In this story based on Jain Philosophy, it is told that Stree-bhrun-hatya is a crime. We must save Girl child.
समकालीन मराठी जैन कथासंग्रह – भाग ५ : अभिषेक
प्रथमावृत्ती- ऑक्टोबर- २००१
संपादन- श्रेणिक अन्नदाते
प्रकाशक- सुमेरू प्रकाशन
कळी- लेखिका -सुनेत्रा नकाते
घडयाळात नऊचा पहिला ठोका पडला अन मी दचकून जागी झाले. खिडकीतून ऊन आत आले होते. थांबून थांबून चढत्या गतीने वाजत जाणारा तो घड्याळाचा टोल माझ्या हृदयाची धडधड वाढवतच गेला. आज एवढा वेळ कशी झोपले मी? कोणीच कसे उठवले नाही मला? मी उठून उभी राहिले आणि खिडकीतून बाहेर पाहिले. ड्रायव्हरने गाडी गेटच्या बाहेर काढली होती. शोभावन्सं आणि त्यांचे यजमान तयार होऊन उभे होते. सासूबाईंचे आत बाहेर चालू होते. घरातून कोमलच्या रडण्याचा आवाज येत होता….आणि मग मला आठवले, आज वीरनगरला पंचकल्याणिक पूजा नव्हतीका? खरेतर आम्ही सगळेजणच जाणार होतो आज!
आज पूजेचा पहिला दिवस! गर्भकल्याणिकाचा! आज तीर्थंकर जिनमातेच्या गर्भात येणार! गावोगावची सारी जैन मंडळी एकत्र येऊन उत्सव साजरा करतील आज. माझ्या घरातली मंडळीसुद्धा तिकडेच चालली आहेत. तीर्थंकर भगवानांचे गर्भकल्याणिक साजरे करायला. आणि..
कालपर्यंत स्वत:च्या सुनेच्या गर्भातल्या एका मुग्ध कळीला संपवण्यासाठी किती आटापिटा, किती खोटेपणा चालला होता इथे!
थाटामाटात पंचकल्याणिक महोत्सव साजरा करणारी, तीन तीन लाख रुपये खर्च करून पूजेचे यजमानपद मिळवणारी ही माझी घरातली मंडळी! आजच्या या प्रसंगी त्यांनी एवढा तरी बोध घेऊ नयेका की; प्रत्येक मातेच्या पोटी जन्माला येणारे मूल तीर्थंकर व्हावे किंवा तीर्थंकरांनी दाखवलेल्या वाटेवरून त्याने जावे म्हणून आपण गर्भावस्थेपासूनच त्याच्यावर संस्कार करतो! त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या पोटी जन्माला येणारी ही चिमुकली तीर्थंकर नाही होऊ शकली तरी तीर्थंकरांची माता का नाही होऊ शकणार? कालचा तो प्रसंग! त्याची आठवणसुद्धा नको वाटते आहे मला!
खरेतर कोमलच्या जन्मानंतर मी ठरवले होते की; आपल्याला ही एकच मुलगी पुरे! दुसरे मूलच नको! तसे मी सासूबाईना एकदा म्हणाले देखील. तेव्हा त्या म्हणाल्या,
“असे कसे चालेल? कोमलला भाऊ नकोका भाऊबिजेला ओवाळायला!”
“पण आई दुसरा मुलगाच होईल कशावरून?” मी शंका काढली. तेव्हा त्या अगदी उसळून म्हणाल्या,
“अगं, जरा चांगलं बोलावं मुक्ता!”
यात काय वाईट बोलले होते मी? मलाच कळेना. तसा जयेश म्हणाला,
“अगं मुलगा होईल नाहीतर मुलगी! पण कोमलला पुढेमागे मायेचे, रक्ताच्या नात्याचे कुणीतरी हवेचना? आपण काय तिला आयुष्यभर पुरणार आहोत?” तेव्हा मी म्हणाले,
“तसे पाहिले तर आपण सगळे एकटेच असतो या जगात! आणि भावंडेच हवीत तर ती सख्खीच हवी असं थोडंच आहे? नाहीतरी आपण बघतो आणि ऐकतोचना की; पाठीला पाठ लावून आलेले सख्खे भाऊसुद्धा कसे एकमेकांचे वैरी होतात. इस्टेटीसाठी भाऊ-बहिण एकमेकांच्या जीवावर उठतात. खऱ्या प्रेमाला रक्ताच्या नात्याची गरजच नसते.”
