नवनवोन्मेष शालिनी
मम प्रतिभा वरदायिनी ।धृपद।
नऊ रसांचे पान करोनी
नव रंगांची उधळण करुनी
तृप्त हसे शरदिनी ।१।
मधुघट भरले पावित्र्याने
सतार दिडदा गाते गाणे
मयुर नाचतो वनी ।२।
शेवंती अन झेंडू माला
आम्रपर्णयुत तोरण दारा
रांगोळी अंगणी ।३।
अम्बरातले चंद्र चांदणे
बिंब जलातिल लोभसवाणे
शुभ्र किरण कुमुदिनी ।४।
निळे सरोवर भरून वाहे
हंस हंसिनी विहरत आहे
काठांना स्पर्शुनी ।५।