घर किती प्रिय !
घर किती प्रिय असतं आपल्याला … त्यात आपली एक एकत्र family ..कुटुंब रहात असतं .. गुण्यागोविंदाने !
एका सुंदर प्रभातीस मला असेच काही सुंदर लिहायचा mood उफाळून आला… म्हणून बसले आमच्या familyकट्ट्यावर आणि लागले लिहायला.. या कट्ट्यावरची पोरं पोरी मला आवडतात. त्यांच्यात असताना माझी प्रतिभा शक्ती साकी बनून मला काहीतरी देत असते. .. मग माझी बोटे सुसाट वेगाने टाईप करू लागतात. .. पूर्वी हे काम लेखणी करायची.. नंतर PC चा key board आणि आता smart phone ,,,
Shashank आणि Madhura तर मला सतत मी काहीतरी लिहावं म्हणून पाठीशी भुणभुण करत असायचे पूर्वी.. पण आता पाठदुखीमुळे पाठ न दुखवता कसं लिहिता येईल यासाठी नवनवे उपाय सुचवत असतात… आमची चिमणाबाई म्हणजे संगीता तर नेहमीच मला, मावशी तू ललित लिही..लहानपणीच्या आठवणींवर असे नेहमीच सांगत असते.. असो!
आता हे सर्व सांगावे वाटले कारण… महावीरने पाठवलेला वात्सल्यमूर्ती लेकुरवाळ्या विठुरायाचा फोटो.. एक सुरेख सुंदर रेखाचित्र !त्यावर उस्फुर्त एक सुंदर मुक्तक असेच लेखणीतून सांडत गेले… उमटले.. !
त्यावरूनच काहीतरी ललित बंधात्मक सलील सलिल यासारखे लिहावे वाटले… म्हणून जसे सुचेल तसे लिहीत गेले…
आमच्या आई दादांची भाषा ..म्हणजे मातृभाषा कन्नड.. कानडी.. मोरब शिरगुर ऐनापूर मोळवाड ससालट्टी पालभांवी चिंचली कुडची रायबाग या भागात बोलली जाणारी कन्नड बोलीभाषा… त्यांच्याकडून आणि नातेवाईकांकडून म्हणजे ,, मुत्त्या आज्जा आई येऊ मामा आत्ती काका काकी मावश्या वगैरे जण बोलताना ऐकून बोलून आम्हा भावंडांना पण बोलता येते… आईच्या तोंडून काही कन्नड वाक्प्रचार, म्हणी किस्से ही ऐकलेले…
आईदादांची मायभूमी कर्नाटक.. तर कर्मभूमी महाराष्ट्र… म्हणून आम्ही भावंडे या मिश्रभाषी संस्कृतीत लहानाचे मोठे झालो..
लहानपणी बारामती कॉलेजच्या कॅम्पस मध्ये प्राध्यापक आणि प्राचार्य निवासात राहिलो… पुढे जयसिंगपुरात काही दिवस भाड्याच्या घरात ..नंतर आईदादांच्या माळावरच्या सिद्धार्थ बंगल्यात राहिलो.. लग्नानंतर तिथलं माहेरपण आणि नंतर महावीर वर्षाने अगदी हौसेने बांधलेल्या सेवायोग बंगल्यात राहिलो… तिथेही माहेरपण अनुभवलं .. अजूनही अनुभवतो आहोतच…
लग्नानंतर नेजेचा वाडा आणि भोसरी लांडेवाडी निगडी चिंचवड ही माझी कर्मभूमी … या कर्मभूमीने मला खूप काही दिले … मला कोणी घडवले म्हणण्यापेक्षा किंवा आपणास कोणी घडवले म्हणण्यापेक्षा आपण स्वतःच घडत जातो…या कर्मभूमीत… अगदी आपल्याला हवे तस्सेच !..
लहानपणी बारामतीत हिंदी भावगीते भक्तिगीते चित्रपट गीते रेडिओवर ऐकायचो.. जयसिंगपुरात नवव्या गल्लीत राहत असताना आणि मातृपितृछाया बंगल्यात रहात असताना मात्र जयसिंगपुरातल्या नगरपालिकेचे भोंगे अगदी खरे मित्र झाले … सकाळी सहा साडेआठ दुपारी बारा आणि रात्री परत साडेआठला भोंगा वाजे.. सुरुवातीला आम्हाला हे सारे खूप नवे पण कौतुकाचे होते…
मातृपितृछायामध्ये रहात असताना सकाळच्या सहाच्या भोंग्यापाठोपाठ नगरपालिकेतील स्पीकर लागायचे.. त्यात संतांची भक्तिगीते लागायची.. त्यातली मुख्यत्वेकरून अजूनही आठवतात,, पूर्ण गीत नेमके शब्द माहिती नसत.. पण जसे ऐकले तसे अजूनही आठवते… जसेकी ..आनंदाचे डोही आनंद तरंग.. वृक्षवल्ली आम्हा सोयरे जलचरे …पक्षीही सुस्वरें आळविती ..खेळ मांडीयेला वाळवंटी घाई.. नाचती वैष्णव भाई रे.. तुका म्हणे केली सोपी पायवाट उतरावया भवसागर रे… अशी काही गाणी असायची… रेडिओवर कानडा राजा पंढरीचा अशीही गाणी ऐकलेली… असो.
.
तर परत संत तुकाराम आणि विठुरायाच्या रेखाचित्राकडे वळून पाहताना असे वाटलेकि … मातृपितृभक्त पुंडलिक याने भेटीला आलेल्या विठुरायास एका विटेवर उभे राहायला सांगितले… कारण तो त्यावेळी मातापित्यांच्या सेवेत मग्न होता.. अशी एक दंतकथा आख्यायिका किंवा इंग्रजीत ज्याला fantasy म्हणतात ती ऐकलेली वाचलेली कुठेतरी…की तो विठ्ठल तेंव्हापासून युगे लोटली तरी विटेवर उभा आहे.. भक्तावर तो प्रसन्न आहे.. त्याला कंटाळा नाही वाट पाहण्याचा… तो आनंदाने वाट पाहत विटेवर उभा आहे… भक्त पुंडलिकावर तो खूष आहे…
तर ते चित्र पाहून माझ्या मनात असंख्य भाव भावनांचे कल्लोळ उठले.. संतांची मांदियाळी अवतरली पुढ्यात.. नाठाळ लोकांच्या माथी काठी हाणणारे तुकाराम आठवले.. पैलतोगे काऊ कोकताहे … शकुन गे माये सांगताहे … लिहिणारे ज्ञानदेव आठवले… झाडलोट करी जनी केर भरे चक्रपाणी म्हणणारी जनाबाई आठवली… ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताई आठवली… विठ्ठला तू वेडा कुंभार म्हणत म्हणत गात रंगून गेलेला संत गोरोबा आठवला… काय काय आणि किती किती आठवलं म्हणून सांगू… म्हणून हे सारे लिहावे वाटले..
शेवटी काय जी आपल्याला घडवते ..म्हणजे ज्या मातीत आपण टक्के टोणपे खात आणि देतसुद्धा जगायला शिकतो…ती कर्मभूमीसुद्धा मायभूमी इतकीच महत्त्वाची असते.. ज्या मातीत आपण राहू तिला आपलंस करून जगण्यात माणसाची जात खूपखूप हुशार…आणि प्रेम लावणारी… जीवाला जीव देणारी…
आपली जी कर्मभूमी ती आपल्या लेकरांची मायभूमीच ! एकंदर काय जिथं जाऊ तिथल्या मातीत एकरूप होऊ,,,पण मायभूमीशी नाते कायम ठेऊ…