त्यावर सासूबाई म्हणाल्या,
“ते सगळं एकवेळ खरं मानलं तरी वंशाला दिवा इस्टेटिला वारस नको का? पहिला मुलगा असता तर एकवेळ विचार केला असता! पण पहिली तर मुलगीच झालीना?”
“मुक्ता, ए मुक्ता, अगं लक्ष कुठाय?” जयेशच्या या हाकेने माझी तंद्री भंग पावली. तो म्हणाला,
“आम्ही सगळेजण चाललोय वीरनगरला, कोमलला घेऊन! संध्याकाळी यायला कदाचित उशीर होईल. आणि…काल जे सांगितलंय त्यावर विचार करून ठेव. मला लवकर निर्णय हवा आहे.” जयेश अगदी कोरडेपणाने म्हणाला अन निघूनही गेला.
वाटलं, पाच वर्षापूर्वीचा हाच का तो जयेश? माझ्यावर भरभरून प्रेम करणारा! किती बदलत गेला हळूहळू, कसा ते कळलंच नाही.
माझ्या मोठया वन्सं शोभाताई डॉक्टर होत्या. त्यांचे यजमानही प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ होते. दूर विदर्भातल्या कुठल्यातरी गावात त्यांचा मोठ्ठा दवाखाना होता. खरेतर सुरुवातीला भाड्याच्या दोन खोल्यात त्यांचा दवाखाना होता. पण नंतर स्वत:च्या कर्तबगारीवर त्यांनी तिमजली सुसज्ज हॉस्पिटल उभारले; असे सासूबाई सांगायच्या.
“एकदा मी व जयेश त्यांच्याकडे गेलो होतो. किती सुरेख होतं त्याचं घर. घर कसले? प्रासादच होता तो! पण शोभावन्संच्या वृद्ध सासूबाई त्या प्रासादासम घरात रहात नसत. पाठीमागच्या कौलारू घरात त्या राहायच्या. त्याबद्दल मी विचारले तेव्हा शोभावन्सं म्हणाल्या,
“अगं त्यांचे खूप सोवळे ओवळे असते आणि आमच्या हॉस्पिटलमुळे येथे सगळ्या जातीजमातीच्या माणसांचा मुक्त वावर असतो. त्यांना ते चालत नाही. शिवाय त्या घरात त्यांनी व मामंजींनी संसार केला. त्या आठवणींवरच जगतात त्या आता!”
एकदा अशीच सहज फिरत फिरत मी मागे गेले. संध्याकाळच्या त्या कातरवेळी मी त्या कौलारू घराच्या खिडकीतून आत डोकावले. तेव्हा आजी भगवंतासमोर बसून आरती म्हणत होत्या. या वयातही त्यांच्या आवाजातला गोडवा वाखाणण्याजोगा होता. त्यांनी मला खुणेने आत बोलावले. आरती झाल्यावर त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या,
“शोभाची भावजय ना तू? चुणचुणीत आहेसहो अगदी! असे म्हणून त्यांनी मला शांतीसागर महाराजांचे चरित्र वाचायला दिले. मी मग रोजच त्याच्याकडे संध्याकाळी आरतीला जाऊ लागले. शोभावन्संना मात्र ते फारसे आवडले नाही. त्या म्हणाल्या,
“अगं इथेही रोज होतेचना आरती? मग तिकडे कशाला जातेस?”
तशी शोभावन्संच्या घरातही रोज संध्याकाळी आरती व सकाळी अभिषेकपूजा होत असे. त्यासाठी त्यांनी पगारी पंडितही नेमला होता. पण का कोण जाणे, आजींच्या आरतीत एक वेगळेपणा जाणवायचा. म्हणूनच संध्याकाळी माझी पावले आपोआपच तिकडे वळत.
पण त्यादिवशीची ती घटना! त्या घटनेने मनुष्यस्वभावाच्या एका वेगळ्याच पैलूचे मला दर्शन झाले. त्यादिवशी शोभावन्संकडे शिखरजीकडे विहार करणारे मुनीमहाराज आहाराला आले होते. शोभावन्सं व त्यांचे यजमान अगदी भक्तिभावाने आहार देत होते. त्यांनी त्यादिवशी मलाही आहार द्यायला लावला. इतके दिवस मी फक्त ऐकत होतेकी मुनींना आहार देण्यासारखे दुसरे पुण्याचे काम नाही!
खरेतर मी असल्या पापपुण्याच्या कल्पना मानत नव्हते. पण त्या दिवशी सगळे नियम पाळून आहार देताना माझं हृदय एका अनामिक आनंदाने दुथडी भरून वहात होते. माझ्या देहाचा रोमरोम चैतन्याने पुलकित झाला होता. तो आनंद शब्दातीत होता.
