The poem describes the transition from winter to spring. The portrayal of close relation and association between changes taking place in the nature and our mind is one of the highlights of this verse. The title, ‘Karvandee Kaalyaa Jaalyaa’ means a bush of the black-colored fruits called Karvand (Carissa conjesta).
करवंदी काळ्या जाळ्या
देहास घालिती वीण
रांगोळी काळीशार
श्वासात गोठली धून
गारठल्या फांदीवरचा
पेंगुळला हिरवा पक्षी
खोडांच्या सालीवरती
थरथरते जर्जर नक्षी
बेडौल झाड ढाळी
पानांचे पिकले दाणे
मातीच्या अंगावरती
पाचोळा गातो गाणे
अस्वस्थ झरा हा झोपे
दगडांच्या आडोशाने
पारवा प्राशितो मूक
सूर्याची धुरकट किरणे
गोषात बैसली माय
ममतेचा पान्हा वठला
ओढीत चालते पाय
अंगठा कशाने तुटला
शिशिराचा भरला प्याला
बर्फाने काठोकाठ
शेकोटी जळते संथ
फोडून तयाला वाट
आकाश तडागी झुकते
मिटवून मनाचे पंख
सुकलेल्या पोटी निजला
वासंतिक ओला गर्भ
कोवळ्या उन्हाचे सोने
मातीला देते रंग
मौनात हरवल्या वेली
अन दवात भिजल्या चिंब
सोनेरी उडवुन दुलई
दुडदुडते गोंडस बाळ
हा उत्सव नव सृजनाचा
थबकून पाहतो काळ