वाटुन पाला मी मेंदीचा तळहातांना रंगविले
जास्वंदीच्या चुरुन पाकळ्या गालांना मी रंग दिले
तेल तुपाची धरुन काजळी नेत्र पाकळ्या लांबविल्या
विडा चघळुनी त्रयोदशगुणी अधर पाकळ्या खुलविल्या
जाइजुईचा गजरा गुंफुन सुवासिक मम कुंतल झाले
निशिगंधाचा सुगंध प्राशुन तनमन अवघे पुलकित झाले
शुभ्र मोगरा हिरवा चाफा भूचंपक तो जर्द जांभळा
दौतीमध्ये भरण्या शाई प्राजक्तासम टपटप झरला
मोरपिसाची करुन लेखणी लिहिल्या कविता रचल्या गझला
गुलाब झेंडू बकुळ फुलांनी देव्हारा मग माझा सजला
कमलदलांवर जणु दवबिंदू तसे टपोरे अक्षर माझे
निर्झर देता ताल तयांना प्रिया तुझीरे गाणे गाते