Radif of this Ghazal is Nili athavan’. Nili athavan means blue memory.Blue means deep.This Ghazal is written in matravrutta(24 matras).
मेघसावळ्या मनी ठिबकली निळी आठवण
मोरपिसासम मग थरथरली निळी आठवण
गोड गुलाबी पहाट हळवी पांघरता मी
आभाळातुन खटयाळ हसली निळी आठवण
हिरव्या पिवळ्या आठवणींचा गुंता होता
मीच बदलले अन बावरली निळी आठवण
नकोच रुसवा हरेन मी रे थांब जरा ना
बघून तंटा बघ हिरमुसली निळी आठवण
उचलुन घेता तान्हुल्यास मी तळहातावर
डोळ्यांमधुनी का टपटपली निळी आठवण
काष्ठांची मोळी बांधुन खोल बुडवली
कवितेमधुनी तरिही तरली निळी आठवण
सांग ‘सुनेत्रा’ रंग कोणता आवडतो तुज
कानी येउन हळु कुजबुजली निळी आठवण