अजूनही ती मजला जपते
अडखळता मी उंबरठ्याशी…
हात देउनी मज सावरते
अजूनही ती मजला जपते
गाठी घालित आणिक आवळीत
बसते जेव्हा शल्य मनातिल
हळूच शिरते बोटांमध्ये
उकलुन गाठी मन उलगडते
अजूनही ती मजला जपते…
तिचे सजवणे घास भरवणे
आठवताना मन झरझरता
नाजुक साजुक बोली बनते
अश्रुंसंगे बोलत बसते
पापण काठी बांध घालते
अजूनही ती मजला जपते…
गाठुन मजला एकटवाणे
छळती जेंव्हा कातरवेळा
बनून ठिणगी मज पेटवते
अजूनही ती मजला जपते …
थरथरणाऱ्या सुकल्या अधरा
झुळूक बनूनी चुंबून जाते
अजूनही ती मजला जपते…
कधी वाटते मूढ मनाला
तीच हवी मज बोलायाला
तीच हवी मज शांत कराया
माझ्यासाठी गोळा होते…
मोरपिसांची पिंछी बनते
मोरपिसांच्या मृदुल करांनी
झरझर मम नयनांवर फिरते…
अजूनही ती मजला जपते….