मी पुण्याची शान आहे
संस्कृतीचे पान आहे
मी सुगंधी केवड्याचे
प्रकृतीचे रान आहे
मी तुझ्या सच्च्या सुखांनी
दाटलेले गान आहे
ऐकण्या गाणे तुझे मी
तानसेनी कान आहे
लेक माझा सावळा अन
लेक गोरीपान आहे
मी भुकेल्या मूक जीवा
वाढलेले पान आहे
स्वच्छ त्या हिरव्या चहाच्या
मी कपाचा कान आहे
केरळातिल श्यामसुंदर
मी गुरूहुन सान आहे
शुद्ध माझे रूप तैसे
खान आणी पान आहे
माझिया आत्म्यात माझे
झळकलेले ज्ञान आहे
न्यूनगंडी अडकलेली
“ती” अहं ची मान आहे
प्रियजनांना भावणारे
काव्य माझे छान आहे
सत्य सुंदर जे शिवासम
त्यात माझी जान आहे
ज्यात बसते मी सुनेत्रा
धर्म तोची यान आहे
अक्षरगणवृत्त – १४ मात्रा
लगावली – गालगागा/गालगागा/