आहारदान झाल्यावर मनाच्या उत्कट आनंदाच्या क्षणी मला आजींची आठवण झाली.मी धावतच मागे गेले….आणि दारातच थबकले. आजी बऱ्याच अस्वस्थ दिसत होत्या. मी जवळ जाऊन पाहिले. आजींचा शांत सात्विक चेहरा क्रोधाने फुलला होता. त्या हातवारे करीत खोलीत येरझाऱ्या घालीत होत्या. स्वत:शीच मोठमोठ्याने बडबड करीत होत्या.
“मुनींना आहार देतात! भ्रष्ट कुठले! ढोंगी, मायावी! कुठे फेडतील हे पाप?” त्यांनी मला पाहिले आणि त्या म्हणाल्या,
“दिलास मुनींना आहार? धन्य झालीसना अगदी?” मला काहीच कळेना. मी त्यांना म्हणाले,
“आजी, तुम्ही आज यायला हवं होतं आहार द्यायला.” तर त्या रागाने म्हणाल्या,
“आहार! असल्या पापाच्या पैशातून मुनींना आहार देऊन नरकात पडायचं नाही मला. तुला माहित आहे मुक्ता, साताठ वर्षात एवढं मोठं हॉस्पिटल, हा बंगला कसा उभारला यांनी? अगं गर्भपात करतात इथे! गर्भातले मूल मुलगा आहेकी मुलगी याची चाचणी करून मुलगी असेल तर सर्रास गर्भपात करतात. हा माझा मुलगा आणि सून या पापाच्या पैशाला चटावले आहेत अगदी! आमच्या सात पिढ्यात एवढे पापी कोणी निपजले नव्हते बघ. किती भृणहत्या होतात इथे याची मोजदादच नाही…आणि वर उजळ माथ्याने मिरवतात.”
आजी बोलत होत्या आणि माझ्या मनाचा गोंधळ उडत होता. मी तडक तेथून परत आले त्या रात्री मला बराच वेळ झोप आली नाही. उशिरा रात्री मला स्वप्न पडले. त्यात शोभावन्सं होत्या.
हॉस्पिटलमधल्या बाळांना त्या प्रेमाने थोपटत होत्या. मुनींना आहार देत होत्या. त्या मला सुंदर तरुणीचे रूप घेतलेल्या पुतना राक्षशीणीसारख्या वाटल्या. मग….क्षणात त्यांनी आपले रूप बदलले. सुळे बाहेर काढून त्या माझ्यासमोर आल्या. जोरजोरात हसू लागल्या. मी दचकून जागी झाले आणि नंतर मला झोपच लागली नाही.
दुसऱ्याच दिवशी मी व जयेश तेथून निघालो. जयेशला नंतर मी त्या प्रसंगाबद्दल विचारलेही. पण त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन ती विषयच टाळला.
त्या प्रसंगानंतर मी मात्र बदलून गेले. माझे खळखळून हसणे कमी झाले. मी अंतर्मुख झाले. घरातल्या प्रत्येक माणसाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याचा मला जणू छंदच जडला. त्यानंतर मला हळूहळू जाणवू लागलं, की या घरातील माणसांची आधुनिकता फक्त वरवरची आहे. पोशाखी आहे, आणि यांचा धार्मिकपणा फक्त कर्मकांडात अडकला आहे. दिखावू आहे. कोमलच्या जन्मानंतर तर हे सर्व मला अगदी प्रकर्षाने जाणवू लागले. खटकू लागले.
आणि आता गेल्या आठवडाभरात आमच्या घरात चाललेलं नाट्य; जणू टीव्ही सिरीयलला साजेशी साजीश! खुद्द माझा नवराही त्यात सामील असलेला पाहून माझा माया, ममता, माणुसकी, नातीगोती यांच्यावरचा विश्वासच उडाला. खूप नैराश्य आलं.
त्यानंतर दोन महिन्यापूर्वीच मला कळलं की मी परत आई होणार आहे. कोमलला लवकरच भाऊ किंवा बहिण होणार आहे. माझे डोहाळे मात्र यावेळी कोमलच्या वेळेपेक्षा खूप वेगळे होते. कदाचित घरातल्या त्या वेळच्या वातावरणाचा परिणाम असेल पण कोमलच्या वेळेस मी फुलासारखी उमलत गेले होते. पण यावेळी मात्र सारेच वेगळे होते.
