
उत्तर रात्री फुले मळा
मला शरदिनी थोपट तू
शिशिर ऋतू मी शिशिर ऋतू
मम हृदयाचे पाच ऋतू