Dharma or relegion means system of faith and worship but if we think deeply dharm means our natural behaviour. Natural behaviour of a person decides his or her dharm. In jainisam inner beauty is more important than physical beauty.
In the process of increasing inner beauty our character plays an important role. Souls basic character is Ahimsa and Ahimsa is the basic principle of jainisam. Jain means followers of ‘Jin’ or ‘Tirthankar’. Jin or Tirthankars are free souls. Ahimsa means not to hurt anybody by mind speech or action.
जैन धर्मात वस्तूच्या स्वभावाला वस्तूचा धर्म म्हणतात. उदा. अग्नीचा स्वभाव उष्ण व पाण्याचा स्वभाव शीतल असतो. पाणी जरी स्वभावत: शीतल असले तरी अग्नीच्या सान्निध्यात ते गरम होते. पण अग्नीपासून दूर होताच मूळ स्वभावाप्रमाणे आपोआप थंड होते. निसर्गात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळी असते. मोठे मासे छोट्या माश्यांना खातात.
वनस्पतीवरील कीड हे काही पक्ष्याचे अन्न असते. काही वनस्पतीसुद्धा कीटकभक्षी असतात. सिंह, वाघ, लांडगा आपली क्षुधा भागवण्यासाठी इतर छोट्या प्राण्यांना मारून खातात. डोंगराळ भागातील जंगलात, दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणारे पारधी, भिल्ल किंवा नगरवासी असणारे कसाईसुद्धा आपल्या कुलपरंपरेप्रमाणे बाल्यावास्थेपासूनच शिकारीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने हत्या करतात.
त्यामुळे काही अजैनांच्या किंवा जैनधर्मियांच्या मनातही अहिंसा हा आत्म्याचा स्वभाव कसा याबद्दल शंका निर्माण होते. त्यासाठी काही उदाहरणे पाहता येतात. शीतल स्वभावाचे पाणी अग्नीच्या संसर्गाने गरम होते. काही पशुपक्षी अगदी मनुष्यप्राणी सुद्धा हत्या करतात. ते ज्या परिस्थितीत वाढतात त्या वातावरणाच्या प्रभावाने ते तसे वागतात. पण त्यांची स्वाभाविक प्रवृती हिंसा करण्याची नसते. कोणत्या तरी निमित्ताने किंवा संसर्गाने ही प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण होते. पण त्याचबरोबर त्यांच्यातली अहिंसक प्रवृत्तीही वेळोवेळी प्रकट होतच असते.
सिंह, वाघ, मांजर वगैरे प्राणीसुद्धा उदरनिर्वाहासाठी हिंसा करतात, पण स्वत:च्या परिवाराशी पिलांशी दयाभावानेच वागतात. मांजर जेव्हा उंदराला मारते तेव्हा रक्ताचा शेवटचा थेंबही चाटून पुसून घेते. पण स्वत:च्या पिलाला दातात अगदी हळुवारपणे पकडते. त्याचप्रमाणे पारधी, कसाई, भिल्ल, वगैरे लोकांना स्वत:च्या परिवाराबद्दल, समाजाबद्दल, घरात पाळलेल्या पशुपक्ष्याबद्दल प्रेमच असते.
क्रोध, लोभ, स्वार्थ, अभिमान या भावनेने दुसऱ्याला दु:ख देणे हीपण हिंसाच असते. म्हणून हिंसा ही फक्त प्रत्यक्ष हिंसा करण्यानेच होते असे नाही तर कोणाला तरी विनाकारण दुखवणे, टिंगलटवाळी करणे, वैयक्तिक स्वार्थासाठी कोणाच्या तरी मृत्यूस कारणीभूत होणे यातूनही हिंसाच होत असते. पण कधी कधी नकळतपणे मनात दुर्भावना नसतानाही काही वेळा आपल्या हातून दुसऱ्यास दु:ख पोहोचते. पण ती हिंसा ठरत नाही.