डोहाळे खूपच कडक होते. पाणीसुद्धा पचत नव्हते. पहिले पंधरावीस दिवस मी सलाईनवरच होते.
सासूबाई मात्र सारख्या म्हणत होत्या,
“यावेळचे डोहाळे वेगळे आहेत. नक्की यावेळेस मुलगाच होईल. देवकार्यात, धर्मकार्यात कुठे उणीव राहू देणार नाही मी यावेळी!” लगेच त्या मामंजींना म्हणाल्यादेखील,
“वीरनगरच्या पंचकल्याणिक पूजेचं यजमानपद यावेळी आपणच घ्यायचं.” मामंजींनी देखील तसं करूनच दाखविलं.
पूजेच्या यजमानपदाचा सवाल तीन लाखापर्यंत चढत गेला. पण तो शेवटी मामंजीनीच घेतला. तीन लाख रुपये म्हणजे आमच्या घराच्या दृष्टीने काहीच नव्हते. वर्षाला आठ-दहा लाखांचे फक्त ऊसाचेच उत्पन्न होते.
सवाल घ्यायला माझा विरोध नव्हता. पण त्यामागची सासू बाईंची भूमिका मला पटत नव्हती. तशात गेल्या पंधरा दिवसात मी थोडी अस्वस्थ होते. कोर्टात एका विधवेची केस…तिला इस्टेटीसाठी छळणारी तिचीच माणसे, दीर आणि नणंदा! ती असहाय्य स्त्री! शील सांभाळत जगणारी आणि तिला आधार देणाऱ्या शारदाबाई … मी ती केस लढवली होती आणि जिंकलीही होती. पण आतल्या आत ती केस मला हलवून गेली होती. त्याचाही परिणाम यावेळी झाला असावा.
पंचकल्याणिक पूजेसाठी शोभावन्सं आणि त्यांच्या यजमानांनाही बोलावून घेतले होते. आल्याआल्याच शोभावन्सं माझ्या खोलीत आल्या. माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवीत म्हणाल्या,
“किती वाळलीस मुक्ता? आता मी आले आहेना तर माझी मैत्रीण आहेना डॉ.उषा तिला दाखवून घेऊ हवे तर!”
“पण डॉ. पारेखांची ट्रीटमेंट चालू आहेना?” मी म्हणाले.
“अगं, पण उषा चांगली स्त्रीरोगतज्ञ आहे. शिवाय परदेशी जाऊन आली आहे. शिवाय तुझी ही तब्येत पाहून मलातर वाटतेकी अल्ट्रासोनोग्राफी करून घेतलेली बरी. मला तर थोडी काळजीच वाटते बघ.”
शोभावन्संच्या बोलण्यात खरोखरीच काळजी दिसत होती. मलाही त्यांचे म्हणणे पटले. त्यानंतर मग अल्ट्रासोनोग्राफी केली. डॉ. उषाने दिलेल्या औषधाने मला जरा बरेही वाटू लागले. फळांचा रस, पेज हळूहळू पचू लागली.
…मग काल संध्याकाळी शोभावन्सं व सासूबाई माझ्या खोलीत आल्या. माझ्याजवळ बसत शोभावन्सं हळूच म्हणाल्या,
“मुक्ता, खरेतर तुला सांगायचे होते. पण तुझी तब्येत ही अशी तोळामासा झालेली…सांगावं की नको विचार करीत होते. पण कधीतरी हे सांगावं लागणारच.”
“काय झालं शोभावन्सं?” मी घाबरून विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या,
“अगं, परवा आपण तुझी अल्ट्रासोनोग्राफी केलीना त्याचे रिपोर्ट्स आलेत. आणि…गर्भात विकृती आहे. जन्माला येणारं मूल नॉर्मल असणार नाही. त्याच्यात व्यंग असेल. खरेतर तुझा त्रास पाहून मला जरा शंका वाटतच होती. म्हणून तर मी अल्ट्रासोनोग्राफीचा सल्ला दिला.”
