पूल …
पूल तर पुद्गल आहे…जिवंत माणसांनी माणसांसाठीच बांधलेला…
माणसांबरोबर त्यावरून चालत जातात प्राणीसुद्धा… आणि माणसांचे सामान वाहणारे प्राणी आणि वाहनेसुद्धा!
नदी जेंव्हा कोरडी ठक्क असते तेव्हा या पुलाखालीसुद्धा गोरगरिबांचे संसार उभे राहतात. पुलाखाली माणसे राहतात…आपल्या मोडक्या तोडक्या झोपड्यांमधून… त्यांनी पाळलेल्या कुत्र्यामांजरांसोबत, गाढवे आणि शेळ्यांसोबत भटकी कुत्रीही असतातच…
हा पूल जेव्हा बांधला तेव्हाच्या आठवणी सांगणारे… त्यावर काव्य लिहिणारेही बरेचजण असतात.
पूल किती मजबुत, किती प्रशस्त, किती देखणा होणार हे पूल बांधणाऱ्या माणसांच्या इच्छेवर अवलंबून असते. पूल भव्य दिसावा आणि तसाच भव्य असावाही म्हणून अनेकजण राबतात. म्हणूनच पूल तयार होतो.
पूर आलेल्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीवरून या पुलाच्या मदतीने अनेकजण पार होतात. कोणी धाडसी वीर पोहत पोहत नदी पार करतात. कोणी आपल्या छानश्या नावेतून नदी पार करतात. ज्याचा त्याचा प्रश्न असतो शेवटी…
पूल हे सर्व बघत असतो, तटस्थपणे… जन्मल्यापासून ते अगदी अंतिम क्षणी कोसळेपर्यंत!
त्याला ठाऊक असतं… तो केव्हा कोसळणार ते! पण… तो नाहीच बोलत काही… कारण त्याला कुठे बोलता येतं?
मग मात्र त्याचे मौन समजून घेणारी माणसे गाढ झोपेतून जागी होतात… आणि तेव्हा मात्र झोपेचे सोंग घेतलेली माणसे मौन होतात…. मग दीर्घ झोपेतून जागी झालेली काही शहाणी माणसे पुन्हा एकजुटीने नव्या भक्कम पुलाची उभारणी करण्यासाठी सज्ज होतात..