रोग्याला बरे करण्यासाठी डॉक्टर शस्त्रक्रिया करतात. इंजेक्शन्स देतात, औषधे देतात. कधी कधी शस्त्रक्रिया करताना रोगी दगावतो.पण तरीही या मुळे डॉक्टरांना हिंसेचे पाप लागत नाही.कारण हेसर्व करीत असताना डॉक्टरांची मूळ भावना रोग्याला बरे करणे हीच असते. आई-वडील गुरुजन, अध्यापक मुलांना गुणी बनवण्यासाठी शिक्षा करतात. मुले त्यामुळे दुखावली जातात. पण असे करण्यामागे या सर्वांची भावना चांगली असते. म्हणून या गोष्टीला हिंसा म्हणता येत नाही. हिंसेमुळे प्रतिहिंसा घडते. वैर पकडल्याने सुडाचे चक्र चालूच राहते. अहिंसेमुळे हे चक्र थांबते. शांततेचा प्रसार होतो.
शाकाहार, पाणी गाळून पिणे, मद्य, मास, मधू यांचा त्याग, रात्री भोजनत्याग हे खास जैनांचे म्हणून ओळखले जाणारे आचार अहिंसेचेच आचार असतात. पण तरीही जैन गृहस्थ आणि गृहिणींच्या जीवनात सुद्धा थोडीफार हिंसा अनिवार्य असते. पण तसे करताना देखील कमीतकमी हिंसा व्हावी असे जैन मत आहे. जीवदया, मृदू वाणी अहिन्सेचीच जपणूक करतात.
पंचाणूव्रतातील दुसरे व्रत सत्यभाषण आहे. पण यात सत्य हे सापेक्ष असते. सत्याच्या अनेक बाजू असतात. आपण जाणतो, पाहतो, ऐकतो, समजतो तेवढेच सत्य नसते. सत्याला असंख्य आयाम असतात. सत्य व्रतात हट्ट, दुराग्रह, आळस यांना प्रवेश नसतो.
तिसरे व्रत अचौर्य व्रत आहे. यात दुसऱ्याची पडलेली वस्तू , विसरलेली वस्तू न घेणे, चोरून आणलेल्या वस्तू न घेणे, दुसऱ्याच्या साहित्याची (काव्य, लेख, शोधनिबंध इत्यादी ) चोरी न करणे, परीक्षेत कॉपी न करणे अशा गोष्टीचा लोभ न होऊ देणे हे सर्व अचौर्य व्रतात येते. चौर्यामुळे मनात अपराधी भावना निर्माण होते. त्यामुळे मन कलंकित होते.
त्यानंतर चौथे व्रत म्हणजे परिग्रहप्रमाण व्रत होय.संसार करताना आवश्यक तेवढ्याच वस्तू, पैसे, वाहन, जमीन, शेती, भांडीकुंडी, घरात ठेवणे किंवा स्वत:च्या परिग्रहाची एक कमाल मर्यादा ठरवून घेणे याला परिग्रहप्रमाण व्रत म्हणतात. आत्यंतिक लोभ बाळगून धनधान्य, जमीनजुमला यांचा संग्रह करणे हे सुद्धा पापच आहे. यामुळे समाजात विषमता वाढीस लागते.
विवाहानंतर जे व्रती श्रावक श्राविका असतील त्यांनी पत्नीशिवाय व पतीशिवाय इतर कोणाही बद्दल विषय वासना न बाळगणे हे ब्रम्हचर्य व्रत असते. अध्ययन काळात विद्यार्थ्यांनी अध्ययनावर लक्ष देणे, वासना, विकार यांना दूर ठेवणे अपेक्षित असते. गृहस्थ आणि गृहिणी यांनी सुद्धा शक्यतो शील व्रताचे पालन करावे. शील व्रताचा संबंध फक्त लैंगिकतेशी न जोडता मनाचे पावित्र्य,पारदर्शकता यांना महत्व द्यावे.
शील व्रतात वागणे, बोलणे या सर्वातच आपोआपच पारदर्शकता दिसून येते. शील हे फक्त नारीचेच भूषण नसून नराचे सुद्धा भूषणच असते. जैन धर्मातील पंचाणू व्रते साधारणपणे अशी असतात.