वेड लाविते वनदेवांना बाभुळलेली काष्ठसुंदरी
झाडे लावी बांधावरती जांभुळलेली काष्ठसुंदरी
लिहीत असते काहीबाही पेंगुळलेली काष्ठसुंदरी
अर्थ काढते लाख तयातुन काजळलेली काष्ठसुंदरी
गोड बोलते साखर पेरित डोईवरती मधुघट पेलित
पावत असते पुरुषार्थीना गाभुळलेली काष्ठसुंदरी
हाडाची ती काडे करुनी छप्पर घाली घरास अपुल्या
घास भरविते बाल जिवांना पेकुळलेली काष्ठसुंदरी
विहिरीवरचा रहाट ओढी झरझर सरसर डौलामध्ये
सर्वांना पण पाजे पाणी साखळलेली काष्ठसुंदरी
चंचल नजरा भिरभिरणाऱ्या भिरकावुन देणारे काटे
कोठुन येती स्वतःस पुसते गोंधळलेली काष्ठसुंदरी
अमर व्हावया आतमभक्ती स्तुती रचोनी जिनदेवांची
तिला गातसे हृदयापासुन आकुळलेली काष्ठसुंदरी
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)