“मग आता काय करायचं? मी घाबरून विचारले. तेव्हा त्या चेहरा पाडून म्हणाल्या,
“मलातर वाटतकी गर्भपात केलेला उत्तम!” त्यांचे ते बोलणे ऐकून क्षणभर मी गोंधळले. त्यांचे बोलणे तर अगदी खरेखरे वाटत होते. पण माझ्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत होती. आणि अचानकपणेच त्यावेळी मला आठवल्या, रागाने लालबुंद झालेल्या शोभावन्संच्या सासूबाई, आणि त्या रात्री मला पडलेले ते स्वप्न! सुंदर तरुणीचे रूप घेतलेली पुतना राक्षशीण! का कोणास ठाऊक पण माझ्या हातापायात कापरं भरलं. हुडहुडी भरली आणि दात दातावर वाजू लागले. माझी ती अवस्था पाहून शोभावन्सं म्हणाल्या,
“मुक्ता मला कळते तुझी व्यथा! पण याशिवाय दुसरा इलाजच नाहीगं! अपंग आणि मतीमंद मुलाला जन्माला घालून त्याला नरकयातना का भोगायला लावणार आहेस तू?” माझ्या मनात विचारांचं द्वंद्व चालू होतं. पण मी सावरले आणि विचारपूर्वक म्हणाले,
“शोभावन्सं डॉ. पारेख माझ्या बाबांचे चांगले मित्र आहेत. मलातर वाटतेकी परत एकदा त्याच्याकडून अल्ट्रासोनोग्राफी करून घ्यावी”
“अगं पण डॉ. पारेखांकडे अल्ट्रासोनोग्राफीची सोय नाही. ते तुला दुसरीकडेच पाठवतील त्यासाठी!” शोभावन्सं म्हणाल्या. तेव्हा मात्र मी खंबीरपणे म्हणाले,
“चालेल मला! पण डॉ. पारेखांच्या सल्ल्याशिवाय मी गर्भपात करणार नाही. शिवाय मला अल्ट्रासोनोग्राफीचे रिपोर्टस त्यांना दाखवायचे आहेत.” माझ्या या वाक्यासरशी शोभावन्सं दचकल्या. सासूबाई मात्र एकदम भडकल्या. म्हणाल्या,
“याचा अर्थ तुझा आमच्यावर विश्वास नाही! शोभावर पण नाही! आम्ही तुझे शत्रू आहोत. आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो आहोतना? नको असेल तर राहूदे! सांभाळत बस आयुष्यभर अपंग पोराला!” असे म्हणून रागारागाने त्या व शोभावन्सं निघून गेल्या. त्यानंतर कुणीही माझ्याकडे फिरकलही नाही. एकदा कोमल फक्त आई, आई, करत काहीतरी सांगून गेली.
रात्री जयेश आला. पण तोही जरा घुश्श्यातच होता. म्हणाला,
“मुक्ता, तुझा विश्वास नाही आमच्यावर?”
“असं कुठे म्हटलंय मी? पण एकदा डॉ. पारेखांकडे जाऊन खात्री करून घेतली तर काय बिघडलं?”
“पण शोभाताईसुद्धा एक डॉक्टर आहे. तिच्यावर का अविश्वास दाखवतेस तू?” यावर मी गप्पच राहिले. तेव्हा जयेशच पुढे म्हणाला,
“बोलना काहीतरी! अशी गप्प का आहेस?” त्यावर मी म्हणाले,
“कारण, कारण…शोभावन्संच्या सासूबाईंच्याकडून मला त्यांच्याबद्दल जे काही समजलं आहे ते सर्व काही खरे असावे असं आता मला वाटू लागलंय. मी त्यावेळीही त्याबद्दल तुला विचारले होते.” त्यावर जयेश एकदम संतापून म्हणाला,
“खोटं आहे ते सर्व! शोभाची सासू भ्रमिष्ट आहे!”
“मुळीच नाही! उलट तुम्ही सारेजण भ्रमिष्ट आहात. खोटारडे आहात…आणि तुम्ही सर्वांनी मिळून कट रचलाय….कारण तुम्हाला कळले आहेकी मला मुलगी होणार आहे. फक्त वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंकी तू सुद्धा या कटात सामील आहेस.” माझ्या या वाक्यासरशी जयेश उसळून म्हणाला,
“मुक्ता, तोंड सांभाळ. तोंडाला येईल ते बरळू नकोस!”
“जयेश मी कायद्याची पदवीधर आहे. जे बोलते ते विचार करूनच बोलते. तुझ्या शोभाताईला आणि त्या डॉ. उषाला ‘प्रसूतीपूर्व चिकित्सा नियंत्रण आणि गैरवापर कायदा’ नक्कीच माहिती असेल. आणि एक लक्षात ठेव, तुम्ही मला फसवू शकणार नाही!” माझे हे उद्गार ऐकून जयेश गोंधळला. माझी ही कणखर भूमिका कदाचित त्याला नवीन होती. तो मग नरमाईच्या सुरात म्हणाला,
“मुकता, तुझा माझ्यावरही विश्वास नाहीका? अगं मी बाप आहे तुझ्या होणार्या मुलीचा!”
