पारा होते मी
बघ ओघळले मी
धारा झाले मी
किल्ला होते मी
पडले झडले मी
पाया झाले मी
कारा होते मी
तुटले फुटले मी
वारा झाले मी
तारा होते मी
चपला बनले मी
उल्का झाले मी
ओढा होते मी
भिजले भरले मी
दाता झाले मी
काया होते मी
हसणे शिकले मी
आत्मा झाले मी
साकी होते मी
फुलले खुलले मी
गाणे झाले मी
काटा होते मी
चुभले डसले मी
वैदू झाले मी
पक्षी होते मी
फिरले उडले मी
वारू झाले मी
होडी होते मी
बुडले तरले मी
तारू झाले मी
धोंडा होते मी
कटले घडले मी
मूर्ती झाले मी
काठी होते मी
वसनी मढले मी
झेंडा झाले मी
मीरा होते मी
सजले धजले मी
राधा झाले मी
शाई होते मी
गळले झरले मी
पाणी झाले मी
साधी होते मी
कपडे पिळले मी
साध्वी झाले मी
सीमा होते मी
कळले वळले मी
मुक्ती झाले मी
बाई होते मी
टिकले झुकले मी
शक्ती झाले मी
माळी होते मी
घरटे विकले मी
वाणी झाले मी
जाळी होते मी
मला उसवले मी
धागा झाले मी
कैरी होते मी
तपले जुळले मी
आंबा झाले मी
खड्डा होते मी
स्वतःस खणले मी
खोली झाले मी
ऋद्धी होते मी
पुस्तक लिहिले मी
सिद्धी झाले मी
पाणी होते मी
मला उकळले मी
वायू बनले मी
माती होते मी
अंकुर जपले मी
माई झाले मी
मात्रावृत्त (४+४+२=१० मात्रा)