गत आयुष्यातील आठवणी या नेहमीच सुखद असतात. याचे कारण घडून गेलेल्या त्या घटनांकडे आपण तटस्थपणे निरपेक्षपणे पहात असतो. त्या त्या काळात घडलेल्या अनुभवलेल्या आनंददायक घटना वर्तमानातील जगण्याचा आनंद वाढवतात. त्याकाळात ज्या घटना प्रसंगांमुळे आपण दुःखी झालो त्या घटना दुःख नेमके कशामुळे झाले होते याचे कारण शोधण्यास प्रवृत्त करतात. मग अशी कारणे शोधता शोधताच आपल्यातले काही गुण-दोष आपल्याला नव्याने जाणवू लागतात. नकळतच नेहमीच्या कामाच्या धबडग्यातही आपण आत्मचिंतन करू लागतो. असे करता करता त्या घटनांकडेही आपण सकारात्मक नजरेने पहायला लागतो. अशी सुंदर सकारात्मक नजर अगदी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे काम करू लागते. त्या घटनांमुळेच आपण कसे सावध झालो, पुढचे धोके कसे सहज ओळखू लागलो, कसे खंबीर बनत गेलो याची जाणीव होऊन मन प्रसन्न होते. जगण्याला नवी उभारी येते. म्हणूनच माझ्या आयुष्यातल्या सर्वच आठवणी म्हणजे मला मिळालेल्या जादूच्या कांड्या आहेत.