शिशिराच्या पाचोळ्यातिल मज अक्षर अक्षर हाक मारते
निरोप घेण्या वाज वाजते वसंत वाऱ्यावरती झुलते
पीत पोपटी मृदु पर्णांकुर पाहुन सृष्टी हात जोडते
किरण कोवळे चराचरावर मोद सांडता हृदय डोलते
…
पानांच्या जाळीतुन उतरे ऊन खोडकर हळदी तरुतळ
मृदा तळीची उडत राहते वारा चंचल ऊन न चंचल
गतकाळाच्या आठवणीतिल पिसे लहरती वाऱ्यावरती
संधिकाल की उषाकाल हा कोडे पडते क्षितिजावरती
…
निसर्ग ईश्वर माझ्या पाठी म्हणतो मजला जा जा पुढती
लिही लिही तू रोज वासरी मिळेल तुजला सदैव शांती
कल्पतरू अंगणी बहरला फुले मृदेवर घन टपटपती
उणे न काही मजला आता गीत मनीचे पक्षी गाती
…