“अच्छा, म्हणजे एवढं तरी खरं आहेकी गर्भ मुलीचा आहे. आता फक्त एवढंच पहायचंकी खरेच त्यात काही विकृती आहेका?” माझ्या या उद्गारांनी जयेश एकदम गडबडला. त्याच्या खोटेपणाचा बुरखा एकदम गळून पडला. पण अहंकार दुखावल्याने तो भडकून म्हणाला,
“हो! गर्भ मुलीचाच आहे. आणखी आता आम्हाला दुसरी मुलगी नको आहे. तुला गर्भपात करून घ्यावाच लागेल.
“पण त्यासाठी असं खोटं का बोललात तुम्ही माझ्याशी?”
“कारण तुझा हट्टी स्वभाव माहीत होता मला. म्हणून मीच सांगितलं शोभाताईला असं करायला. कारण…तू अशी सहजासहजी तयार होणार नाहीस या गोष्टीला, हे मला ठाऊक होतं.”
जयेशचं माझ्या परमप्रिय पतीचं असं खोटं नाटकी स्वरूप उमजताच माझं काळीज गलबललं. दु:खातिरेकाने माझ्या अश्रूंचा बांध फुटला. मी ओक्साबोक्शी रडू लागले. दु:खाचे कढ आवरत नव्हते. त्यासरशी जयेश थोडा शांत झाला. माझे अश्रू पुसत म्हणाला,
“मुक्ता, थोडा विचार कर. आजकाल बरेचजण गर्भलिंग चाचणी करून घेतात आणि मुलगी असेल तर गर्भपातही करून घेतात. अगं तीन महिन्यांचा गर्भ तो काय अन त्याबद्दल एवढं काय वाईट वाटून घ्यायचं? तू तर एवढी शिकलेली नव्या विचारांची आहेस. तुला यात गैर वाटण्यासारखं काय आहे?”
जयेशचं ते बोलणं ऐकून मला हसावं की रडावं तेच कळेना एवढा डॉक्टरेट मिळवलेला प्राध्यापक, पण त्याच्या कोत्या बुद्धीची आणि संकुचित विचारांची अगदी कीव वाटली मला! मी गप्पच राहिले. तो पुढे म्हणाला,
“तू पाहतेच आहेस, या घरात आल्यापासून आम्ही कोणतीतरी बंधनं घातली आहेत तुझ्यावर? तू तुझ्या आवडीचे कपडे घालतेस. नोकरी करण्याऐवजी स्वतंत्र वकिली करतेस. पण याबद्दल आई कधी बोलली तुला?”
“जयेश, अरे नवऱ्याला नावाने हाक मारली, अन जीन्स घातली म्हणून का कोणी आधुनिक ठरतं? अरे विचार नवे हवेत. तर्काच्या कसोटीवर ते पारखून घ्यायला हवेत. तुम्ही सर्वांनी मला एकवेळ नऊवारी नेसून अंबाडा घालायला जरी लावलं असतं तरी ते एकवेळ मी केलं असतं….पण आज तुम्ही मला जे करायला सांगता आहात ते मी कधीच करणार नाही. कारण मी एक स्त्री…जैन संस्कारात वाढलेली स्त्री आहे. गर्भपात ही जीवहत्या आहे एवढं मला कळतं! जन्माला येणाऱ्या एका मुग्ध-मधुर कळीला उमलण्याआधीच कुस्करण्याच पाप मी कधीच करणार नाही.” मी ठामपणे आणि शांतपणे जयेशला सांगितले.
“मूर्ख आहेस तू! अगं त्यात कसलं आलंय पाप?असल्या पाप-पुण्याच्या कल्पना मानतेस तू?”
“हो! माणुसकीला काळिमा फासणारे कोणतेही कृत्य मी पापच मानते.”
“मुक्ता, अगं माझ्या कितीतरी उच्चशिक्षित मित्रांच्या, मित्रांच्या नात्यातल्या बायकांनी ही चाचणी करून गर्भपात करून घेतला आहे. विशेष म्हणजे त्यात जैनही आहेत.”
“जैन? म्हणजे फक्त जैन धर्मात जन्मलेले? जैन धर्मात जन्मलेल्या प्रत्येक जैनात जैनत्व असतंच असं नाही! तुझ्या त्या नात्यातल्यांना मी मुळी जैन मानतच नाही. कुणीही संस्कारित जैन असं कृत्य करणार नाही. कारण अहिंसा हातर जैन धर्माचा प्राण आहे आणि भृणहत्या ही तर सरळ सरळ हिंसाच आहे.”
