खडकांतुन उडत झरत
निर्झर ये गीत गात
जायचे तया खुशीत
करित रम्य नृत्य नाच
वळणावर घेत उड्या
पर्वतास भेट खड्या
सखाच हा तुझा कड्या
कड्यास साद हसत देत
बिजलीसम लखलखत
निर्झर ये गात गात ….
वाटेवर पोरधरी
मिळवतील हात जरी
सान पोर समजुनी
पकडतील जर कुणी
त्यांस जळी पाडूनी
झरा शिरे दाट वनी
जोरदार धडक देत
पुनःश्च येय दुडदुडत
निर्झर हा गात गात ….
ग्राम स्वच्छ लागताच
थांब झऱ्या घेच श्वास
पवन गगन भूतलास
अन मनास वाच वाच
उतरताच ऊन तप्त
मजेत नीघ गात गात
सूर ताल अन लयीत
निर्झर ये गीत गात ……
बागडती तृणवेली
स्नानास्तव तव जली
चुंबुनिया तृणफुलांस
सांग गोष्ट गूज खास
मोकळा भरून श्वास
डुलत डुलत रमत गमत
निर्झर ये गात गात …..
टपटपत्या पावसात
चिंब भिजत न्हात न्हात
झळझळते कनक पंख
लावुनिया फुंक शंख
अंकाक्षरी तेजोमय
बघ क्षितिजी सांजवात
जुळवुनिया हृदयी हात
निर्झर ये गात गात …..
भेट निळ्या पाखरांस
मुक्त उडत त्या थव्यात
फिर मोकळ्या हवेत
उडुन तृप्त तृप्त होत
नीज यावयास शांत
भूमीवर कोटरात
उतर हळू गात गात
जोजवीत पाळण्यात
निजविल तुज माय रात
निर्झरमय गीत गात …..
पूर्वदिशी झुंजुमुंजु
लागतील रंग दिसू
ऊठ झऱ्या किलबिलात
भवताली बघ फिरत
गोल मस्त वळत वळत
फुसांडुनी खळखळत
निर्झर तू हूड बाळ
येच मधुर मधुर गात…..