बाई सुया घे गं दाभण घे …या जुन्या लोकगीताच्या चालीवर आधारित नवे गीत
बाई सुया घे गं दाभण घे ….
टॅटू गोंदवुन घ्या गं कुणी … टिकल्या घ्या कुणी ऐना फणी….(धृ. पद)
कुरळ्या केसांच्या हौसाबाई
डोकं धुवाया घ्या शिकेकाई
दुखऱ्या फोडावर धोंडामाई
लावा शेकुन बिब्बा बाई
झाडाल वाडा मग बावन खणी …
टिकल्या घ्या कुणी ऐना फणी …. १
जरा बाजुला आक्का सरा
भुई झाडतोय कि घागरा
बघू ओढणीचा वास द्या जरा
ह्यो रिठ्याचा साबुन धरा
हौदावर जाऊन धुवा धुणी…
टिकल्या घ्या कुणी ऐना फणी…. २
लै गोजिरी तुमची छबी
तिच्यासाठी ही भावली चबी
तिच्या अंगठीत बसवा रुबी
तीट लावाया काजळ डबी
शेंड्या बांधाया घ्या रिबिनी
टिकल्या घ्या कुणी ऐना फणी….३
माझ्या पोतडीत रंगीत वही
करा बायानो त्यावर सही
घाला मडक्यात ताजं दही
साळंत जाईल तुमची जुही
मण्यांची पाटी घ्याहो झणी
टिकल्या घ्या कुणी ऐना फणी….४
बाई सुया घे गं दाभण घे ….
टॅटू गोंदवुन घ्या गं कुणी … टिकल्या घ्या कुणी ऐना फणी….