माझे हे जैनत्वाशी खरेखुरे नाते सांगणारे सच्चे विचार जयेशला पेलवण्यासारखे नव्हते. तो म्हणाला,
“बस झालं आता तुझं हे तत्वज्ञान! अगं जरा व्यवहारी दृष्टीकोनातून बघ. जर पहिल्या दोन्ही मुलीच झाल्या, तर परत तिसऱ्याची वाट पाहणं आलं. आणि परत…तिसरा मुलगाच होईल हे कशावरून?”
“इथे कुणाला हवा आहे मुलगा? दोन मुलीही चालतील मला!”
“तुला चालेल, पण मला व आई-बाबांना चालणार नाही. तुला मी शेवटचं सांगतो मुक्ता; या घरात राहायचं असेल तर तुला आमचं ऐकावंच लागेल. नाहीतर तुला या घराबाहेर पडावं लागेल. तेही एकटीला! कोमलही तुझ्या बरोबर येणार नाही. आमचंच चुकलं. खूप स्वातंत्र्य दिलं आम्ही तुला! शेवटी बाबा म्हणतात तेच खरे! पायातली वहाण पायातच ठेवलेली बरी!”
धाडकन दरवाजा आपटून जयेश निघून गेला. जयेशचे ते बोलणे…वरवर सुसंस्कृत वाटणाऱ्या त्याच्या हृदयात दडलेला तो पुरुषी अहंकाराचा फणा माझ्या स्वाभिमानाला असा डंख मारून गेला. चिंधड्या चिंधड्या उडाल्या माझ्या भावनांच्या! ज्याला मी माझं सर्वस्व मानत होते, ज्याच्यासाठी मी या घरात आले त्याच्या या उद्गारांनी माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. रात्रभर मी रडत राहिले.
आणि आता …सकाळी सकाळी जयेश गेला, शोभा वन्सं आणि त्यांचे यजमान गेले, सर्वजणच गेले. तीर्थंकरांचा गर्भकल्याणिक उत्सव साजरा करायला गेले! पूजेचे यजमान बनलेले माझे सासरे तर तिथेच राहिले होते.
मला अगदी गळून गेल्यासारखे वाटत होते. माझ्या उदरातल्या कळीला वाचवण्यासाठी माझं धडपडणारं प्रेम मला दुबळं वाटू लागलं. मी कशीबशी उठून हॉलमध्ये आले. सहजच टीपॉयवर पडलेल्या वृत्तपत्रावर नजर टाकली. कितीतरी बातम्या! कुठे बॉम्बस्फोट, कुठे खंडणीसाठी कोवळ्या मुलांचे अपहरण, तर कुठे सासू आणि नणंदेने मिळून सुनेला जाळले.
वाटलं, किती अफाट वेगाने बदलत चाललंय जग! किती क्रौर्य, किती भ्रष्टाचार, किती रक्तपात; सत्तेसाठी, पैशासाठी, रूढीसाठी, खोट्या सन्मानासाठी! विचारांच्या गर्दीने डोकं फुटून जाईल असं वाटू लागलं. आणि…मग माझ्यासमोर आली, अंजनाबाई गावित! कोवळ्या निरागस मुलांची हत्या करणारी! ममतेला काळिमा फासणारी!
मग पोटाच्या भुकेसाठी पोटच्या अल्पवयीन मुलीला धंद्याला लावणारी आई, माझ्यापुढे येऊन विकट हसू लागली. हसता हसता रडू लागली. मग मला दिसलं, बंदुकीच्या दहशतीखाली आपला आत्माच हरवलेलं काश्मीर! तिथल्या नाजुक, गोऱ्यापान युवती, पतीवियोगाने पुत्रवियोगाने त्याचं गोठलेलं वात्सल्य! तिथल्या झेलमचे स्फटिकासारखे चकाकणारे पाणी; त्या पाण्यात रक्ताचे लोट येऊन मिसळत होते. वाटलं, ते रक्तरंजित पाणी मलाही खोल खोल ढकलत आहे; निराशेच्या गर्तेत!
