सूर्याच्याही आधी उगवे आत्मसूर्य माझा
चित्तामधल्या अंधाराची संपविण्या बाधा
साधा माझा सूर्य तप्त पण चंद्रासम शीतल आहे
चंद्रही माझा शांत शांत पण सूर्यासम तेजस आहे
आत्मचंद्र पूर्वेला उगवे पुनवेच्या रात्री
अंधाराला करे सुशोभित लहरुन गात्री गात्री
चंद्र सूर्य मम दोन नेत्र हे निश्चय अन व्यवहार
दो नेत्रांनी बघत बघत मी करेन हा भव पार
तटावरी जाईन सुखाने पैलतटा पाहण्या
करेन वानरसेना गोळा पूल वरी बांधण्या
पूल बांधुनी मजबुत सुंदर होईन मी शांत
नसेल तेव्हा मला कशाची-कशाची न भ्रांत …