कृतज्ञ मीही सुंदर सृष्टी सुंदर माझी सुंदर मुले
डोळे माझे वीज अंबरी त्यावर अंतर झुले
पूर्वजन्मिची पुण्याई मम जन्मोजन्मी वसे
त्याचमुळे मम पूर्ण छबीही इतुकी मोहक दिसे
अब्जाधिश मी आज जाहले सौख्य संपदा खरी
हृदयी माझ्या आत्मप्रियाची वाजतसे बासरी
पूर्ण देश अन पूर्ण जगाच्या सफरीला जाण्यास
सज्ज जाहले कुटुंब माझे मोदाला लुटण्यास
हवे हवे जे खान-पान मज सर्व सर्व लाभले
उत्तम आरोग्याची मजला सत्य संपदा मिळे
गझल मैफिली गप्पा गोष्टी चांदणराती निळ्या
भिजुन चांदणी हसेन लोभस पडतिल गाली खळ्या
मोक्ष कशाला खरा म्हणावे अता कळावे तुला
मुक्त सुनेत्रा कृतज्ञ आहे म्हणते अंतर मला
मात्रावृत्त – २७ मात्रा