निराशेच्या त्या गर्तेत, त्या खड्ड्यात गोल गोल गिरक्या घेताना मला वाटू लागलं; माझ्यातलं दुबळं वात्सल्य या फाटलेल्या आभाळाला ठिगळ तरी लावू शकेल का? अशक्य! अशक्यच आहे हे सगळं! असे वाटून मी कोचावर असहाय्यपणे अंग टाकले. डोळ्यासमोर काळोख पसरला होता. त्या काळोखात मी बुडून गेले…
आणि मग अचानकपणे एक ज्योत त्या काळोखातून माझ्यापुढे आली. त्यात होत्या धरणग्रस्तांसाठी झगडणाऱ्या मेधा पाटकर, दु:खीकष्टी जीवांवर मायेची पाखर घालणाऱ्या मदर तेरेसा, दु:खी निराधार विधवांना आपल्या श्राविकाश्रमात शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करणाऱ्या कळंत्रेआक्का! या साऱ्याजणींचे आभाळाएवढे वात्सल्य माझ्यातल्या उन्हाने पोळलेल्या व्यक्तिगत दुबळ्या वात्सल्यावर सावलीसारखे बरसू लागले.
मग माझे निवलेले डोळे मी गच्च मिटून घेतले.त्या मिटल्या डोळ्यांपुढे एक चेहरा स्पष्ट दिसू लागला. शारदाबाईंचा!
कोर्टात त्या विधवेच्या केससाठी आलेल्या शारदाबाई! वय चाळीसच्या आसपास, प्रौढ कुमारिका, गर्भश्रीमंत घराण्यातल्या! पांढरीशुभ्र साडी, सात्विक चेहरा! चंद्रपूरजवळच्या एका डोंगराळ भागात त्यांचा विधवा व परित्यक्त्यांसाठी, फसवल्या गेलेल्या कुमारी मातांसाठी, मुलींसाठी, आश्रम होता. शारदाबाईंनी आपली सगळी इस्टेट या आश्रमालाच दिली होती.
सहज चर्चेतून कळलं होतंकी, त्यांना हवी होती एक मदतनीस, तरुण तडफदार, आश्रमासाठी समरसून काम करणारी सहकारी! ते आठवताच मी झटकन उठले. माझं मरगळलेलं मन पालवी फुटावं तसं फुलून आलं. माझा निर्णय मी पक्का केला. पर्समधले शारदाबाईंनी दिलेले कार्ड काढले. आणि मग …शारदाबाईंना फोन करून कळवलंकी मी उद्यापासून कामावर रुजू होतेय. त्यांच्या आश्रमात त्यांची मदतनीस म्हणून! पण फोन खाली ठेवताच मला कोमलची आठवण झाली. माझे हातपायच गळाल्यासारखे झाले. थोडावेळ काहीच सुचेना. पण जयेशने मला घराबाहेर जाण्याची दिलेली ती धमकी! ती आठवून मला त्या लोकांबद्दल कसलीही आशाच उरली नाही. त्या घराशी असलेले सर्व प्रेमाचे बंध तोडण्यासाठी माझ्या मनाने जणू मला ग्वाहीच दिली.
मला लवकरच निघायला हवं होतं. सगळी मंडळी यायच्या आत! कारण कोमलला पाहून कदाचित माझा निर्णय परत बदललाही असता. तिलाही मला न्यायचच होतं पण त्यासाठी थोडा काळ जाऊ द्यायला हवा होता. त्यातून तिला नाहीतरी तिच्या आजी-आजोबांचाच जास्त लळा होता. तेव्हा काही दिवस काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं.
मी आवरासावर केली. आवश्यक त्या वस्तू, कपडे घेतले. सुटकेस भरली. जयेशसाठी टेबलावर पत्र लिहून ठेवले आणि मी निघाले. बाहेर माळीबुवा बागेला पाणी घालत होते. माझ्याकडे त्यांनी आश्चर्याने पाहिले. मी त्यांना म्हणाले,
“तातडीच्या कामासाठी मी बाहेर निघालेय! तसा निरोप ठेवलाय मी लिहून!”
एवढे बोलून मी झरझर पायऱ्या उतरले. फाटक उघडून बाहेर आले आणि…मागे वळून पाहिले. फाटकावर चढलेली जुईची वेल! जुईच्या वेलीवर असंख्य अस्फुट कळ्या नुकत्याच उमलू लागल्या होत्या. वाऱ्याच्या हळुवार झुळकीने त्यांचा सुवास माझ्या रंध्रारंध्रात भरून गेला. मला सहजच वाटून गेलं, माझ्या उदरात वाढणारी अबोल कळीसुद्धा अशीच फुलणार आहे, हळूहळू उमलणार आहे. मग मागे वळून न पाहता मी समोरून आलेल्या रिक्षाला हात केला आणि त्यात बसून मी मार्गस्थ झाले….