पृथ्वी – PRUTHVEE (EARTH)


EARTH म्हणजे पृथ्वी.
अर्थ म्हणजे वित्त…धन संपत्ती.
अर्थ सांगणे म्हणजे, शब्दातून वाक्यातून स्वतःने जे काही जाणले ते विशद करून सांगणे,लिहिणे…
अर्थ म्हणजे आत्मासुद्धा !
शब्दाला अर्थ असतो, वाक्यालाही अर्थ असतो.
अर्थाचाही एक अर्थ असतो…

अक्षरे, शब्द आणि वाक्ये तर पुद्गल असतात…मग पुद्गलांत आत्मा असतो काय…
कविमनाची व्यक्ती, एखादी जिवंत व्यक्ती जेव्हा उस्फुर्तपणे किंवा विचारपूर्वक काही लिहित असते तेव्हा त्यात सुद्धा श्रम असतात.
मन, बुद्धी शरीर यांच्या एकत्रित परिश्रमातून काहीतरी लिहिताना बोलताना घाम गाळावा लागतो.
मग त्या शब्दांना गाळलेल्या घामाचा सुगंध येऊ लागतो. शब्दात अपार शक्ती असते..शब्दांना जणू चैतन्य प्राप्त होते.

एखादा माणूस सळसळत्या मनाने काही बोलतो किंवा एखादा प्राणी जेव्हा सळसळत्या मनाने जेव्हा काही उच्चारतो तेव्हा शब्द आणि उच्चारसुद्धा जिवंत होतात. गतिमान होतात. शब्द लिहिणारी, वाचणारी बोलणारी व्यक्ती जेव्हा उत्साहाने सळसळत असते तेव्हा शब्दपण सळसळू लागतात. त्यात कंपने निर्माण होतात. शब्द पानांप्रमाणे सळसळू लागतात. पिंपळाच्या पर्णसंभाराप्रमाणे डोलू लागतात.
आपली पृथ्वीसुद्धा पुद्गल आहे असे म्हटले जात असले तरी तिची क्षमा अजोड आहे.

पृथ्वी स्वतःवरच्या सर्व पृथ्वीकायिक जीवांसह इतर सर्व स्वतंत्र सजीव आणि अजीवांसह सर्वांचे आश्रयस्थान आहे. ती सर्वांचा त्यांचा भार पेलते. म्हणून या सर्वांचा मिळून एक सामूहिक आत्मा..प्रतीकात्मक आत्मा असतो…हा पृथ्वीचाच आत्मा असणार नाही काय..
म्हणूनच मग तिच्याही आत्म्याला कर्मबंध होतो.कर्मांच्या भाराने मग ती कधी धडधडते..कधी फाटते.. कधी गरजते.. कधी हुंकारते तर कधी थयथयाट करते.
आणि हळूहळू शांतसुद्धा होते. कारण ती तिचा स्वधर्म सोडत नाही. स्वतःच्या रक्षणासाठी ती स्वतःच सिद्ध होते. स्वतःच्या हातांनी स्वतःचा अक्ष फिरवण्यास ती समर्थ असते.


2 responses to “पृथ्वी – PRUTHVEE (EARTH)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.