दाटन येता स्मृती अंतरी कातर वेळी
रडून घे तू मुक्त मोकळे कातर वेळी
नकोस दाबू भाव भावना घुसमट होता
लाव दिवा तू देवापुढती कातर वेळी
बोल मनाशी बोल प्रियेशी बोल फुलांशी
सांडुन अश्रू लिहित राहा तू कातर वेळी
लिही आणखी फाड हवे तर लिहिलेले तू
सुचेल सुंदर अधिक त्याहून कातर वेळी
तिन्हीसांजेला संधिकाल म्हण हवे तुला जर
सूर्यास्ताला नयनी भर तू कातर वेळी